माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

 

समाजसेवा

 


सामाजिक उपक्रमामध्ये चाळकरी कधी मागे नसायचे. चाळीची 'मंडळ' असायची. जशी चाळीची साईज तशी मंडळांची साईज. कधी तर चार-पाच चाळी मिळून एखादं मंडळ तयार व्हायचं आणि हे मंडळ त्या चाळीतील वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवायच.


15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे किंवा 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या दिवशी रक्तदान शिबिर भरविण्यात यायची. कित्येक मंडळ अगदी कित्येक वर्ष न चुकता आपला रक्तदानाचा हा उपक्रम सुरू ठेवायची.  चाळीमध्ये, वस्तीमध्ये किंवा विभागामध्ये कोणाला रक्ताची गरज पडली तर या मंडळाचे कार्यकर्ते त्या रक्तपेढीशी संपर्क साधून त्यांना मोफत रक्त मिळवून द्यायचे, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.


आता सारखं बिसलरीचं पाणी त्यावेळी कुठे मिळत नव्हतं, ते घरातुनंच घेऊन जावं लागायचं. पण दिवसभरासाठी लागणार पाणी आपण किती म्हणून नेणार. त्यामुळे काही चाळींनी आपल्या समोरच्या मोकळ्या जागेत लोकांची तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. विशेषतः उन्हाळ्यात याचा खूपच उपयोग व्हायचा. जवळजवळ 25-30 लिटर कॅपॅसिटी असलेलं काळ मोठं असं मडकं हे एखादा कट्टा किंवा चौथरा बांधून त्यावर ठेवलं जायचं. अर्थात त्याला खाली एक नळ देखील असायचा. नळाला जोडून एक स्टेनलेस स्टीलचा ग्लास असायचा आणि तो चोरला जाऊ नये म्हणून त्याला एक चेन पण त्या चौथर्‍यावर कुठेतरी बांधून ठेवलेली असायची.  हे मडकं नियमितपणे धुण्याची व चांगल्या पाण्याने भरण्याची जबाबदारी चाळीतल्या एखाद्या तरुणाने आपल्या अंगावर घेतली असायची आणि आळीपाळीने महिन्याने ही जबाबदारी एकाकडून दुसऱ्याकडे जायची.  जलदान हे अतिशय पुण्याच काम आहे ही भावना सर्वांची होती. त्यामुळे ही अतिशय सोपी वाटणारी पण महत्त्वाची समाजसेवा आपल्या कुवतीप्रमाणे चाळकरी करायचे.


त्यावेळी वर्तमानपत्र घेणे हे कित्येकांच्या कुवती बाहेरचं काम असायचं. त्यामुळे दोन चार चाळी मिळून एखादं सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय देखील सुरू करायच्या.  या वाचनालयाच्या आजूबाजूला बसायची जागा नक्कीच असायची आणि तिथे बहुतेक वेळा वरिष्ठ चाळकऱ्यांचा म्हणजेच 'सीनियर सिटिझन्स' चा वावर जास्त असायचा. हळूहळू ही जागा सीनियर सिटिझन्स ना गप्पा मारण्यासाठी त्यांचं हक्काचं ठिकाण होऊन बसायची आणि त्यांच्या विरंगुळ्याचं साधनही.


चाळीमध्ये कोण आजारी पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर शासकीय रुग्णालय हाच त्यावेळी चाळकऱ्यांसाठी एकमेव पर्याय होता.  रुग्णाची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र नर्स ठेवण्याएवढे पैसे नसायचे आणि काही वेळा तर रात्री रुग्णाबरोबर राहण्यासाठी त्याच्या कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती उपलब्ध ही नसायची. अशावेळी ही जबाबदारी आपली आहे असं समजून चाळकरी आळीपाळीने आजारी व्यक्तीची सेवा करायचे आणि यात त्यांना खूप समाधान देखील वाटायचे.  अनेक वर्षे एकत्र राहिल्यामुळे चाळकऱ्यांचे एकमेकांबरोबर जे संबंध तयार झाले होते ते एखाद्या कौटुंबिक संबंधाहून कमी देखील नव्हते. त्यामुळे आजारी पडलेला माणूस आपल्या कुटुंबाचाच एक घटक आहे असं समजून त्याची सेवा-सुश्रुषा करण्यात यायची.


आमच्या समोरच्या चाळीमध्ये काही सुशिक्षित आणि उत्साही तरुण राहायचे. ज्यांना मुलांच्या शिक्षणात खूप इंटरेस्ट होता.  ते नोकरी करत आणि नोकरीवरून आल्यानंतर चाळीतल्या मुलांच्या फुकटात शिकवण्या घेत.  त्यासाठी चाळीच्या गच्चीवर असलेल्या पाण्याच्या चौकोनी टाक्यांना काळा रंग फासून त्याचा फळा तयार होई व कोणाकडून तरी आणि खरं सांगायचं तर चाळीच्या कॉमन मीटर मधून वायर खेचून बल्ब लावण्यात येई. संध्याकाळी काळोख पडल्यानंतर चाळीतल्या मुलांच्या शिकवण्या हे तरुण घेत.  सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला पण नंतर-नंतर चाळीच्या शिक्षण संस्कृतीला अनुसरून हा प्रतिसाद कमी होऊ लागला. मुलांची गळती होऊ सुरू झाली आणि कालांतराने ही फुकटातली शिकवणी किंवा क्लासेस म्हणा हवे तर, बंद झाली.  मला आठवतं की याच तरुण युवकांनी चाळीतल्या मुलांना बाहेरच जग कळावं म्हणून आरे कॉलनी येथे असलेल्या दुधाच्या डेरीची इंडस्ट्रियल टूर काढली होती त्यात मीही सहभागी झालो होतो.


 

आपापल्या परीने आणि ऐपतीप्रमाणे तेव्हा सुद्धा चाळीतील तरुण मुलं पैशाचा अभाव असूनही जेवढ जमेल तेवढं सेवाकार्य व समाजकार्य करत होती. ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते किंवा कोणत्या संघटनेचे सभासदही नव्हते. कोणत्या विचारांचा प्रचार किंवा प्रसार करावा तसं त्यांनी कधी केलं नाही एवढंच नव्हे तर हळूहळू पुढे जाऊन आपण नेता बनाव असे विचारही त्यांच्या मनात आले नाहीतकेवळ समाजसेवा करावी या भावनेतून रक्तदान शिबिर घेणारेजलकुंभाची सोय करून देणारेसार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय सुरू करणारेआजारी रुग्णाची सेवा करणारेविद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेणारे हे तरुण आमचे खऱ्या अर्थाने हिरो होते

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा