माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

 

राजा शिवाजी विद्यालय (किंग जॉर्ज)

 


आधी सांगितल्याप्रमाणे, दुसरी, तिसरी व चौथीमध्ये नेहमीच पहिला आल्यामुळे माझ्या वडिलांना असं उगीचच वाटलं की मी खूप हुशार आहे. पण खरी गोम अशी होती की मी तर 'वासरात लंगडी गाय' होतो.  पण असो. तसही त्यावेळी म्युनिसिपालिटी मध्ये फक्त सातवीपर्यंतच वर्ग होते. सातवी नंतर तर मला दुसऱ्या शाळेत जावंच लागलं असतं. मग पाचवी नंतर का नको? असा वडिलांनी विचार केला व मला म्युनिसिपालिटी मधून काढण्याच ठरवलं. माझ्या विभागात तशा एक-दोन शाळा होत्या, पण त्या म्हणाव्या तेवढ्या नावाजलेल्या नव्हत्या. वडिलांना मी चांगल्या (?) शाळेत जावं असं वाटायचं. 


आम्ही जरी घाटकोपरला राहायचो तरी त्यांना वाटायचं की मी आर. एम. भट किंवा बालमोहन किंवा किंग जॉर्ज, ज्याला आता राजा शिवाजी विद्यालय म्हणतात अशा शाळेत जाव.  आर. एम. भट परळला, बालमोहन दादरला शिवाजी पार्क येथे तर किंग जॉर्ज माटुंग्याला हिंदू कॉलनी येथे होती. शेवटी वडिलांनी मला हिंदू कॉलनीतली किंग जॉर्ज मध्ये घालायचं ठरवलं. किंग जॉर्ज मध्ये पाचवीला ऍडमिशन घेण्यासाठी खूप पालक उत्सुक असायचे. त्यामुळे तिथे त्यावेळीही प्रवेश परीक्षा असायची. मलाही प्रवेश परीक्षेला बसावं लागलं. त्यात पास झालो व किंग जॉर्ज मध्ये प्रवेश मिळाला.

 

परंतु या प्रवेशामध्ये सुद्धा एक गोम होती. त्यावेळी किंग जॉर्ज लांब राहणाऱ्या मुलांना प्रवेश देत नसायची. दादर, माटुंगा, परळ, अँटॉप हिल, वडाळा, जास्तीत जास्त सायन पर्यंत राहणाऱ्या मुलांनाच प्रवेश दिला जायचा. त्यावेळी वडील ज्या 'फिनले' मिलमध्ये नोकरीला होते त्याच मिलमध्ये त्यांचे एक साहेब हिंदू कॉलनीत राहायचे. वडिलांनी शाळेचा फॉर्म भरत असताना त्यांचा पत्ता दिला. त्यामुळे शाळेत प्रवेश घेताना माझा पत्ता कट झाला नाही.

 

माझे किंग जॉर्ज मधले ते दिवस म्हणजे पाचवी ते अकरावी पर्यंतचे दिवस हे खूपच मस्त गेले. अनेक उत्तम-उत्तम शिक्षक तिथे मला भेटले. ज्यांच्या शिकवण्याच्या कलेने मला शिकायची कला अवगत झाली.  माझे वर्गमित्रही छान होते. हुशार होते. मैत्रीला लायक होते. एकमेकांना मदत करायचे. त्यातले बहुतेक माझ्याहून उत्तम सांपत्तिक व कौटुंबिक स्थितीतून आले असल्यामुळे त्यांच्यापासूनही मला खूप काही शिकायला मिळालं.  वर्गातील बहुतेक मुलं हुशार असल्यामुळे पहिला नंबर तर सोडाच पहिल्या दहा मध्ये सुद्धा नंबर यायचा नाही. पण त्याचं काहीही वैषम्य वाटायचं नाही. याचं कारण आपल्या पुढे येणारी मुलं आपल्याहून हुशार आहेत याची मला खात्री होती. 

 

सातवीला असताना वडिलांनी मला आग्रहाने सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायला सांगितलं. तसं त्यांनी मला घाटकोपर मधील म्युनिसिपालिटीच्या शाळेत असताना चौथीलाही चौथीच्या मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षेला बसवलं होतं. पण मला काही ती स्कॉलरशिप मिळवता आली नाही. यावेळी  माटुंग्याच्या किंग जॉर्ज मध्ये असताना सातवीच्या हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेला बसायचं होतं.

 

सहावीच्या परीक्षेत जरी वरचा नंबर नव्हता तरी मार्क खूप छान होते.  त्यामुळे शाळेने स्कॉलरशिपला बसलेल्या काही निवडक मुलांना 'स्पेशल ट्युशन' द्यायचं ठरवलं ज्यात माझा नंबर लागला. मी या स्पेशल ट्युशनमुळे स्कॉलरशिप परीक्षेत पास झालो व आठवी, नववी, दहावी व अकरावी ही चार वर्षे स्कॉलरशिप म्हणून दर महिन्याला दहा रुपये मला मिळू लागले.

 

ही माझी पहिली स्वकमाई होती. ज्यावेळी मला सर्वात पहिल्यांदा स्कॉलरशिपचे पैसे हातात मिळाले त्यावेळी वडिलांनी मला आमच्या घराच्या जवळच असलेल्या सांगली बँकेत माझ्या नावाने पहिल्यांदा बचत खाते खोलून दिले. त्या खात्याचा नंबर होता ४७४७ जो मला अजूनही आठवतो.  या खात्यात मी स्कॉलरशिपचे पैसे जमा करायचो व कधी घरच्यांना गरज लागली तर काढायचो. बँकेचा व माझा संबंध असा खूपच लहानपणी म्हणजे वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आला. बँकेचे अधिकारी व कर्मचारी एवढे को-ऑपरेटिव्ह होते की मला त्याही वयात बँकेचे व्यवहार करताना कोणतीच अडचण आली नाही.

 

वडिलांनी मला माटुंग्याच्या किंग जॉर्ज मध्ये घातले खरे पण शाळेच्या स्कूलबस मधून जाण्याइतपत आमची आर्थिक ऐपत नव्हती. त्यामुळे ट्रेनने जाणे-येणे हाच एकमेव पर्याय होता.  माझ्या विभागातील माझ्याहून वयाने मोठी असलेली काही मुलं त्याच शाळेत जायची. मीही त्यांच्याबरोबर जायचो. लहान म्हणून ते माझी काळजी घ्यायचे. मी मोठा झाल्यावर माझ्या विभागातील माझ्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची मी काळजी घ्यायचो. ही परंपरा होती. ती कोणीतरी सुरू केली. आम्ही त्या परंपरेचा भाग बनलो व ती परंपरा पुढे नेली.

 

त्यावेळी घाटकोपर वरून लोकल सुटायच्या. घाटकोपर मध्ये जास्त करून व्यापारी लोकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून 9:45 ला, दहा-पाच ला व अकरा वाजता तीन लोकल गाड्या सुटायच्या. घाटकोपर वरूनच त्या गाड्यांची सुरुवात असल्यामुळे या गाड्यांमध्ये  अगदी आरामात लहान मुलांनाही चढता यायचं. त्यामुळे आमच्या शाळेत जाणारी सर्व मुलं याच लोकल  गाडीतून प्रवास करायची. स्कूल कन्सेशन असल्यामुळे फर्स्ट क्लास चा पासही स्वस्तात मिळायचा. त्यामुळे प्रवासाचा कधीही त्रास झाला नाही. कधी बसायला जागा मिळाली नाही तर आधीच बसलेले काका, मामा स्वतःहून जागा करून देत.  


शाळेतून सुटल्यावर येताना मात्र गाडीला थोडीशी गर्दी असायची पण आजच्या एवढी तर नक्कीच नाही. दादर वरून प्लॅटफॉर्म नंबर तीन वरून सुटणारी ५.१४ ची ठाणे गाडी मिळणं अतिशय कठीण होतं. कारण शाळेतून ५ वाजता सुटून १४  मिनिटात दादर स्टेशनवर चालत येण कठीण होतं. पण त्यानंतरची ५.३२ ची कल्याण गाडी आरामात मिळायची. चढायला तर नक्कीच मिळायच. सुरुवाती सुरुवातीला आणि पाचवीला असताना वडील मिल वरून सुटल्यानंतर दादर स्टेशनवर माझी वाट पाहत थांबायचे. कधी कॅन्टीन मधील बटाटावडा तर कधी प्लॅटफॉर्मवर लागलेल्या स्टॉल वरील चॉकलेट-गोळ्या पण आपल्या ऐपती प्रमाणे घेऊन द्यायचे. गाडी आली की मी फर्स्ट क्लास मध्ये शिरायचो व वडील थर्ड क्लास मध्ये. त्यावेळी फर्स्ट क्लास व थर्ड क्लास हे दोनच वर्ग होते. जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी थर्ड क्लासच्या वर्गाला सेकंड क्लास म्हणायला सुरुवात केली. फक्त नाव बदललं. बाकी ना सोयी सुविधा वाढल्या ना गर्दी कमी झाली.

 




 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा