रस्त्यावरील चित्रपट
आजकाल जवळजवळ नाहीत पण चाळ
संस्कृतीत आणि आमच्या वस्तीत होणाऱ्या सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत पडदा लावून
प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवण्याची जी परंपरा होती त्याबद्दल याआधी उल्लेख आलेलाच
आहे. पण ‘बूट पॉलिश’ या चित्रपटापासून सुरुवात करून
अगदी राजेश खन्नाच्या ‘आराधना’ चित्रपटापर्यंत, हा ‘माझा मार्ग एकला’ ‘मोलकरीण’ ‘शेजारी’ ‘धर्मात्मा’ या मराठी चित्रपटापासून सुरुवात करून अगदी दादा
कोंडकेंच्या ‘सोंगाड्या’ चित्रपटापर्यंत रस्त्यावर
बघितलेल्या अनेक चित्रपटांवर आमची पिढी पोसली गेली आहे.
कधी कधी तर एकाच वेळी दोन-दोन ठिकाणी हे रस्त्यावर चित्रपट दाखवले जायचे त्यामुळे त्यातला कुठचा
बघायचा हे ठरवायचं आपल्या हाती होतं. आता मल्टिप्लेक्सचा जमाना आलेला आहे. सिंगल स्क्रीन जाऊन मल्टी
स्क्रीन आलेले आहेत. परंतु आमच्या विभागात व चाळ संस्कृतीत तेव्हा सुद्धा एकाच
वेळी दोन-दोन ठिकाणी दाखवण्यात येणारे चित्रपट हे त्या अर्थाने मल्टीस्क्रीनच
होते.
चित्रपट सुरू असताना कित्येक वेळा रीळ तुटायचं, म्हणजेच फिल्म तुटायची. मग पिक्चर तात्पुरता बंद
व्हायचा. पुन्हा जोपर्यंत ऑपरेटर ती
फिल्म जोडत नाही व पुन्हा चित्रपट दाखवला जात नाही तोपर्यंत ‘मध्यंतर’ असं म्हणायला हरकत नाही. चित्रपट जेवढा जुना तेवढा
फिल्म तुटायचे चान्सेस जास्त. कधी कधी तर सात-आठ वेळा तरी फिल्म तुटायची पण त्यामुळे
कोणी गोंधळ घालायचा नाही. चाळीमधल्या लोकांचा पेशंस खूप असायचा. त्यामुळे पिक्चर दाखवणाऱ्या
ऑपरेटरबरोबर अतिशय सहकार्य करून चित्रपट पाहिला जायचा.
ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या जमान्यात अनेक ब्लॅक अँड
व्हाईट चित्रपट रस्त्यावर बसून पाहिले. त्यानंतर इस्टमनकलर सारखे रंगीत चित्रपटाचे युग सुरू
झाल्यानंतर रस्त्यावर चित्रपट बघायला आणखीन मजा यायला लागली. चाळीच्या पूजेच्या वेळी कुठचा
चित्रपट दाखवायचा यासाठी बराच खल व्हायचा. पण निर्णय घेण्याचा अधिकार हा बहुतेक वेळा तरुण टोळक्याकडे
असायचा. जुने चित्रपट
स्वस्तात असायचे तर नवीन चित्रपट त्यामानाने महाग असायचे. त्यामुळे चाळीचं बजेट हे देखील
बघितलं जायचं तर त्याचवेळी हा चित्रपट या आधी वस्तीत कुठे दाखवला गेला तर नाहीये
ना? हेही पाहिलं जायचं. त्यावेळी चित्रपट किती लांबीचा
आहे याला खूप महत्त्व असायचं. प्रत्येक चित्रपट कमीत कमी तीन तास चाललाच पाहिजे. तरच पैसा वसूल होईल असं
डोक्यात कुठेतरी असायचं. त्यामुळे जास्त रीळ असलेल्या चित्रपटांना जास्त मागणी
असायची. भारतीय
चित्रपटामध्ये गाण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ज्या चित्रपटात जास्त गाणी आहेत व ज्या
चित्रपटातली गाणी 'हिट' आहेत तो चित्रपट दाखवण्याकडे या तरुण मंडळींचा ओढा असायचा. अर्थात आवडता 'हिरो' आणि 'हिरोईन' कोण? यावरूनही कोणता चित्रपट दाखवायचा
हे ठरवायचं.
पुढच्या जमान्यात हळूहळू रस्त्यावर दाखवणाऱ्या या
चित्रपटांची संख्या कमी होत गेली व त्याची जागा व्हीसीआर ने घेतली. नुकतेच लोकांकडे टीव्ही यायला
लागले होते. त्याला व्हीसीआर जोडून आणि
आवडत्या चित्रपटाची कॅसेट भाड्याने आणून चाळीचाळीत लोक चित्रपट दाखवायला लागले. परंतु अशा तऱ्हेने किती लोक चित्रपट पाहू शकतील याला मर्यादा होती. साधारण ३०-४० इथपर्यंतच लोक व्हीसीआर ने
टीव्हीवर दाखवलेले चित्रपट पाहू शकायचे. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम एकतर वैयक्तिक उत्सवात
किंवा चाळीपुरते मर्यादित असायचे.
रस्त्यावर चित्रपट बघायला जाणं हा एक चर्चेचा विषय असायचा. चाळीमध्ये मुलांचा वेगळा ग्रुप
असायचा. मुलींचा वेगळा ग्रुप असायचा. आम्ही खूप लहान असताना
चाळीतल्या मुली आम्हाला त्यांच्याबरोबर चित्रपट बघायला न्यायच्या. जाताना बसण्यासाठी चटई आणि जर
थंडीचे दिवस असतील तर बरोबर एखादी चादरही प्रत्येक जण आपापल्या बरोबर घेऊन जायचे. नववी दहावीत जाईपर्यंत
रस्त्यावरचे चित्रपट मी तर चाळीतल्या मुलींबरोबरच बघितले आहेत. कारण चाळीतली मोठी मुलं
आम्हाला घेऊन जायचे नाहीत पण नंतर जसा मोठा झालो तेव्हा मात्र चाळीतल्या
पोरांबरोबर अनेक चित्रपट पाहिले आहेत.
तसं बघायला गेलं तर रस्त्यावरचे चित्रपट पाहायला माझ्या
घरचे फारसे राजी नसायचे. त्यांची समजूत घालण्यातच वेळ जायचा. सर्वात शेवटी चाळीतला जो
सगळ्यात 'सभ्य' आणि 'सुशिक्षित' मुलगा आहे त्याच्याबरोबर मी जातो असं म्हटल्यानंतरच
परवानगी मिळायची. लहान असताना तसा काही प्रश्न उद्भवला नाही कारण चाळीतल्या
मोठाल्या थोराड मुलींबरोबर मी जातो आहे असं म्हटल्यानंतर घरच्यांची काळजी मिटायची.
चित्रपट साधारण साडेनऊ दहाला सुरु व्हायचा व १२ साडेबाराला संपायचा. एवढ्या रात्री चाळीतल्या मुली देखील बाहेर असायच्या. पण कधी ‘इव्ह टीझिंग’ झाल आहे, कोणी मुलींची छेड काढली आहे, त्यांना त्रास दिला आहे, असा प्रकार माझ्यातरी नजरेस आला नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे
स्वयंसेवक. ज्या चाळीतर्फे हा चित्रपट
दाखवण्यात येणार आहे त्या चाळीतील सगळी पोरं, मग ती कितीही वात्रट, डांबरट किंवा आगाऊ असो, त्या दिवशी मात्र अतिशय शिस्तीने तो कार्यक्रम व्यवस्थित
पार पाडावा या हेतूने, डोळ्यात तेल घालून वॉलेंटियर चे काम करायचे. हुल्लड
करणाऱ्या एखाद्या कंपूला थांबवण्यापासून ते मुलींच्या
भागात घुसखोरी करणाऱ्या काही आंबट-शोकीन लोकांना दूर करण्यापर्यंत, गडबड होणार नाही, सगळी लोक शिस्तीत येतील, बसतील, चित्रपट पाहतील व संपल्यावर
निघून जातील याची हे स्वयंसेवक काळजी घ्यायचे. त्यामुळे आमच्या विभागात तरी रस्त्यावरील चित्रपट दाखवत
असताना कधी मारामारी झाली, गोंधळ झाला असे प्रकार झाले नाहीत. त्यामुळे की काय घरच्यांना
सुद्धा आपल्या घरच्या मुली बाहेर रात्रीचा चित्रपट पाहिला जात आहेत याबद्दल काहीही
काळजी नसायची.
आज मनोरंजनाच विश्व एवढं पुढे गेला आहे की अगदी थिएटरमध्ये
लागलेला नवा चित्रपट सुद्धा दोन-चार दिवसातच जुना होतो. अशावेळी अगदी पंधरा-वीस वर्ष जुने चित्रपट पाहण्यासाठी
देखील शेकडोंच्या संख्येने दुतर्फा गर्दी जमायची यावर आता कोणाचा विश्वासही बसणार
नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा