माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

 अद्भुत चाळ संस्कृती

 

 


 

चाळ ही एका प्रकारे एका मिश्र संस्कृतीचे प्रतीक होती. अमेरिकेला जसं 'मेल्टिंग पॉट' असं म्हणतात तसंच मुंबईच्या परिभाषेत आणि मुंबईच्या संदर्भात चाळ देखील एक 'मेल्टिंग पॉट' होतं.


चाळीमध्ये गुजराती, मारवाडी, काही प्रमाणात दक्षिणात्य व उत्तर भारतीय लोकही होते. पण प्रामुख्याने ८०% मराठी लोकच होते. त्यामुळे इतर भाषिक लोक संपूर्णपणे मराठी संस्कृतीत मिसळून जात. त्यांच्या आई-वडिलांना जरी शुद्ध मराठी बोलता येत नसल तरी मुलं मात्र अतिशय शुद्ध मराठी बोलत. कित्येक मुलं तर मराठी माध्यमातून शिकतही होती.


चाळीची भाषा ही मराठी होती. सगळेजण एकमेकांशी फक्त आणि फक्त मराठीतूनच बोलत. हिंदी कित्येकांना येतही नव्हती. माझ्या आईला तर असं वाटायचं की कुठच्याही वाक्याच्या शेवटी 'है' लावलं की हिंदी झालं. एवढं तिचं हिंदी अगाध होतं.  हिंदी चित्रपट व हिंदी गाणी पाहणे आणि ऐकण्या पुरताच चाळीचा हिंदीशी संबंध यायचा. चाळीमध्ये येणारे विशेषतः उत्तर भारतीय फेरीवाले देखील चाळकऱ्यांशी मोडक-तोडक का होईना, मराठीतच बोलायचे, कारण तो त्यांच्या धंद्याचा प्रश्न होता. 


सर्व भाषिक चाळकरी, चाळीच्या मराठमोळ्या संस्कृतीमध्ये जवळजवळ पूर्णपणे विरघळून गेले होते.  त्यामुळे केवळ मराठी भाषेत बोलणेच नव्हे तर ही मंडळी मराठी चित्रपट व नाटकाला सुद्धा आवर्जून जायचे.  त्यांना जरी मराठी वाचता येत नसलं तरी बोललेलं उत्तम कळायचं व बऱ्यापैकी बोलायलाही यायचं. त्यामुळे संवाद उत्तमपणे साधला जायचा. 


चाळीमध्ये एकमेकांनी केलेल्या स्वयंपाकाची गरजेप्रमाणे एक्सचेंज देखील व्हायची.  आमच्या शेजारी एक 'उडीपी' कुटुंब राहायचं. त्यांच्या दोन्ही मुलींना माझी आई करायची ती डाळीची आमटी खूपच आवडायची. त्यामुळे अगदी न चुकता रोज एक वाटी डाळीची आमटी त्यांच्या घरी त्या लहान मुलींसाठी पाठवणं हा अगदी माझ्या आईचा दिनक्रमच झाला होता. पण त्याच्या जोडीला उडीपी आंटीने केलेले इडली व डोसा सारखे पदार्थ ती मला सुद्धा न चुकता पाठवायची.


आणखीन एक कुटुंब 'मालवणी' होतं. ज्यांच्या घरी केलेली गरम मसाल्याची भाजी हा माझा जीव की प्राण होता.  जेव्हा केव्हा ते घरी गरम मसाल्याची भाजी बनवत त्यावेळी अगदी न सांगता ते माझ्यासाठी माझ्या घरी पाठवत.


काकू थोडं तेल देता? काकू थोडी साखर देता? काकू चहाची पावडर. संपली थोडी देता? काकू थोडं दूध देता का? यासारखे संवाद तर पालूपद असल्यासारखे चाळीत ऐकू यायचे. एकमेकांकडून घरगुती पदार्थांची उधारी घेणे यात ना कोणाला कमीपणा वाटायचा, ना लाज वाटायची.  अगदी सहजपणे आणि निर्व्याज्जपणे हे व्यवहार होत राहायचे हे चाळकऱ्यांच्या साधेपणाचं प्रतीक आहे असं मला वाटतं.


महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या जातीतील आणि काही प्रमाणात भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातील अनेक मंडळी चाळीत राहायची.  पण यांच्यामध्ये केवळ एकच साम्य होतो ते म्हणजे सर्वांची आर्थिक परिस्थिती थोड्या-बहुत प्रमाणात सारखीच होती.  ही सर्व मंडळी चाळीत राहताना आपल्या गुण-दोषांसहित चाळ संस्कृतीत मिसळून गेली होती. त्यामुळे चाळीमध्ये बोलली जाणारी भाषा सुद्धा या सर्व समावेशक संस्कृतीला आपल्या कवेत घेऊन बोलली जायची. अर्थात त्यात शिव्या देखील असायच्या पण या 'शिव्या' एवढ्या सहजतेने यायच्या की कित्येकांना त्या 'ओव्या' देखील वाटायच्या.  कोण कोणाला रागावून किंवा त्याचा पाणउतारा करण्यासाठी शिव्या द्यायचे नाहीत. पण अगदी अगबाई, अरेच्या असे सर्वसाधारण शब्द आपल्या मुखातून ज्या पद्धतीने बाहेर पडतात त्याच पद्धतीने बोलत असताना अनेकांच्या तोंडातून अगदी आई-बहिणी वरूनच्या शिव्या देखील बाहेर पडायच्या.  


अगदी लहानपणापासून या शिव्या ऐकायची सवय लागल्यामुळे ना लहानांना त्याबद्दल काही वाटत से ना मोठ्यांना. ना पुरुषांना त्याचा राग येई, ना स्त्रियांना. त्यामुळे चाळीमध्ये शिव्यांची एक वेगळीच संस्कृती उदयाला आली होती. त्यामध्ये काही जण तर प्रत्येक वाक्यात शिव्यांचा वापर करीत. कधी कधी त्या व्यक्तीची ती ओळखही बनत असे. शिंच्या, साल्या हे शब्द तर शिव्यांच्या शब्दकोशात नसायचे एवढ्या चाळीतल्या शिव्या महान असायच्या. पण त्याबद्दल कोणाला खेद नसायचा व खंतही नसायची. शिव्या दिल्यामुळे चाळीतील कोणी रागवलेला किंवा कोणी सॉरी म्हटलेला माझ्या तरी पाहण्यात आला नाही कारण अगदी सर्वसाधारण संभाषणामध्ये सुद्धा शिव्या बहरून यायच्या.


अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तसा यालाही होताच. चाळीत भांडणं व्हायची. नाही सं नाही. अगदी जोरदार भांडण व्हायची. पण ती कधी टोकापर्यंत जायची नाहीत आणि अशा भांडणांमध्ये जोरदार शिवीगाळ व्हायची. अशा भांडणाच्या वेळी मात्र घातलेल्या शिव्यांचा खराखुरा अर्थ घेतला जायचा आणि त्यामुळे भांडण आणखीनच पेटून उठायचं. गंमत पहा. शब्द तेच शिवी तीच. पण कधी घालतो याच्यावर सारं काही अवलंबून असतं. सर्वसाधारण संभाषणात अगदी जवळच्या मित्राला सुद्धा आई-बहिणी वरून घातलेली शिवी त्याला शिवी वाटत नाही पण भांडणामध्ये अगदी साधी सोपी शिवी घातली तरी माणसाला राग येतो.  प्रत्येक गोष्टीचा अर्थ केवळ शब्दात नसतो तर तो त्या वेळच्या परिस्थितीवर देखील अवलंबून असतो हे चाळ संस्कृतीतील शिव्यांनी मला शिकवलं.


माझं बालपण ज्या चाळीत गेलं अशा ह्या चांगुलपणाच्या चाळीची कहाणी मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे.   ही कहाणी तुम्ही जर चाळीत वाढला असाल तर ती तुम्हाला तुमची कहाणी वाटेल आणि जर वाढला नसाल तर चाळ ही खरोखरच एक वेगळी दुनिया आहे यावर तुमचा विश्वास बसेल.

 


 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा