‘नाम’ महात्म्य
चाळ संस्कृतीत मुलांना पाळण्यातील नाव ठेवण्याचा अधिकार जरी
आई-वडिलांकडे असला तरी त्यांना बोलीभाषेतलं नाव ठेवण्याचा अधिकार हा सर्वस्वी
चाळवाल्यांचा असतो. त्यामुळे चाळीमध्ये राहणाऱ्या
प्रत्येक मुला-मुलीला आणि विशेषतः मुलांना, त्यांच्या पाळण्यातल्या नावाने नाही तर चाळकऱ्यांनी
ठेवलेल्या नावानेच ओळखले जाते. वैशिष्ट्य हे की ही नावे कितीही बेक्कार असली आणि काही
प्रमाणात अपमानास्पद असली तरी त्या मुलांना देखील त्याची एवढी सवय होऊन जाते की
कालांतराने त्यांना चाळकऱ्यांनी ठेवलेले नाव हेच आपले खरे नाव आहे असे वाटू लागते. चाळकऱ्यांनी ठेवलेल्या नावाने
हाक मारल्यानंतर त्याला प्रतिसाद देणे हे अगदी स्वाभाविक असते.
मी ज्या चाळीत लहानाचा मोठा झालो त्यामध्ये एक मंगलोरी
ख्रिश्चन कुटुंब राहायचं. त्याच्या पहिल्या मोठ्या मुलाचं, जेराल्डच नाव ‘जेरी’ कधी झालं व रिचर्डचं नाव ‘रीची’ कधी झालं हे त्याच्या
आईवडिलांना सुद्धा कळलं नाही. नशिबाने त्याच्यानंतर झालेल्या ‘बॉबी’ आणि ‘शम्मी’ या दोन मुलांची नावे ही एवढी
लहान होती की त्यांना कात्री लावून नवीन नाव करणे हे चाळकऱ्यांना सुद्धा शक्य झालं
नाही.
चाळीमध्ये एकाच नावाची अनेक पोरं असतात. आणि मग गोंधळ होतो. चाळकरी अतिशय कल्पकतेने त्या
मुलांच्या नावापुढे असं काही विशेषण जोडून देत की मग सारं काही सुरळीत होतं. आमच्या चाळीत तीन अशोक होते. त्यातल्या एकाला लहानपणीच पोलिओ झाल्यामुळे तो लंगडायचा. त्यामुळे त्याला 'लंगड्या' अशोक, तर दुसऱ्या अशोक पटेलला 'डालड्या' अशोक या नावाने हाक मारून
चाळीने नामसाधर्म्यातील प्रश्न चुटकी सारखा निकाली काढला. आमच्या समोरच्या चाळीत दोन
पोरं होती. त्यातला जो मोठा होता त्याचा
चेहरा पसरट होता. त्यामुळे त्याला 'चपट' अशी व जो लहान होता
त्याचाही चेहरा चपटा होता त्यामुळे त्याला 'पापलेट' अशी हाक मारायचो. चाळीत एक पोरगं सतत आजारी
असायचं. त्यामुळे वैद्यांनी त्याला
शेळीचं दूध पाजा असा सल्ला दिला. त्याच्या वडिलांनी चक्क बकरीच विकत घेतली व चाळीत ठेवली. त्या दिवसापासून त्या पोराच्या
आईला लोकं ‘बकरीवाली’ बोलायला लागले.
प्रकाशच 'पक्या' होणं हे तर स्वाभाविक पण त्याचबरोबर 'काळ्या' पक्या व 'गोरा' पक्या अशी त्यांची वर्गवारी करून ओळख पटवून देणं ही चाळकऱ्यांची
खासियत होती . त्यामानाने चाळकऱ्यांनी त्यांचा नाव ठेवण्याचा जन्मसिद्ध अधिकार
मुलींच्या बाबतीमध्ये फारसा राबवला नाही याचं कारण त्यांची कुचेष्टा थांबवणे हा देखील असावा. चाळ संस्कृती ही अशी मुलींच्या
आणि स्त्रियांच्या हिताच्या संरक्षणाच्या व इज्जतीच्या रक्षणाकरता होती हेही
यावरून दिसतं.
‘सावंत’ चा ‘सावत्या’ व ‘वालावलकर’ चा ‘वाल्या’ हे तर अगदी कॉमन आहे. पण चाळीत अतिशय कंजूषपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या कोचरेकर
काकूंना ‘चिकू’ म्हणूनच ओळखलं जायच. चाळीतील समस्त दाक्षिणात्यांना ‘मद्रासी’ व समस्त उत्तर
भारतीयांना ‘भैय्या’ म्हणणं कोणालाही वावग
वाटत नसायचं. चाळीतील एका घरी जुळे भाऊ
होते. त्यांचं खर नाव अजूनही मला माहीत नाही. सगळे जण त्यांना ‘आंडू’ आणि ‘पांडू’ या नावानेच हाक मारत. एकाच्या आई-वडिलांनी मोठ्या हौसेने
त्यांच्या मुलाचे नाव ‘हर्षवर्धन’ असे ठेवले होते. चाळकऱ्यांना येवढे मोठे व अवघड नाव रुचणे
कदापी शक्य नव्हते. म्हणून ‘गुंडू’ असे साधे व सुटसुटीत नाव ठेवून त्याचा नामकरणविधी
चाळकऱ्यांनी पार पाडला.
चाळीमध्ये बहुतेक प्रौढ महिलांना त्यांच्या मुलांच्या
नावावरून ओळखलं जायचं. बंटीची आई, सुनीलची आई किंवा प्रमिलाची आई याच नावाने त्यांना सहसा हाक
मारली जायची तर प्रौढ पुरुषांना त्यांच्या आडनावाच्या मागे, जसं वाटेल तसं, काका किंवा मामा हे शेपूट
लावून उल्लेख केला जायचा.
चाळ सोडून आज अनेक वर्षे झाली. चाळीतली त्यावेळीची अनेक
पोरं आता अगदी म्हातारी झाली. आपापल्या आयुष्यात यशस्वी झाली. मोठी अधिकारी झाली. तरीही आज भेटल्यानंतरही
त्यांना 'चपट्या' अशी हाक मारली तरी त्यांना काहीही अपमानास्पद वाटत नाही. किंबहुना हा आपला चाळीतला जुना
मित्र अशीच ओळख पटते. चाळ संस्कृतीतील हे 'नाम महात्म्य' ही चाळ
संस्कृतीची एक मोठी ओळख आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा