माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

 

चाळीतले उत्सव




चाळीमधले सार्वजनिक उत्सव म्हणजे बिन पैशाचा तमाशा होय. म्हणजेच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त मजा. होळी असो किंवा दहीहंडी, संक्रांत असो किंवा गुढीपाडवा, दसरा असो किंवा दिवाळी, चाळीमध्ये प्रत्येक सण साजरा करायची परंपराच होती. नव्हे चाळकऱ्यांना असं वाटायचं की प्रत्येक क्षण साजरा होण कंपल्सरीच आहे.


आम्हा पोरांना मात्र होळीपेक्षा दुसऱ्या दिवशीच्या शिमग्याची जास्त ओढ असायची. पण होळीसाठी खड्डा खणण्यापासून लाकडं जमा करेपर्यंत सगळी काम चाळीतली वानरसेना अगदी चोखपणे बजावित से.  घाटकोपरच्या पूर्वेला म्हणजे साधारण णेआम्ही राहतो तिथपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर खाडी होती. आणि खाडीलगत खारफुटीची जंगले होती. त्यावेळी सीआरझेड पण नव्हतं आणि ही लाकडं तोडायला फार काही बंदी वगैरे प्रकार पण नव्हता. आणि जर असलाच तर तो आम्हाला माहित नव्हता आणि जर कोणाला माहित जरी असता तरी पोरांनी त्याची काही परवा केली नसती असा मूड होता. त्यामुळे घरातलेच नारळ फोडायचे कोयते घेऊन आम्ही खारफुटीकडे जायचो आणि तिकडची लाकडं तोडून त्याच्या मोळ्या बांधून त्या चाळीपर्यंत आणायचो. एकेका वेळी आम्ही पन्नास-पन्नास पोरं जायचो म्हणजे विचार करा किती लाकड आणत असू.  


घाटकोपर स्टेशनच्या जवळ म्हशीचे तबेले होते. तिथे शेण्या मुबलक मिळायच्या. मात्र त्या घेण्यासाठी पैसे द्यावे लागायचे. तबेलेवाला शेकड्याच्या भावात शेण्या द्यायचा आणि मग या शेण्या आणि खारफुटीची लाकडं याने आमची होळी सजवली जायची. कुठून तरी चोरून आणलेलं जुनाट फर्निचर एकदा का होळीने पेट घेतला की त्यात टाकलं जायचं आणि मग ज्याचं फर्निचर चोरल आहे त्याच्या नावाने ठणाणा करत बसायचं.


होळीमध्ये चाळकरी आणि विशेषता महिला, मोठ्या उत्साहाने पूजा झाल्यानंतर नारळ अर्पण करीत. नारळ टाकल्या टाकल्या पोरांच्या हातात असलेल्या लांबच लांब काठ्यांच्या मदतीने तो बाहेर काढण्याची चढाओढ लागायची आणि जोपर्यंत तो नारळ बाहेर येत नाही तोपर्यंत तो खरपूस भाजला देखील जायचा. असा बाहेर आलेला नारळ फोडून त्याचं खरपूस खोबरं खाण्यामध्ये जी मजा यायची त्याला तोडच नाही. होळीच्या दुसऱ्या दिवशी चाळीतली पोरं एकत्र येऊन अगदी प्रत्येक घरासमोर आईना का बायना घेतल्याशिवाय जायना हे गाणं म्हणत नाच करायची व जोपर्यंत घरचा मालक किंवा मालकीण बाहेर येऊन काहीतरी पैसे देत नाही तोपर्यंत घराच्या समोरून हलायचे नाहीत. 


आमच्या चाळीत तीस कुटुंब राहायची. अगदी घरटी आठ आणे पकडले तरी पंधरा रुपये जमा व्हायचे. त्यावेळी हे खूप झाले. आमच्या पोराटोरांना हे पंधरा रुपये म्हणजे भेळ आणि कुल्फीसाठी पुरेसे व्हायचे. अंगाला रंग फासून प्रत्येकाच्या घरासमोर नाचायला खूप मजा यायची आणि स्वतःच्याच घरासमोर नाचताना, स्वतःच्याच आई-वडिलांसमोर हट्ट करून जास्तीचे पैसे घेणे यात आणखीन मजा यायची.


चाळीची होळी जरी स्वतंत्र असली तरी चाळीची दहीहंडी मात्र पार्टनरशिप मध्ये व्हायची. कारण हंडीच्या दोराच एक टोक जरी आमच्या चाळीच्या वरच्या माळ्यावर बांधलेल असलं तरी दुसरं टोक बांधायला समोरची चाळ तर लागणारच. मग काय? आमची चाळ आणि समोरची चाळ यांच्यामध्ये करार व्हायचा. पार्टनरशिप व्हायची. आणि दहीहंडी एकत्र साजरी व्हायची.  मजबूत दोरखंड विकत आणून तो गच्च बांधायचं काम आमच्यातली सीनियर मंडळी करायची. मंडळी म्हणजे पोरच हो. पण आमच्याहून थोडी मोठी म्हणजे कॉलेज बिलेज मध्ये जाणारी.  त्याला हंडी अडकवायची. हंडीत दूध, दही, लोणी घालायचं. आजूबाजूला दोरीवर सफरचंद, काकडी सारखी फळ लटकवायची. हंडी फुलाने सजवायची आणि ती कोण फोडणार याची वाट बघत आम्ही चाळीत उभे असायचो.


अनेक सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळी आमच्या दहीहंडी खालून जायची पण आम्ही काहीही बक्षीस लावलेलं नसल्यामुळे ती न फोडताच पुढे जायची. अशा तऱ्हेने आमची हंडी कोणीच फोडत नसे. तशी तर ती आम्ही एवढ्या उंचावर बांधायचो की फोडायला गेलं तर सहा-सात थर तर नक्कीच लागतील. आता फुकटात एवढे थर कोण उभे करणार? त्यामुळे अगदी दुपारपर्यंत आमची हंडी 'अजिंक्य' रहायची.  दुपारी एक वाजल्यानंतर सर्व मंडळ संपायची मग आम्हीच ती हंडी तिसऱ्या स्तरापर्यंत खाली उतरवायचो व पोरं-पोरच तीन किंवा चार थर लावून स्वतःच फोडायचो. पण खरं सांगू का? एकदा मी स्वतः चौथ्या स्तरावर उभा राहून हंडी फोडायला गेलो तेव्हा माझे पाय कापत होते. आता लक्षात येतं की आठव्या, नवव्या, दहाव्या स्तरावर हे आधुनिक गोविंदा उभे राहून हंडी कशी काय फोडत असतील ते? हे लक्षात येऊन आश्चर्य तर वाटतच पण या आधुनिक गोविंदांचा अभिमान देखील वाटतो.


शिवजयंतीच्या दिवशी शिवाजीचा किल्ला बनवणे, तो सजवणे हे आणखीन एक आनंदाचे काम होतं. कुठून तरी माती आणायची. ती चाळायची. तिचा चिखल-गोळा बनवायचा आणि त्या चिखल-गोळ्याने तो किल्ला बनवायचा. किल्ला बनवायच्या आधी कुठून तरी दगड-विटा आणायच्या आणि छोटसं स्ट्रक्चर बनवायचं आणि त्यावर चिखल गोळ्याने सारवून किल्ला बनवायचा.  रंग पण कसले? निळ आणायची मग निळा रंग झाला, चुना आणायचा मग सफेद रंग झाला, शेंदूर आणायचा मग भगवा रंग झाला. गेरू तर सगळीकडेच उपलब्ध असायचा. चाळीमध्ये हमखास कोणीतरी उत्साही चित्रकार असायचा आणि मग तो या सर्व रंगांचा उपयोग करून अतिशय उत्तम रीतीने किल्ला रंगवायचा.  


एका वर्षी आठवतंय, बहुतेक ते कॉर्पोरेशनच्या निवडणुकीचे वर्ष असावं.  एका पक्षाचा एक उत्साही कार्यकर्ता होता. त्याने संपूर्ण विभागात उत्कृष्ट किल्ल्याला हजार रुपये, साडेसातशे रुपये, पाचशे रुपये व उत्तेजनार्थ अडीचशे रुपयाची पारितोषिके ठेवली होती. आम्हीही आमच्या किल्ल्यासाठी त्याच्याकडे अर्ज केला होता. आज त्या गोष्टीला 55 वर्ष झाली पण अजून त्या कार्यकर्त्याने पारितोषिक कोणाला मिळाल हे मूलदस्त्यातच ठेवल आहे.  दुःख या गोष्टीचा नाही की आमच्या चाळीच्या किल्ल्याला पारितोषिक मिळालं नाही, पैसे मिळाले नाही. दुःख या गोष्टीच आहे की तो कार्यकर्ता किंवा त्याचे निवड मंडळ आमचा किल्ला बघायला आले देखील नाहीत.


आमच्या विभागात पूर्वी एकच सार्वजनिक  गणेशोत्सव असायचा. अकरा दिवस असणाऱ्या या गणेशोत्सवात अनेक स्पर्धांचे आयोजन व्हायचं.  गाण्याच्या, वक्तृत्वाच्या, निबंधाच्या तसेच एकपात्री प्रयोगाच्या, अभिनयाच्या, वेशभूषेच्या तसेच चमचा-गोटी, धावणे, लंगडी आधी स्पर्धा असायच्या. विभागातील अनेक मुले त्यात भाग घ्यायची. काहीना बक्षीस मिळायची तर काहींना नाहीमागे वळून बघताना आरोप नाही, पण असं वाटतं की बहुतेक बक्षीस ही  मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याच ओळखीच्या व त्यांच्याच चाळीतल्या पोरांना मिळायची.  तरीही कोणी नाराज नसायचं. स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळतो यातच पोरं खुश असायची आणि आपला पोरगा काहीतरी करतो म्हणून पालकही खुश असायचे. आजकाल बक्षीसासाठी जी जीवघेणी स्पर्धा चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर त्यावेळच्या मुलांचं आणि पालकांचं मला आजही कौतुक वाटतं. 


आज विभागात प्रत्येक चाळी-चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तयार झाली आहेत. गणपतीची मूर्ती आणणे आणि आरास करणे, विसर्जन मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टिमवर व डेकोरेशनवर खर्च करण, नाचणं यावरच पैसे खर्च होत आहेत. हे बघत असताना त्यावेळी काही का असेना, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकमान्य टिळकांनी अपेक्षा केल्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं काम जे कार्यकर्ते करत होते त्यांना सलाम.

 

आमच्या चाळीत एक काय दोनच ख्रिश्चन कुटुंब होती. परंतु असं असूनही ख्रिसमस मात्र जोरात साजरा व्हायचा. याला  कारण 'बुढा'. ज्याला आज 'सांताक्लॉज' म्हणतात. आम्ही त्यावेळी त्याला 'बुढा' असं म्हणायचो. कुठून तरी जुनी शर्ट आणि पॅन्ट आणून त्यात जुने कापडाचे किंवा कापसाचे बोळे घुसवायचे व माणसासारखं स्ट्रक्चर तयार करायचं. कोणीतरी हुशार कलाकार चेहरा रंगवायचा. कोणाची तरी जुनी टाय त्याच्या गळ्यात अडकवायची. डोक्यावर फाटलेली हॅट असायची आणि अशा अवतारात त्या बुढ्याला आम्ही खुर्चीवर बसवायचो. आमची नाताळ साजरी करण्याची केवळ हीच पद्धत होती. मुख्य म्हणजे या बुढ्याच्या समोर आम्ही एक डबा ठेवायचो आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला त्याच्यामध्ये दान द्यायला सांगायचो. काही जण मनाने तर काहीजण आम्हाला वाईट वाटू नये म्हणून तर काहीजण आमच्या ओळखीचे असल्यामुळे काही ना काहीतरी त्या डब्यात घालायचे. परंतु या पैशावर आमच्या पोरासोरांचा काहीही हक्क नसायचा. चाळीतली जी मोठी पोर असायची म्हणे विशी पंचविशीची जी पोर असायची ती हे पैसे घ्यायची व ३१ डिसेंबर साजरी करायची.


रामनवमी, हनुमान जयंती व कृष्णजन्म हे उत्सव वैयक्तिक स्वरूपात ज्याच्या त्याच्या घरी साजरे व्हायचे. आमच्या चाळीत त्याला सार्वजनिक स्वरूप आलं नव्हतं.  पण एक आठवण म्हणून सांगतो. चाळीच्या सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद द्यायला कोण बसणार यावर खूप चढाओढ असायची. कारण कोणाला किती प्रसाद द्यायचा हे प्रसाद देणाऱ्याच्या हातात असायचं. प्रसाद देणारा पण पार्शलिटी करायचा व जवळच्या पोराला जास्त व ज्याच्याशी नेहमी भांडण होतं त्याला कमी प्रसाद द्यायचा.  त्यावेळी खूप तूप घातलेला, तूप म्हणजे काय डालडा, साजूक तूप कोणाला परवडते?खूप गोड असलेला प्रसाद रुपी शिरा जगातल्या कुठल्याही शिऱ्यापेक्षा किंवा स्वीटडिश पेक्षा गोड लागायचा आणि तो अधिक मिळावा म्हणून मनोमन वाटायचं देखील. एका गोष्टीचं मला आजही उत्तर मिळालं नाही की हातावर तीर्थ घेतल्यानंतर व ते प्याल्यानंतर डोक्यालाच हात का पुसतात? रुमालाने हात का नाही पुसत? कदाचित त्यावेळी चाळीमध्ये एक टक्क्याहून अधिक लोक रुमाल वापरतच नव्हते यात ते कारण दडल असण्याची शक्यता आहे. अर्थात अभ्यासुनी याचे उत्तर शोधणं अपेक्षित आहे.


प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन यासारखे राष्ट्रीय सण हे फक्त शाळा कॉलेज व शासकीय कार्यालयातच साजरे करायचे असतात असं बहुदा चाळकऱ्यांचे मत असावं. त्यामुळे मी ज्या चाळीत राहायचो त्या चाळीत हे सण कधी साजरे झालेले मला तरी आठवत नाहीत.  पण या दिवशी सुट्टी असल्यामुळे त्या सुट्टीचा उपयोग करून त्याच्या आदल्या दिवशी, जसं ज्याला जमेल तशा चाळकऱ्यांच्या वैयक्तिक सत्यनारायणाच्या पूजा मात्र व्हायच्या.  या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे चाळीमध्ये पाहुण्यांची खूप गर्दी असायची. त्यामुळे खेळ खेळायला जास्त सवंगडी मिळायचे हा या सुट्टीमुळे मिळणारा फायदा असायचा.


आजकाल अगदी घरच्यांना देखील व्हाट्सअपवर दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने घेऊन चाळीतल्या प्रत्येक घरात जाऊन त्या घरातल्या थोरा-मोठ्यांच्या पाया पडण्याची रीत किंवा प्रघात चाळीत होता. आमच्या चाळीत ३० बिरा होती. त्यातील दोन-चार सोडली तर प्रत्येक घरात जाऊन अगदी पायाला हात लावून नमस्कार करणं म्हणजेच दसरा साजरा करणं असं चाळीतल्या पोरांना वाटायचं.  दिवाळीमध्ये त्यातल्या त्यात जे श्रीमंत असायचे किंवा ज्यांचा बोनस झालेला असायचा ते फटाके विकत घ्यायचे व ते फटाके आपलेच समजून जे विकत आणू शकत नाहीत ते फोडायचे. मी तर सातवीपासून स्वतःहून फटाके वाजवणं सोडलं. मला तो पैशाचा अपव्यय वाटायचा. त्याचप्रमाणे फटाक्यातून निघणारा धूर देखील मला आवडायचा नाही. घरातून मी जे फटाक्यांसाठी म्हणून पैसे घ्यायचो त्यात मी इतरत्र सांगितल्याप्रमाणे रद्दीच्या दुकानात जाऊन पुस्तक विकत घ्यायचो व माझी लायब्ररी चालवायचो.


चाळीतील प्रत्येक घरावर एकाच प्रकारचा 'आकाश-कंदील' किंवा 'चांदणी' हवी यामध्ये चाळकऱ्यांचं एकमत होतं. त्यामुळे चाळीतली पोरं कुठून तरी बांबू आणायचे. बांबू तासायचे. त्याच्या काड्या तयार करायचे. सफेद जाडा दोरा विकत आणायचे  व त्याचा सुंदर असा कंदील किंवा चांदणी करायचे.  त्यावेळी क्रेप कागद विकत मिळायचे ते क्रेप कागद लावून चांदण्या किंवा कंदील सारख्या रंगाच्या, सारख्या दिसणाऱ्या बनवायचे व प्रत्येक घरासमोर ते लावले जायचे. यामुळे चाळीची एकता दिसायची.


दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात तयार केलेला फराळ शेजाऱ्यांना नेऊन दिला जायचा व त्याच्या बदल्यात शेजारीही आपला फराळ दुसऱ्यांच्या घरी पोहोचवायचे. सुरुवातीला कळायचं नाही म्हणून बरं वाटायचं पण नंतर नंतर कळायला लागलं की काही हुशार शेजारी स्वतःचा फराळ न देता दुसऱ्याने दिलेला तिसऱ्याला व तिसऱ्याने दिलेला चौथ्याला देत असत.  दोन वेगवेगळ्या घरातून आलेले लाडू सारखे का? या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागल्यानंतर हळूहळू ही प्रथा कमी होत गेली आणि आता ती जवळजवळ नाहीच आहे. अतिशय जवळचे शेजारी सोडून आता एकमेकांना फराळ देणं बंदच झाल आहे. 


खरं पाहिलं असता आता चाळीमध्ये पूर्वीसारखा फराळ करायचं  बंद झाला आहे. सगळं काही रेडीमेडच्या या जगात चाळीमध्ये आता फराळही बाहेरून विकत घेतला जातो. त्यामुळे तो सर्वांना वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जुन्या काळात अगदी चकल्या असो किंवा करंज्या, चार-पाच शेजारणी एकत्र येऊनच फराळ बनवायच्या व त्यात खरी मजा असायचीप्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करायला जमते तसे नाही. परंतु काही काही घरांची फराळ बनवण्यात स्पेशालिटी होती.  सुरेशची आई अतिशय सुरेख अशा चकल्या बनवायची ज्या अतिशय कुरकुरीत असायच्या तर तांबेकाकू अनारसे बनवण्यात माहीर होत्या.  जोशीकाकू बेसनचे अप्रतिम लाडू बनवायच्या तर खानविलकर मामींच्या करंज्याची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा