माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

 

शिक्षण संस्कृती

 

चाळीमध्ये शिक्षण संस्कृती नावाचा काही प्रकारच नव्हता. पोराला शाळेत घातल्यानंतर त्याला शिकवायची जबाबदारी शिक्षकांची व शाळेची. त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही असाच बहुदा सर्व पालकांचा समज असावा. त्यामुळे एखाद-दोन घर जर सोडली तर कधी पोर अभ्यासाला बसली आहेत, अभ्यास करत आहेत आणि पालक त्यांचा अभ्यास घेत आहे असं चित्र कमीत कमी आमच्या तरी चाळीमध्ये नव्हतं. परीक्षा आली की थोडाफार अभ्यास करायचा आणि त्यातल्या त्यात एसएससी ची मुलं यांनीच अभ्यास करायचा असं बहुदा सर्वांचं मत असावं. पालकांची सुद्धा मुलांकडून फार काही अपेक्षा नसायची. मुलगा पास झाला की खूप झालं हेच त्यांचं मत असावं.  पहिला-दुसरा येणं हे आपल्या मुलाचं काम नसून ते तिसऱ्याचच काम आहे. त्यामुळे तिसऱ्याच्या कामात आपण ढवळाढवळ का करावी? हा विचार बहुदा पालक करत असावेत.

 

त्यावेळी होमवर्क, घरचा अभ्यास, असा प्रकारच नव्हता. ट्युशन्स, कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट ट्युशन्स हे फक्त श्रीमंतांचे चोचले आहेत यावर सगळेजण ठाम होते, फक्त 'ढ' मुलांना ट्युशन लागतात आणि आपला मुलगा हुशार आहे त्यामुळे त्याला ट्युशनची गरज नाही अशी बहुतेकांनी सोयीस्कर समजूत करून घेली होती. याला दुसरं कारण असं होतं की प्रत्येकाची घरे एवढी छोटी असायची व माणसं एवढी जास्त असायची की अशा परिस्थितीत मुलांना अभ्यास करणंही कठीण असायचं. त्यामुळे ज्याला खरंच अभ्यास करायचा असायचा तो बहुतेक वेळा गच्चीत जाऊन अभ्यास करायचा.


आमच्या चाळीत मला आठवत नाही कोणी कधी नवीन पुस्तक विकत घेतली असतील. पुढच्या वर्षाची पुस्तक कोणाकडून घ्यायची हे बहुतेक आधीच ठरलेल असायच. जो पोरगा किंवा पोरगी आता सातवीतून आठवीत जाणार आहे, ती आत्ताच आठवीत असलेल्या मुला किंवा मुलीकडून त्याची जुनी पुस्तक घ्यायचे आणि ही परंपरा सर्वांसाठी शेवटपर्यंत कायम राहायची. पुस्तकाची अशाप्रकारे सातवी किंवा आठवी आवृत्ती वापरली जाईपर्यंत, म्हणजे अगदी पुस्तक फाटेपर्यंत वापरले जाई.


ही पुस्तकं अगदी सात-आठ वेळा टिकण्याचं दुसरं एक कारण म्हणजे आमच्या चाळीतली पोर पुस्तक उघडून पण बघायचे नाहीत हे पण असू शकतं. त्यामुळे चाळीच्या शिक्षण संस्कृतीला साजेस असं पुस्तकाचं टिकणं पण होतं.


दरवर्षी वह्या घ्यायच्या म्हणजे एक उत्सवच असायचा. गेल्या वर्षीच्या जुन्या वह्यामध्ये राहिलेली पानं व्यवस्थित बाहेर काढून बाईंडरकडे घेऊन जायचं व ती जुनी पानं बाईंड करून पुन्हा वही बनवायची ही एक रीतच पडून गेली होती. आणि अशा तऱ्हेने जुन्या पानांची बाईंडींग करून पुन्हा बनवलेल्या वह्या सुद्धा आम्ही सगळे मोठ्या अप्रूपाने वापरायचो.


पुस्तक जुनी होती तरी शाळा सुरू व्हायच्या आधी प्रत्येक पुस्तकाला व वहीला कव्हर घालायचं हा एक मोठा कार्यक्रम असायचा. पण जर कव्हर घालायचं तर जी काही खाकी कागद मिळायची ती पण थोडी कॉस्टलीच होती. त्यामुळे जुन्या वर्तमानपत्राची कव्हर्स घालणं यात कोणालाच काही कमीपणाचं वाटायचं नाही.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा