माझी
म्युनिसिपाल्टीची शाळा
१९६३ ते १९६४ हे शैक्षणिक वर्ष मी कोल्हापूरला होतो. माझ्याहून ३-४ वर्षांनी मोठी असलेली माझी बहीण त्यावेळी कोल्हापूरला
शाळेत जायची. मी तीन-चार वर्षाचा होतो. मी
तिच्याबरोबर शाळेत जायचो आणि तिच्या
वर्गात तिच्याच बरोबर बसायचो. त्यावेळी अस सगळं
चालायचं. काही कळायचं नाही. मात्र कानावर जे
पडायचं ते कुठेतरी मेंदूत टिपलं जायचं. त्यामुळे फॉर्मली शाळेत न जाताच अगदी दहापर्यंतचे पाढे माझे तोंडपाठ झाले होते. लिहिता येत नव्हतं पण काही कविता सुद्धा तोंडपाठ झाल्या होत्या.
१९६४ ला जूनच्या
सुमारास माझ्या वडिलांनी कुटुंब पुन्हा एकदा मुंबईला हलवलं व आम्ही घाटकोपरला
राहायला आलो. मला शाळेत टाकायचं एवढं माझं वय झालं होतं, म्हणजे चार वर्षे पूर्ण झाली होती. वडिलांना
मला त्यावेळी इंग्रजी माध्यमात घालावे अस वाटू लागलं होतं.
पण आमच्या घराजवळ ‘फातिमा हायस्कूल’ ही
विद्याविहारला असलेली एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा होती पण ती कॉन्व्हेंट होती.
त्या शाळेत माझ्यावर वेगळेच धार्मिक संस्कार होतील हे माझ्या
वडिलांच्या त्यावेळेस लक्षात आलं आणि त्यांनी तो पर्याय नाकारला. जवळ दुसरी कुठचीच खाजगी शाळा उपलब्ध नसल्यामुळे कदाचित नाईलाजाने म्हणा पण
वडिलांनी मला म्युनिसिपालिटीच्या शाळेत घालायचं ठरवलं.
शाळेत
ऍडमिशन घेण्यासाठी माझे वडील मला घेऊन जेव्हा गेले तेव्हा थोडा उशीरच झाला होता.
माझे वडील मला घेऊन मुख्याध्यापकांना भेटले. 'लोणे' गुरुजी त्यावेळी मुख्याध्यापक होते. त्यांच्या
केबिनमध्ये वडील मला घेऊन ज्यावेळी शिरले तेव्हा त्यांनी पहिलीची ऍडमिशन फुल झाली
आहे, तुम्ही दुसऱ्या म्युनिसिपल शाळेत प्रवेश घ्या म्हणून
सांगितलं. त्यावेळी पहिलीची काही मुलं
नापास होतात आणि दुसरीच्या इयत्तेत काही जागा रिकाम्या असतात याचा वडिलांना अंदाज होता. त्यामुळे त्यांनी लोणे गुरुजींना मला
दुसरीच्या वर्गात प्रवेश द्यावा म्हणून विनंती केली. लोणे
गुरुजींना थोडसं आश्चर्य वाटलं. मी खूपच लहान होतो. वय केवळ चार वर्षे पूर्ण होतं. पण त्यांनी मला काही
प्रश्न विचारले. मी दहापर्यंतचे पाढे,
जे माझ्या तोंडपाठ होते, बोलून दाखवले.
काही कविताही, ज्या पाठ होत्या त्या
बोलून दाखवल्या. माझ्या सुदैवाने लोणे गुरुजींनी माझ्याकडून
काही वाचून घेतलं नाही कारण मला त्यावेळी लिहिता किंवा वाचता येतच नव्हतं.
तोंडी परीक्षेत मी पास झालो होतो व त्यामुळे लोणे गुरुजींनी मला
डायरेक्ट दुसरीच्या वर्गात प्रवेश दिला.
दुसरीच्या वर्गात आम्हाला दोन
बाई होत्या. त्यातल्या एक ‘एक’ वेणी घालायच्या तर दुसऱ्या ‘दोन’ वेण्या घालायच्या. त्यातल्या एका बाईचं
नाव 'साळगावकर' होतं एवढ आठवतं. ‘वासरात लंगडी गाय
शहाणी’ यानुसार मी दुसरी मध्ये प्रथम क्रमांकाने पास झालो.
त्यानंतर तिसरी मध्ये 'जाधव' गुरुजी तर चौथी मध्ये 'गावकर' गुरुजी
मला शिकवायला होते. दुसरी, चौथी मध्ये दोन्ही शिक्षक अतिशय
प्रेमळ होते पण तिसरी मधले 'जाधव' गुरुजी मात्र भलतेच
मारकुटे निघाले. सुदैवाने मी अभ्यासात हुशार
असल्यामुळे व नेहमीच पहिला येत असल्यामुळे 'जाधव' गुरुजीनी मला ना कधी दम दिला, ना कधी मारलं. उलट त्यांनी एक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, स्वच्छता मंत्री असं वर्गाचे
मंत्रिमंडळ बनवलं होतं त्यात मला शिक्षण मंत्री बनवला. अवघ्या सहाव्या वर्षी मी अशा रीतीने 'मंत्री' झालो.
म्युनिसिपालिटीच्या शाळेत एक चांगली गोष्ट होती. घरचा अभ्यास करायची काही पद्धत
नव्हती. शाळेत शिकवायचे तेवढेच खरं.
बाकी मुलांना जे काही वाटायचं ते त्यांनी करायचं. घरचा
अभ्यास घ्यायची जबाबदारी व तो तपासायची जबाबदारी सुद्धा घरच्यांची. तसा आमच्या विभागात कोणी आपल्या मुलाचा घरचा अभ्यास घेतला असेल असं आज
तरी मला वाटत नाही.
पाटी व
चुन्याची पेन्सिल हे अभ्यासाचे प्रमुख साधन. मराठी, गणित व इतर एक दोन पुस्तकं सोडली तर बाकी
काहीच साहित्य लागायचं नाही. वह्या प्रत्येकाने
आपापल्या ऐपतीनुसार व गरजेनुसार आणायच्या. नाही आणल्या तरी
गुरुजी काही बोलायचे नाहीत. त्यांना विद्यार्थ्यांच्या
पालकांच्या सांपत्तिक स्थितीची पूर्ण कल्पना असायची.
त्यावेळी
देखील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये काही ना काही तरी आहार मिळायचा. पाव लिटरच्या बाटलीतून मुलांना दूध मिळायचं. कधी
खारे शेंगदाणे तर कधी बिस्किट मिळायची. बिस्किट सुद्धा मारी
असायची. क्वचित प्रसंगी बनपाव
खाल्लेले सुद्धा मला आठवतात. बिस्किट तर एवढी
मिळायची की कधीकधी एक्स्ट्रा बिस्किट मुलं दप्तरातून सुद्धा घरी न्यायची. पोरांचे खिसे शेंगदाण्याने भरलेले असायचे.
त्यावेळच्या
म्युनिसिपालिटीच्या
शाळेमध्ये सुद्धा अतिशय उत्तम शिक्षक असायचे व ते शिकवायचे सुद्धा चांगलं. त्यामुळे माझ्या प्राथमिक शिक्षणाचा मजबूत पाया म्युनिसिपालिटीच्या शाळेत
रचला गेला याचा मला खूप अभिमान आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा