बाजारपेठ
चाळ ही स्वतःच एक उत्तम बाजारपेठ
होती. भल्या पहाटे
दूध आणि पेपरवाल्यापासून फेरीवाल्यांची जी सुरुवात व्हायची ती रात्री कुल्फीवाल्यापर्यंत. चाळीने सर्वांनाच काही ना काहीतरी पोटा-पाण्यासाठी धंदा दिला
आहे. दूधवाला, पेपरवाला त्यानंतर यायचा पाववाला. या पाववाल्याची
एक भली मोठी पत्र्याची पेटी असायची. ज्यात पावाबरोबर खारी, बिस्किट, टोस्ट, नानकटाई आणि
छोटे-छोटे केक पण असायचे. पाव दोन प्रकारचे असायचे. एक कडक व दुसरा नरम. नरम पावात
पुन्हा दोन प्रकार. एक लादीपाव तर दुसरा बनपाव. त्यानंतर यायची भाजीवाली, मच्छीवाली. बरं मच्छीवाली मध्ये सुद्धा
दोन प्रकार. ताजी मच्छीवाली आणि सुकी मच्छीवाली. यांच्या जोडीला, विशेषता उन्हाळ्यामध्ये मातीची मडकी
विकणाऱ्या बायका, जुने कपडे घेऊन नवी भांडी देणाऱ्या बोहारणी, कधी कुडमुडे ज्योतिषी. तर कधी पिंजऱ्यात
पोपट घेवून चिट्टी मधून भविष्य सांगणारे बाहेरगावचे लोक ही यायचे.
हिवाळ्याच्या
दिवसात कित्येक नेपाळी महिला व पुरुष लोकरीचे स्वेटर विकायला चाळीत यायच्या. १९७२ ला जेव्हा प्रचंड दुष्काळ पडला आणि तांदूळही मिळेनासे झाले तेव्हा लक्ष्मी
नावाची एक दाक्षिणात्य बाई टिटवाळ्यावरून
तांदूळ 'स्मगल' करून आणायची आणि काळ्या बाजारात विकायची. पितळेच्या भांड्याला कल्हई
लावणारा कल्हईवाला,
जुनं पुराण सामान घेणारा भंगारवाला, फक्त जुने पेपर-पुस्तक घेणारा रद्दीवाला यांची आवक-जावक चाळीमध्ये नेहमी चालूच असायची. चाळीमध्ये कलईवाला ज्यावेळी यायचा त्यावेळी गरम झालेल्या भांड्यात
नवसागर टाकल्यानंतर जो धूर यायचा तो मला प्रचंड आवडायचा आणि कल्हईवाला निघून
गेल्यानंतर त्याच्या अजूनही गरम असलेल्या चुलीत पाणी टाकायचं व ती थंड झाल्यानंतर
त्यामध्ये असलेले जस्ताचे बारीक बारीक गोळे जमा करायचे हा आमचा छंद होता.
लहान मुलांना खुश करण्यासाठी म्हातारीचे केस तयार करणाऱ्या
मशीन सहित कोणी यायचं तर कधी साधे फुगे तर कधी हवेमध्ये उंच जाणारे गॅसचे फुगे
विकायला सुद्धा फुगेवाले यायचे. चाळीच्या समोरील रस्त्यावरून सरबताची गाडी घेऊन
जाणारा भैया चाळीसमोर हमखास थांबायचा आणि गाडीच्या खाली असलेली घंटा जोरजोराने
वाजवायचा. या घंटेचा आवाज
हा 'सरबतवाला आला' याची खूण होती.
चाळीतल्या मुली आणखीन एका फेरीवाल्याची नेहमी वाट बघत. आपल्या टोपलीतून चिंचा, बोरे, आवळे, विलायती चिंच,
स्टार-फळ आदी मुलींना आवडणारे आंबट पदार्थ घेऊन ज्यावेळी हा फेरीवाला चाळीत यायचा
त्यावेळी पोरी एकदम खुश होऊन जायच्या. चाळीत आलेपाक
विकणारे यायचे तसेच लोणावळा चिकी विकणारे पण यायचे. एक
अतिशय वृद्ध माणूस छोटी-छोटी धार्मिक पुस्तके विकायला यायचा.
यात शिवलीलामृत, व्यंकटेश स्तोत्र,
रामरक्षा अशी छोटी छोटी पुस्तक असायची. याची पुस्तकं
कोण घेत असेल? याची किती विक्री होत असेल? यातन याला किती पैसे मिळत असतील? त्याचं कसं बरं
चालत असेल? असे त्यावेळीही मला प्रश्न पडायचे.
चणे, शेंगदाणे विकणारा भैय्या हा आमच्या चाळीतला सगळ्यात पॉप्युलर व्हेंडर
होता. चणे, शेंगदाणे विकण्याबरोबरच तो
सुकी भेळ ही तयार करून देत असे. त्याच्याकडे चणाडाळ व फुटाणे देखील होते. त्यावेळी पाच पैशाला चणे-शेंगदाणे मिक्सची पुडी मिळायची ती
आमच्यासाठी खूप असायची. पुडीच्या तळाशी
अडकलेला शेवटचा दाणा काढून खाल्ल्यावर जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटायचे.
रात्री जेवण झाल्यानंतर डोक्यावर मातीचा मोठा हंडा व त्यात बर्फ व
बर्फामध्ये बुडवलेले कुल्फीचे कोन घेऊन कुल्फीवाला यायचा. पाच पैशापासून
२५ पैशापर्यंत वेगवेगळ्या साईजची कुल्फी असायची. ऑर्डर प्रमाणे तो कुल्फी मातीच्या
मडक्यातून बाहेर काढायचा व दोन्ही हाताने कुल्फीचा साचा चोळायचा. साच्यावर असलेल्या झाकणाच्या बाजूला असलेली
गव्हाच्या पिठाची पट्टी हाताने काढून एका पानावर ती कुल्फी हलकेच पसरवून घ्यायचा व चाकूने त्याचे छोटे छोटे तुकडे
करून आम्हाला द्यायचा. ही कुल्फी खाण्याचा आनंद काही औरच होता. तो आनंद आता
अगदी महागातील महाग आइसक्रीम खातानाही मिळत नाही.
दुपारचा वेळ हा
खास 'महिला स्पेशल' असायचा. दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर चाळीतल्या बायका थोड्या मोकळ्या व्हायच्या. अशा वेळी साड्या विकायला लोक यायची. साडी घ्यायची असेल वा नसेल, चाळीतल्या बायका मात्र त्यातली प्रत्येक
साडी उघडून बघायच्या पण क्वचितच विकत घ्यायच्या. साधारण याच सुमारास कुंकू, बिंदी, रिबिनी,
केसांच्या पिना, गंगावन, तोंडाला लावायची खाकी फेस पावडर आणि याच्यासारखी महिलांना सौंदर्यप्रसाधने विकणारी चालती बोलती अनेक ‘ब्युटी पार्लर्स’
देखील चाळीत यायची.
आज जशी मिळतात तशी वेगवेगळी फळ जरी त्यावेळी उपलब्ध नव्हती
तरी चिकू, पेरू, संत्री, मोसंबी व केळी हीच प्रामुख्याने
चाळीमध्ये विकली जाणारी फळ होती. मे महिन्याच्या दिवसात आंब्याच्या पेट्या घेऊन विकायला लोक यायची पण विकत
घेणाऱ्यांची संख्या तशी थोडी कमीच होती. चाळीतले बहुतेक लोक
कोकणातले असल्यामुळे त्यांना गावावरून आंबे यायचे. एकतर त्यामुळे
व महाग होते
म्हणूनही फारसे आंबे विकले जायचे नाहीत.
तो जमाना मिक्सरचा नव्हता. बहुतेक सगळे वाटप पाट्यावर व्हायचे. घासून घासून पाटा गुळगुळीत व्हायचा. त्यामुळे
त्याला मधून मधून टाचे मारावे लागायचे. या पाट्यांना तसेच दळण दळण्याच्या जात्यांना टाके मारण्यासाठी वडारी समाजाच्या बायका यायच्या.
जसे हे व्यापारी विक्रेते व छोटे-मोठे सर्विस देणारे
कारागीर चाळीत यायचे तसे काही ग्रे मार्केटमध्ये काम करणारे ‘सीजनल पक्षी’ पण
असायचे. बहुतेक स्मगलिंग केलेलेच असावेत पण रेबनचे
गॉगल, इम्पोर्टेड घड्याळ, बॉक्सिचे
शर्टाचं कापड तर स्ट्रेचलॉनचे पॅन्टचे
कापड, विदेशी परफ्युम्स सारख्या उंची गोष्टी लपून-छपून
चाळीमध्ये विकल्या जायच्या. चाळीमधली नुकतीच नोकरीला लागलेली
तरुण पोरं ही या ‘ग्रे मार्केट’चे
गिऱ्हाईक होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा