माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

 मनोरंजन


 



चाळीचा खरा जमाना हा वाहिन्यांचे पेव फुटण्याआधीचा आहे. त्यामुळे चाळीमध्ये करमणुकीची साधने अतिशय लिमिटेड होती. चाळीमधील सर्वात महत्त्वाचं व वैशिष्ट्यपूर्ण मनोरंजनाचे साधन म्हणजे गप्पा, गॉसिप्स होय.  चाळीच्या कट्ट्यावर, पारावर किंवा जिथे कॉमन जागा आहे तिथे बसून चाळकरी जेव्हा गप्पा मारतात तेव्हा संपूर्ण चाळीच समुद्रमंथन होतं. तासनतास चालणाऱ्या या गप्पांमध्ये ज्ञानवर्धनाबरोबरच मनोरंजन होतं असं गंमत म्हणून म्हणायला काही हरकत नाही.

 

सुदैवाने आपल्या इथे ३३ कोटी एवढी देवांची प्रचंड संख्या आहे. त्याच्या जोडीला साधू, संत, बुवा व महाराज यांच्यामुळे चाळीमध्ये, कोणाच्या ना कोणाच्या घरी, अगदी वर्षभर काही ना काहीतरी, धार्मिक कार्यक्रम असायचा असायचा. गणपती, नवरात्र या मोठ्या सणांबरोबर प्रत्येकाची आराध्य दैवत वेगळी असल्यामुळे कोणाकडे दत्तजयंती, कोणाकडे रामनवमी, कुणाकडे कृष्ण जन्मोत्सव तर कुठे साईबाबांच्या पादुकांचा उत्सव असायचा.  काही मुली १६-१६ आठवडे संतोषीमातेचे व्रत घ्यायच्या. त्यावेळी कमीतकमी १६ शुक्रवार तरी पोरांचे मजेत जायचे. कारण पूजेनंतर प्रसादरुपी गूळ व चण्यांचा लाभ  व्हायचा.  कुणाकडे लग्न असायच  तर कुणाकडे साखरपुडा व बारसं. वाढदिवस हा काही त्याकाळी महत्त्वाचा कार्यक्रम नसायचा. त्यामुळे या वेगवेगळ्या उत्सवात होणार भजन, कीर्तन, आरत्या हीच मनोरंजनाची साधनं होती.


त्याच्या जोडीला सत्यनारायणाची महापूजा हा चाळीचा वर्षातून एकदा अगदी ठरलेला कार्यक्रम असायचा.  चाळीचा जर सार्वजनिक गणेशोत्सव असलाच तर दुधात साखर. पण प्रत्येक चाळीत दहीहंडी लागलीच पाहिजे असा अलिखित नियम तर असायचाच.


चाळीमध्ये खूपच कमी लोकांकडे वर्तमानपत्र यायची. अर्थात वाचणारे देखील कमी होते. ज्यांच्याकडे वर्तमानपत्रे येत नव्हती पण वाचायची आवड होती ते अगदी हक्काने दुसऱ्याची वर्तमानपत्रे आपल्या घरी आणून वाचायचे व जमल्यास परत करायचे.  चाळीतले काही 'श्रीमंत' आपल्या मुलांसाठी 'अमृत', 'चांदोबा', 'कुमार' किंवा 'किशोर' सारखी मासिके तसेच साप्ताहिके नियमितपणे विकत घ्यायची. ही सर्व पुस्तके त्या अर्थाने चाळीतल्या मुलांसाठी सार्वजनिक असायची.  काही ठराविक लोकांकडे त्यावेळी रेडिओ आले होते. त्यांच्या घरात लागलेली गाणी ऐकणे हा एक आनंदाचा भाग होता. पण जर गाणं ऐकायला येत नसेल तर काका, जरा रेडिओ मोठ्याने लावा ना अशी मोठ्या आवाजात केलेली विनंती सुद्धा मान्य व्हायची.  ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात टेलिव्हिजनने चाळीत पहिला प्रवेश केला तो त्या चाळीतील सर्वात श्रीमंत चाळकऱ्यांच्या घरी.  


त्यावेळी  शुक्रवारचा तबस्सुमचा फुल खिले है गुलशन गुलशन किंवा शनिवारचा मराठी व रविवारचा हिंदी चित्रपट, गुरुवारचा  हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम छायागीत  हे अतिशय प्रसिद्ध होते. हे कार्यक्रम पाहण्यासाठी चाळीमध्ये असलेल्या एकमेव टीव्हीवाल्या काकांचं घर हाउसफुल असायचं आणि हे कमी की काय म्हणून त्यांच्या खिडकीवर सुद्धा तोबा गर्दी उसळायची.  त्यावेळच्या चाळीच्या चाळकऱ्यांचं वैशिष्ट्य हे की यामध्ये त्या टीव्हीवाल्या काकांना काहीही त्रास व्हायचा नाही आणि ते देखील सहकुटुंब सहपरिवार चाळकऱ्यांसहित या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचे.


आपल्या विभागातील वेगवेगळ्या चाळींमध्ये असलेल्या सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेच्या रात्री रस्त्यावर पडदा लावून प्रोजेक्टर द्वारे वेगवेगळे पिक्चर्स दाखवणे हा त्या पूजेचा एक महत्त्वाचा भाग होता. पडद्याच्या एका बाजूला महिलांसाठी व दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी अशी न सांगता व्यवस्था होत होती व रात्री कधी कधी दोन वाजेपर्यंत चालणारे हे चित्रपट न चुकता पाहणाऱ्या चाळकऱ्यांची याला अलोट अशी गर्दी व्हायची.


आपल्या अतिशय तुटपुंज्या उत्पन्नातून व अतिशय कमी जागेत आपल्या मनोरंजनाची साधने आपणच निर्माण करून चाळकऱ्यांनी आपली संस्कृती नुसती जपलीच नाही तर ती उन्नत देखील केली. म्हणूनच अगदी जितेंद्र पासून जग्गू दादा पर्यंत व संजय मांजरेकरांपासून सिद्धार्थ कांबळेपर्यंत अनेक कलाकार या चाळ संस्कृतीनेच उदयाला आणले आहेत

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा