माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट
रविवार, १९ जानेवारी, २०२५
अतरंगी पोर
जशी सगळीकडे असतात तशी चाळीमध्ये सुद्धा अतरंगी पोरांची काही कमी
नव्हती. तसं या पोरांचं अभ्यासात लक्ष कमी आणि उडानटप्पूपणा
करण्याकडे जास्त ओढा. चाळीमध्ये तसाही पोरांना
आई-वडिलांचा फारसा धाक नसायचा आणि ह्या अतरंगी पोरांना तर नव्हताच नव्हता.
चाळीत पाळलेल्या
कोंबड्या खुडूक झाल्या म्हणजे अंडे देईनाशा झाल्या की त्यांच्या पायाला एक दोरी
बांधायची व त्या दोरीला एखादा पत्र्याचा डबा बांधायचा. कोंबडीला द्यायचं सोडून. मग कोंबडी धावत पुढे आणि मागून तो आवाज करणारा डबा. त्या आवाजाने कोंबडी आणखीन घाबरायची व आणखीन जोराने पळत सुटायची.
तिच्यामागे सारी अतरंगी पोरं लागायची.
परंतु काही मुलं हुशार
होती. पावसाळ्याच्या दिवसात ते बाहेर परात ठेवत. पावसाचं परातीत जमलेले पाणी शुद्ध असायचं. ते
पाणी, ती मुलं माशांना पाळण्यासाठी वापरायचे. त्यामुळे
मासे थोडे जास्त दिवस जगत.
छोट्या-मोठ्या चोऱ्या करणं
यात या अतरंगी पोरांना थ्रील वाटायचं. केळीवाला, फळवाला जिन्यातून वरून खाली उतरत असताना त्याच्या डोक्यावर जी टोपली
असायची त्यातून फळ चोरण्यामध्ये काही जणांचा हातखंडा
होता. एकदा एका केळीवाल्याच्या टोपलीत केळीचा फक्त एक
घड उरला होता. म्हणजे साधारण एक डझन केळी उरली होती.
एका अतरंगी पोराने ती वरच्यावर उचलल्यानंतर त्या केळीवाल्याचं
डोक्यावरच वजन एकदम हलकं झालं आणि त्या अतरंगी पोराची चोरी पकडली गेली.
चाळीमध्ये लग्न होऊन
नव्यानेच चाळीत प्रवेश करणाऱ्या नववधूच्या किंवा हॉस्पिटलमध्ये जन्माला येऊन
प्रथमच चाळीत येणाऱ्या बाळाच्या अंगावरून काही जण नारळ उतरवत असत. हा
उतरवलेला नारळ फोडून बाजूला फेकून देत असत. हे नारळ
बिनधास्त खाणारी पोरं हीच खरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यावेळचे कार्यकर्ते
होते. एवढेच कशाला, लहान बाळांना
दृष्ट लागू नये म्हणून दर शनिवारी आपल्या पोरांवर लिंबू फिरवून ते चाळीच्या बाहेर
टाकून देण्याची काही जणांची प्रथा होती. आमच्या चाळीतली काही पोरं तर ही लिंब पण उचलायची व त्याचे लिंबू सरबत करून
प्यायची.
.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा