चाळीमध्ये
आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे
जे पाहुणे येतात आणि त्यातल्या त्यात
ज्यांचा सातत्याने राबता असतो असे शेजाऱ्यांचे सगळे पाहुणे हे आपले सख्खे शेजारी
कधी बनतात हेच कळत नाही. चाळीमध्ये
शेजाऱ्यांचं घर हे आपलं हक्काचं घर आहे असं समजून त्यांच्या घरातील (टीव्ही चालू करणे असो किंवा
फ्रिजमध्ये असलेली थंड पाण्याची बाटली काढून न विचारता पिणं हे
आत्ताचे उद्योग झाले. त्यावेळी चाळीत अश्या महागड्या वस्तू नव्हत्या) सगळ्यावर
शेजारी
म्हणून आपला
हक्क आहे असं समजून वागायचे व त्यात मालकही जरा सुद्धा हस्तक्षेप करत नसायचा.
त्यामुळेच की काय,
शेजाऱ्यांकडे येणारे त्यांचे पै-पाहुणे हे त्यांच्याबरोबर जेवढे समरस होतात
तेवढ्याच प्रमाणात ते आपल्याशी देखील मिसळून जायचे.
अशा या पाहुण्यांच्या घरी
सुद्धा चाळीतली पोरं बिनधास्त जायची व काही तर तिथे वस्तीला पण असायची. आज-काल याचा विचार करणं थोडसं
कठीण होईल कारण आपल्या पाहुण्यांच्या घरी पण आपलं जाणं कमी झाल आहे. शेजाऱ्यांच्या पाहुण्यांच्या
घरी आपण जातो व तिथे पण आपला पाहुणचार होतो ही कल्पना आज अनेकांना थोडी विचित्र
वाटेल पण चाळ संस्कृतीत ही तर एकदम नॉर्मल गोष्ट होती. आजकाल लग्नकार्याच्या निमंत्रण
पत्रिका जरा वेगळ्या आहेत पण पूर्वी निमंत्रण पत्रिकेत ‘सहकुटुंब सहपरिवार
मित्रमंडळींसह अगत्य येण्याची कृपा करावी’
हे वाक्य ‘श्री
गणेशाय नमः’
या देवाच्या स्तवनाएवढेच कॉमन असायचं आणि त्याचा अगदी शब्दार्थ घेऊन कोणाच्याही
लग्नात शेजाऱ्या-पाजाऱ्यांना आलेल्या निमंत्रण पत्रिकेत चाळीतली फौजच्या फौज
घुसायची आणि त्यात कोणाला काही वावगं वाटायचं नाही.
चाळीमध्ये अशा शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या नातेवाईकांबरोबर अनेक मजेशीर किस्से घडायचे.
एकदा आमच्या चाळीतल्या सख्ख्या शेजाऱ्याच्या मुलीची नवी कोरी चप्पल हरवली म्हणा
किंवा चोरीला गेली म्हणा. ती दुसऱ्या एका शेजाऱ्याच्या पाहुण्याच्या मुलीच्या पायात, ती जेव्हा आमच्या चाळीत शेजाऱ्यांकडे परत राहायला आली तेव्हा सापडली.
चाळीतल्या शेजाऱ्यांचे पाहुणे तर कधी कधी एवढे जवळचे होत की ते चाळीतील इतरांकडून
देखील हात उसने पैसे मागत.
मात्र एकदा पैसे दिले की हे पाहुणे अगदी वर्षभर गायब होऊन जात.
चाळीमध्ये त्या कुटुंबाबरोबर
त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा म्हणजे काका,
मामा,
मेव्हणा,
भाऊ,
बहीण,
भाऊजी एवढेच नव्हे तर त्यांच्या गावच्या दूरच्या नातेवाईकांचा देखील 'परमनंट' मुक्काम असायचा. मुंबईमध्ये नोकरी, धंदा, शिक्षणासाठी आलेल्या या लोकांना आसरा
देण्याचं,
कमीत कमी तात्पुरता आसरा देण्याचं काम चाळ करायची आणि चाळीमध्ये आलेले हे ‘मोसमी
पक्षी’
देखील त्या चाळीचा अविभाज्य घटक बनून राहायचे. जगु उर्फ जगन्नाथचा ‘मामा’ हा आपलाच मामा आहे असं वाटायचं
व त्याच्याबरोबर त्याच दृष्टीने व्यवहार व्हायचे.
चाळ सोडून अनेक वर्षे झाली तरी या ‘मामा’ व ‘काकां’बरोबरचे संबंध आजही कायम आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा