माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

 

वाचनाच वेड
           

 

 

 

बहुश्रुत होण्यासाठी खूप काही ऐकावं लागतं तर अंतर्मुख होण्यासाठी खूप काही वाचावं लागतं.  माझ्या नशिबाने मला वाचनाची गोडी खूप आधीपासून लागली.  जरी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी प्राधान्यक्रम पक्का होता. शिक्षण सर्वात प्रथम, त्यामुळे पुस्तके व वह्या आणि इतर शालेयोपयोगी वस्तू लगेचच मिळायच्या. एकवेळ नवे कपडे मिळाले नाहीत किंवा दिवाळीला फटाके विकत घेतले नाहीत पण घरी खाण्याची व वर्तमानपत्र व मासिकांची मात्र आबाळ झाली नाही. घरी रोज महाराष्ट्र टाईम्स यायचा. मला आठवत, ‘मार्मिक च्या सुरुवातीच्या दिवसात मार्मिक ही यायचे. त्यात असलेली काही व्यंगचित्रे मला आजही आठवतात


आमच्या घरात खास मुलांसाठी म्हणजे माझ्या व माझ्या बहीणीसाठी कुमारअमृत ही मासिके ही येत.  चांदोबा घरात कोणालाच आवडत नसे. त्यातल्या गोष्टी बकवास, खोट्या आणि केवळ रंजक आहेत असं सर्वांच मत होत . कुमार मध्ये अतिशय सुरेख कथा यायच्या ज्यातुन बोध घ्यायला मिळायचा व ज्ञानवृद्धी पण व्हायची.  आणि अमृत तर मराठीमधील रीडर्स डायजेस्ट होतं. ज्यात सुंदर माहिती मिळायची. लहान वयात कुमार  अमृत या दोन मासिकांचा माझ्यावर खूप सकारात्मक परिणाम झाला आणि त्यामुळे मला वाचनाची गोडी लागली.  

 

दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी आधाशासारखा पुस्तक वाचत असायचो. दिवसाला दोन-तीन लहान लहान पुस्तक मी अगदी सहजच वाचायचो. पण प्रश्न वाचनाचा नव्हता तर पुस्तक कुठून आणायची हा होता. त्यामुळे मी रद्दीच्या दुकानात जाऊन किलोच्या भावाने जुनी पुस्तक विकत घ्यायचो व ती वाचायचो. त्यानंतर प्रश्न आला की आता या पुस्तकांचं काय करायचं. त्यामुळे मी सातवीत असतानाच स्वतःच श्री पंत वाचनालय हे बेळगावचे संत श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकरांच्या  नावाने एक घरगुती वाचनालय चालू केलं. तसा एक रबर स्टॅम्प पण बनवून घेतला व मोठ्या ऐटीत तो प्रत्येक पुस्तकावर मारला.

 

आमच्या विभागात राहणारे माझ्यासारखे इतर विद्यार्थी या वाचनालयाचा लाभ घेत. मीही त्यांना छोटी पुस्तके पाच पैशात तर मोठी पुस्तके दहा पैशात वाचायला द्यायचो. अशा तऱ्हेने जमा झालेल्या पैशातून मी पुन्हा रद्दीच्या दुकानातून पुस्तके विकत घ्यायचो आणि असं करता करता अगदी एक मोठी ट्रंक भरेल एवढी पुस्तके माझ्याकडे जमा झाली. अर्थात ही सगळीच्या सगळी पुस्तके मी वाचून काढली होती. माझं हे वाचनालय जे सातवीला सुरू झालं ते पुढे दहावीची परीक्षा होईपर्यंत चालूच राहिलं. शेवटी एसएससी च महत्वाच वर्ष आलं. त्यामुळे हे वाचनालय जे बंद झालं ते कायमचं. परंतु हे वाचनालय चालू केल्यामुळे माझं केवळ वाचनच वाढलं असं नाही तर विभागातील इतर मुलांशी संपर्क देखील वाढला. वाचनालय चालू करण म्हणजे एक 'नोबल' काम होतं. त्यामुळे विभागात चांगलं नावही झालं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे काहीतरी धंदा करावा याचं बीजारोपण अतिशय लहान वयात झालं.

 

माझ्या घरापासून साधारण पंधरा मिनिटं चालत एवढ्या अंतरावर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय होतं. त्याची मासिक फी अतिशय माफक होती. जी मला परवडणारी देखील होती. या ग्रंथ संग्रहालयाने मला अनेक चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली. संपूर्ण सावरकर, पु.. देशपांडे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, ना. . इनामदार, कुसुमाग्रज, ग्रेस सारख्या अनेक लेखकांच्या पुस्तकांचं अगदी शाळेत असतानाच वाचन झालं होतं. कॉलेजमध्ये जायच्या आधीच जे वाचन झालं होतं तेच वाचन मला पुढच्या संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडल. खरं सांगायचं तर प्रोफेशनल आयुष्यात अशाप्रकारे अवांतर वाचन करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे वाचन फक्त वर्तमानपत्रातील लेखांपुरतं मर्यादित राहील हे सांगायला मला कुठेही संकोच वाटत नाही. 


कधी कधी असं वाटतं की लहानपणी जे होऊन जातं ते मोठेपणी करता येत नाही. आचार्य अत्रेंच कर्हेचे पाणी लक्ष्मीबाई टिळकां स्मृती चित्रे’, महात्मा गांधींचे माझे सत्याचे प्रयोग’, गो. नी. दांडेकर, विश्राम बेडेकरां रणांगणएक झाड दोन पक्षी’, पु ल देशपांडे, इरावती कर्वे,. पु. काळे,  चिं. त्र्यं खानोलकर उर्फ आरती प्रभू, राम गणेश गडकरी ची. वी. जोशी, ५५ कोटींचे बळी ही गोपाळ गोडसेंची आत्मकथा, बाबासाहेब पुरंदरे, किती लेखक आणि लेखिका सांगू? या सर्वांनी माझं साहित्यिक आयुष्य संपन्न केलं.

 

पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर चांगले मार्क मिळालेच पाहिजेत नाहीतर शिष्यवृत्ती मिळणार नाही म्हणून परीक्षेच दडपण असायचं. हे दडपण असायचं म्हणून खूप अभ्यास करावा लागायचा आणि खूप अभ्यास करावा लागायचा म्हणजे अभ्यासाला वेळही द्यावा लागायचा. यातून अवांतर वाचनाला जवळजवळ वेळच नसायचा. परंतु एक गोष्ट नक्की, ज्या दिवशी वर्तमानपत्र छापली जात नाहीत तो दिवस सोडला तर असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी संपूर्ण वर्तमानपत्र मी वाचलं नाही. कमीत कमी दोन किंवा तीन वर्तमानपत्र तर मी वाचायचोच वाचायचो. अगदी त्याच्या अग्रलेखासहित. त्यामुळे पुस्तकांपासून जरी दूर गेलो तरी रोजच्या घडामोडी मग त्या राजकीय असोत सांस्कृतिक असोत किंवा सामाजिक, यांच्याबरोबर माझे नाळ नेहमीच जुळलेली असायची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा