माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

 रेशनिंगचे दिवस

 


 

आमचे चाळीतले दिवस आणि 'लायसन्स राज' हे एकत्र नांदले.  देशामधली गरिबी आणि चाळीमधली गरिबी यांच्यामधली सीमारेषा अतिशय पुसट होती. किंबहुना देशातल्या गरीबीचे खरेखुरे प्रतिबिंब चाळीमध्ये उमटले होते.


ते दिवस रेशनिंगचे होते. दूध सुद्धा खुल्या बाजारात मिळत नसायचे. ते सरकारी दूध केंद्रावरच मिळत असे. त्यासाठी सुद्धा एका 'कार्ड' ची गरज असायची. ॲल्युमिनियमचे साधारण सहा इंच बाय चार इंच आकाराचे हे कार्ड सरकार द्यायची. ज्यावर तुम्हाला दिवसाला किती दूध मिळू शकतो हे लिहिलेलं असायचं. दुधाचे दोन प्रकार होते. एक होल दूध आणि दुसरं टोंड दूध. होल दूध म्हणजे ताज म्हशीचं दूध व टोंड दूध म्हणजे दुधाच्या भुकटी पासून बनवलेलं दूध.


आता टेट्रापॅक किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांचा  जमाना आहे आणि दूधही त्यातूनच मिळतं. पण त्यावेळी मात्र दुधासाठी एक लिटरच्या बाटल्या असायच्या आणि दूध देखील एक लिटर किंवा त्याच्या पटीतच मिळायचं. टोंड दुधाला चंदेरी रंगाच ॲल्युमिनियम फॉईलच झाकण असायचं तर होल दुधाला तशाच रंगाच पण त्यावर निळ्या पट्ट्या असलेल झाकण असायचं. रंगाच्या या फरकामुळे होल दूध कोणतं व टोंड दूध कोणतं हे लगेचच कळायचं.


भल्या पहाटे हे दूध केंद्रात यायचं व प्रत्येक जण सकाळी उठून हे दूध घेण्यासाठी दूध केंद्रावर जायचा. दुधाची कमतरता असल्यामुळे कार्ड असून देखील कित्येक वेळा दूध मिळायचं नाही. त्यामुळे सर्वात प्रथम जाऊन दूध घेण्यासाठी लोक लवकर उठायचे व रांगा लावायचे.


ज्या कोणाला सकाळी लवकर उठणं काही कारणास्तव शक्य नाही असे चाळकरी दूध आणण्याची जबाबदारी आपल्या शेजाऱ्यांना द्यायचे आणि शेजारी देखील हे काम करणं आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून त्यांना दररोज दूध घरपोच करायचे.


त्यावेळी अन्नधान्य देखील खुल्या बाजारात मिळत नसायचं आणि ते केवळ 'रेशनिंग शॉप' वरच उपलब्ध असायच. रेशनिंग शॉप वर देखील अन्नधान्याचा तुटवडाच असायचा. त्यामुळे रेशनिंग शॉप मध्ये तांदूळ किंवा गहू येणार अशी बातमी कळताच मोठी झुंबड उडायची व अगदी लाईन लावून लोक रेशन घ्यायचे. कित्येक वेळा तर उशीर झाला तर रेशन मिळणार नाही म्हणून लोक रात्रभर रेशनच्या दुकानासमोर लाईन लावून असायचे. काही जण आपल्या पिशव्या व त्यावर दगड ठेवून आपला नंबर रिजर्व करायचे.


तांदूळ, तेल, डाळी, साखर आणि इंधनासाठी लागणार केरोसीन याचा तुटवडा हा नित्याचाच होता.  काही प्रमाणात काळ्या बाजारात या गोष्टी उपलब्ध ही व्हायच्या पण चढ्या  भावाने त्या विकत घेण्याएवढी ऐपत चाळकऱ्यांची नव्हती. त्यामुळे सरकारी यंत्रणेतून मिळणाऱ्या गोष्टींवरच बहुतेक चाळकरी अवलंबून असायचे. पण अशाही परिस्थितीमध्ये एखाद्याकडे एखाद्या गोष्टीची टंचाई असल्यावर शेजारी त्याला स्वतःहून त्या गोष्टीचा पुरवठा करायचे. कधी ना कधीतरी सगळ्यांनीच अडचण अनुभवलेली असल्यामुळे दुसऱ्याच्या अडचणीची त्यांना चांगलीच जाण होती आणि म्हणून एकमेकांना सहकार्य करण्यासाठी कोणीच कधी हात आखडता घेतला नाही.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा