कबड्डी
चाळ संस्कृतीची विशेषता अजून एका गोष्टीत आहे ती म्हणजे
वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा भरवणं. आजकाल जस गल्लोगल्ली क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्याचं पीक
आला आहे, अगदी बॉक्स क्रिकेट सुद्धा
पॉप्युलर झाल आहे, अशा वेळी त्या जमान्यात कबड्डीचे, अगदी तिकीट लावून सामने व्हायचे
हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल.
आमच्या विभागात साधारण १४० चाळी होत्या आणि या सर्व चाळीच मिळून एक ‘महाराष्ट्र मंडळ’ देखील होतं. त्यावेळी वेगवेगळे सांस्कृतिक
कार्यक्रम तसेच क्रीडा विषयक कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ घ्यायच. डॉक्टर दत्ता सामंत आमच्याच
विभागात राहायचे आणि त्यांनीच हे महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं होतं.
आमच्या विभागात एक अतिशय मोठं क्रीडांगण होतं आता ज्याला
आचार्य अत्रे उद्यान असं म्हणतात. त्या उद्यानात अगदी राज्यस्तरीय कबड्डीच्या स्पर्धा
भरवल्या जायच्या. विशेष म्हणजे थंडीचा मोसम हा कबड्डी खेळण्याचा काळ असतो
आणि या थंडीच्या मोसमात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या स्पर्धा भरायच्या. यामध्ये संपूर्ण मैदान
चहुबाजूने जूटचे कापड लावून बंद केले जायचे व त्यावेळी, पाच पैसे किंवा दहा पैसे असंच
तिकीट असायचं. लोकं कबड्डीचे सामने बघायला
अगदी तिकीट काढून यायचे. आम्ही मात्र लहान असल्यामुळे कापडाच्या खालून, अगदी घुसून, फुकटचे सामने बघायचो. अर्थात ते सामने आयोजित करणारे आमच्याच विभागातले
असल्यामुळे ते आमच्यासारख्या चिल्ली-पिल्ली
असलेल्यांकडे दुर्लक्षच
करायचे.
त्यावेळी 'खुला' गट व 'व्यावसायिक' गट असे दोन गट असायचे. खुल्या गटात वेगवेगळ्या क्रीडा
मंडळाचे संघ स्पर्धेत उतरायचे तर व्यावसायिक गटात रेल्वे, बँका, बीइएसटी, सारखे वेगवेगळ्या कंपन्यांचे
किंवा ऑर्गनायझेशनचे कबड्डीचे संघ उतरायचे. थंडी खूप असायची पण त्या थंडीत देखील आम्ही शेवटपर्यंत
कबड्डीच्या सामन्याचा आनंद लुटायचो. या अशाच सामन्यात आम्ही बीइएसटी मधून खेळणाऱ्या मधु पाटलांना खेळताना पाहिल आहे की
ज्याने पुढे एशियाड मध्ये भारतीय कबड्डी संघाचे नेतृत्व केले.
या खुल्या आणि व्यावसायिक अशा दोन पुरुष गटांबरोबर
महिलांचेही संघ खेळायचे आणि त्यातही महाराष्ट्र स्तरावरील अनेक महिला कबड्डीपटूंना
आम्ही खेळताना पाहिल आहे.
यापासून प्रेरणा घेऊन पुढे मोठा झाल्यावर कबड्डीची आवड कधी
निर्माण झाली ते कळलच नाही. चाळीच्या जवळ असलेल्या
छोट्याशा मोकळ्या जागेत आम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करायचो व आमचा संघ वेगवेगळ्या
टूर्नामेंट मध्ये भागही घ्यायचा. मी जरी खूप चांगला कबड्डी खेळाडू नव्हतो तरी बऱ्यापैकी
खेळत असल्यामुळे कित्येक वेळा संघामध्ये मीही खेळायचो. आमचा संघ अनेक वेळा फायनल
पर्यंत पोहोचला. एवढेच नव्हे तर मुंबई उपनगरातील प्रथमश्रेणी दर्जाच्या काही कबड्डी
टूर्नामेंटमध्ये फायनल पण मारलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा