क्रीडा संस्कृती
चाळीतले दिवस असे होते की
पोरांना खेळ खेळायला साधनच उपलब्ध नव्हती. क्रिकेट खेळायला बॅट, बॉल, स्टंप लागतात. त्यातला स्टंप सोडा, कारण दगड विटा रचून सुद्धा स्टंप बनवू शकतात पण बॅट आणि
बॉल तर हवाच ना. त्यामुळे चाळीची स्वतःची एक क्रीडा परंपरा आणि क्रीडा संस्कृती होती. ज्या खेळांना काहीही साहित्य लागत
नाही किंवा जे साहित्य आपण स्वतःच बनवू शकतो असेच खेळ खेळले जायचे. काही खेळ तर
असे होते की ज्यांना जे साहित्य लागतं ते अतिशय स्वस्तात उपलब्ध असायचं. त्यामुळे कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या, पकडापकडी, लपाछपी, गोट्या, लगोरी सारखे खेळ लोकप्रिय
होते. पावसाळ्यात छत्र्यांच्या काड्या चिखलात रुतवत जाणं असो किंवा एखाद्या लोखंडी सळईला गोलाकार देऊन त्याची
गाडी करून ती रस्त्यावरून फिरवणं असो, सारं काही अगदी सहज व्हायचं. भोवरा खेळणं हे स्वस्तात मिळणाऱ्या भोवऱ्यांमुळे परवडत होत तर पतंग उडवणं
हे त्यातल्या त्यात श्रीमंतांच काम होतं.
चाळीच्या आजूबाजूला खुल्या
मैदानाची तशी पूर्वीपासूनच कमतरता. पण तरीही कबड्डी साठी जागा शोधून ते मैदान तयार करणे यासाठी
चाळीतली पोरं अमाप कष्ट घ्यायची. कोणाच्यातरी घरातून 200 वॉटचा तात्पुरता बल्ब लावून
कबड्डीची प्रॅक्टिस व्हायची. पण याच प्रॅक्टिस मधून अगदी शिवछत्रपती पुरस्कारांपासून आशियाड मधील कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारे कबड्डीपटू निर्माण झाले आहेत. चाळीमधल्या अशा छोटेखानी
मैदानात मेहनत करून चाळीतल्या पोरांनी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये व सरकारी
खात्यांमध्ये नोकरी मिळवली व आपले जीवन सुखी केलं. चाळीमध्ये खेळल्या जाणाऱ्या या
खेळांमुळे मुलं व्यसनी बनण्यापासून वाचली एवढेच नव्हे तर त्यांच्यात संघ भावना, खेळाडू वृत्ती जागृत तर झालीच पण शरीरसंवर्धन पण झाले.
आजच्यासारखं त्यावेळी
जिम्नेशियमचं पीक आलं नव्हतं. आजकाल पैसे देऊन व्यायामशाळेची
मेंबरशिप घेतली जाते व चार-पाच दिवस जाऊन झाल्यावर तिथे जाणच बंद होतं. अशावेळी चाळीच्या गच्चीत केवळ विटांवर दंड-जोर मारणारी व चोरबाजारातून
विकत आणलेल्या डंबेल्सवर व्यायाम करणारी चाळीतली पोरं ही आजच्या पिढीला नक्कीच
आयडॉल आहेत.
चाळीमध्ये कबड्डी बरोबर खो-खो
किंवा आट्यापाट्या यासारखे मैदानी खेळ खेळले जायचे पण ते सर्व चाळींमध्ये खेळले
जायचे असे नाही. आट्यापाट्या किंवा खो-खो खेळण्यासाठी लागणारी मैदान फक्त
ठराविक चाळींमध्येच उपलब्ध असायची. त्यामुळे ज्या चाळकऱ्यांकडे अशी मैदान उपलब्ध
नव्हती त्या चाळीतल्या पोरांना जिथे मैदानाची उपलब्धता आहे अशा इतर चाळीतल्या
मुलांची मैत्री करावी लागायची. पण ही मैत्री सुद्धा सहजच व्हायची.
परंतु या खेळाव्यतीरिक्त
आबा-दुबी, डॉज-बॉल, लपा-छपी, चोर-पोलीस आदी खेळ सर्रास खेळले जायचे. मोठ्यांकडून पोर
पत्त्यातले जुगाराचे डाव पण शिकायचे. तीन पत्ती हा फेवरेट. मग त्यासाठी सिगारेटची पाकीट, थंड पेयांच्या बाटल्यांवरची
बुच, माचिसचे बॉक्स, पुस्तक व वह्यांवर चिटकवणारी लेबल्स आणि सगळ्यात फेवरेट
म्हणजे काचेच्या गोट्या यांची हारजीत व्हायची. जिंकलेली ही संपत्ती घरामध्ये कुठे
लपवून ठेवायची हा प्रश्न चाळीतल्या प्रत्येक पोराला पडायचा.
तीन पत्ती खेळण्यासाठी लागणारी
सिगरेटची पाकिट किंवा बाटल्यांची बूच जमवण्यासाठी पोर सतत इकडे-तिकडे फिरत असायची
व रस्त्यावर पडलेले ही संपत्ती जमा करायची. या संपत्तीचा पोरांना एवढा
अभिमान असायचा की काही ‘श्रीमंत’ पोरं तर तीन पत्ती खेळायला गोल्ड स्पॉट, ड्यूक्स, सोडा लेमन, आदी थंड पेयांचे बिल्ले
पिशवीतून घेऊन यायची.
चाळी-चाळीच्या टीम असायच्या. क्रिकेटची टीम वेगळी तर कबड्डीची टीम वेगळी. सुट्टीच्या दिवसात दुसऱ्या
चाळीच्या टीम बरोबर क्रिकेट किंवा कबड्डीची मॅच घेणे हे सहज होत. बक्षीस म्हणून क्रिकेटला एक रुपया दहा पैसे तर कबड्डीला ७० पैसे असायचे. त्यासाठी प्रत्येक पोरगा दहा पैसे काढायचा. ज्याची बॅट असायची तो क्रिकेटचा कॅप्टन व्हायचा व जो ७० पैसे जमा करायचा तो कबड्डीचा कॅप्टन असायचा. कित्येक वेळा तर मॅच हरतो आहे हे कळल्यावर आता पैसे द्यावे
लागतील म्हणून काहीतरी खुसपट काढलं जायचं व भांडण करून मॅच रद्द करून पळून जायचं
असही व्हायचं.
कठीण चुन्यापासून बनवलेली किंवा क्वचित प्रसंगी संगमरवरी दगडापासून
बनवलेली मोठ्या आकाराची जी गोटी असायची त्याला 'कोय' म्हणायचे व या 'कोय' गोट्यांपासून
खेळण्यात येणारा सगळ्यात पॉप्युलर गेम हा 'कोयबा' असायचा.
चाळीमध्ये पोरं केवळ जेवायला व
झोपायला आपल्या घरी असायची. बाकी अख्खा दिवस घराच्या बाहेरच असायची. अख्खा दिवस घराच्या बाहेर असल्यामुळे चाळीतल्या पोरांना
पब्लिक रिलेशनच प्रशिक्षण अगदी लहानपणापासूनच मिळत गेलं. त्यामुळे चाळीतली पोरं पुढील
आयुष्यात अगदी कुठच्याही क्षेत्रात गेली तरी त्यांच मित्रमंडळ कमी झालं नाही. आजकाल फ्लॅट संस्कृतीत एकट रहायची सवय असलेल्या मुलांना मित्रमंडळीच नसतात. त्यामुळे कधी-कधी नैराश्य
येतं. चाळीमधल्या पोरांना नैराश्य कधी आलच नाही. त्यांना कोणतेही मानसिक आजार झालेच नाहीत. ती जी घडली ती समूहात, घोळक्यात व गर्दीत. त्यामुळे त्यांची सामाजिक वाढ जबरदस्त झाली. आजचे बहुतेक
विशेषता मुंबईतील नेते हे चाळ संस्कृतीत जन्मले ते यामुळेच.
छान शब्दांकन! ते दिवस डोळ्यासमोर उभे राहिले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवागेले ते दिन गेले... राजन वालावलकर
हटवाजबरदस्त स्मरणशक्ती, खुसखुशीत शैली. .........
उत्तर द्याहटवा