चाळीचे अर्थशास्त्र
चाळीमध्ये जसे चाकरमानी राहायचे तसेच छोटे-मोठे व्यवसाय करणारे, अगदी हातावर पोट असलेले, छोट्या-मोठ्या कारखान्यात किंवा दुकानात काम करणारे लोकही
राहायचे. चाकरमान्यांना त्यामानाने
वेळेवर पगार मिळायचा पण इतरांचं मात्र तसं नसायचं. ठराविक दिवशी महिन्याचा खर्च चालवण्यासाठी त्यांच्या हातात
पैसा असायचाच अस नाही. परंतु कारकून किंवा त्याच्या वरच्या पोस्टवर असलेल्या चाळकऱ्यांचा एक तारखेला पगार व्हायचा. काहींचा सात तारखेला पगार व्हायचा तर काहींचा दहा
तारखेला.
ज्यांचा सात
किंवा दहा तारखेला पगार व्हायचा त्यांना नेहमीच एक तारखेला पैशाची अडचण वाटायची आणि त्यांची ही अडचण ज्यांचा एक तारखेला पगार आहे तो चाळकरी
पूर्ण करायचा. घेतलेले पैसे पगाराच्या दिवशी
म्हणजे सात तारखेला किंवा दहा तारखेला हमखास परत केले जायचे. आठवण करून द्यायची गरज नसायची. हे चक्र अव्याहतपणे चालू राहायचं.
याच्या जोडीला ज्यांचा पगार व्हायचा नाही अशांच्या अचानक उद्भवलेल्या
अडीअडचणींना चाळकरी नेहमीच मदत करायचे. कित्येक वेळा गरज पैशाची नसायची तर वस्तूची असायची. त्यामुळे पाव-किलो तेल, दोन-लिटर केरोसिन किंवा अर्धा-किलो साखर, एक-किलो तांदूळ, दोन-किलो गहू सारख्या वस्तू मागून नेल्या जायच्या व परतही
केल्या जायच्या. या सर्व व्यवहारात कोणालाही काहीही गैर वाटत नसायचे. कमीपणा वाटत नसायचा. आपण काहीतरी देतोय म्हणून मोठे
आहोत असा माज पण नसायचा. हे सगळं अर्थकारण अगदी नैसर्गिकरित्या चालायचं. नि:संकोचरित्या चालायचं.
चाळीमध्ये सगळ्या बायका एकत्र येऊन मे महिन्यामध्ये पापड
लाटणे, मसाला कूटणे, लोणचं करणे, आदी साठवणुकीचे पदार्थ एकत्र करत. दिवाळीचा फराळ करायला सुद्धा बायका एकमेकांना मदत करत. हल्ली ऐकतो, वाचतो आणि पाहतो की महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट
निघालेले आहेत. महिला एकत्र येतात. थोडे-थोडे पैसे जमवतात. बचत गटातील गरजू महिलांना कर्ज देतात. ज्यांनी कर्ज
घेतले आहे त्या महिला बचत गटाला व्याज देतात व अशा रीतीने जमलेल्या व्याजातून काही
व्यावसायिक उपक्रम सुद्धा सुरू करतात. चाळीमध्ये तर ही प्रथा अगदी पूर्वापार होती. फक्त त्याला व्यावसायिक किंवा वैधानिक स्वरूप नव्हतं. पण चाळीतल्या बायकांच्या गरजा
मात्र पूर्ण होत होत्या.
काही बायका भिशी चालवत. भिशी म्हणजे दर महिन्याला प्रत्येकीने काही ठरावीक रक्कम एखाद्या प्रमुख महिलेकडे जमा करायची व जमा झालेली रक्कम
लिलावाने ग्रुप मधल्या सर्वात गरजू महिलेने कर्जावू घ्यायची. जर १० महिलांनी प्रत्येकी १० रुपये जमा केले तर १०० रुपये
जमा व्हायचे. लिलावात जर एखाद्या महिलेने ते ९० रुपयांत घेतले तर
तीने पुढील महिन्यात १०० रुपये परत करायचे. अशा रीतीने भिशीला १० रुपयांचा फायदा
व्हायचा. चाळीमधल्या भिशीमध्ये आतापर्यंत
कोणी कोणाला फसवलं आहे किंवा पैसे बुडवले आहेत असं झालं नाही. कदाचित आर्थिक अडचणीमुळे पैसे
देण्यास विलंब जरूर लागला असेल पण निम्नवर्गीय चाळकऱ्यांची नीती व नियत साफ
असल्यामुळे त्यांनी कधीच कोणाचे पैसे बुडवले नाहीत किंवा उधारी थकवली नाही.
चाळकऱ्यांनी आपल्या गरजा अतिशय सीमित ठेवल्या होत्या. बडेजाव, मोठेपणा हा कुठेच नव्हता. साधेपणा ठाई-ठाई भरला होता. चाळीतल्या बायका ‘स्वयंसिद्धा’ होत्या. जेवण करायला, भांडी घासायला, कपडे धुवायला व घरातल्या इतर कामासाठी आतासारखी साधने
नसूनही चाळीतली प्रत्येक बाई ही कामं स्वतः करायची. त्यासाठी घरकामाला बाई ठेवणं
ना संस्कृती होती ना परवडणार होतं. त्यामुळेच या चाळीतल्या बायका मेहनत केल्यामुळे निरोगी तर
होत्या पण अगदी शेवटपर्यंत स्वतःच्या पायावर उभ्या राहून, कोणावरही अवलंबून न राहता
स्वतःचं काम स्वतः करीत असत. लहान मुलांना
सांभाळण्यासाठी त्यावेळी पाळणाघरांची आवश्यकताच
नव्हती. लहान मुल चाळीत आपोआप वाढत. कोणी ना कोणी तरी
त्या लहान मुलाला ‘दत्तक’ घ्यायचे व
पोटच्या पोरासारखे वाढवायचे.
चाळीतील हे अर्थचक्र व बचत गट चाळीच्या
अर्थशास्त्राचा कणा होता. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत, अतिशय अल्प उत्पन्नात, चाळकऱ्यांनी इतरांच्या मदतीने
आपल्या गरजा भागवल्या व अगदी अपवादानेच एखादा चाळकरी कर्जबाजारी झाला असं बघायला
मिळाल. आपल्या गरजा जर कमी असतील तर
उत्पन्न कमी असले तरी चालते पण जर गरजा प्रचंड असतील तर कितीही उत्पन्न असले तरी
ते अपुरे पडते याची जाण चाळकऱ्यांना होती त्यामुळे साध्या सोप्या सरळ जीवनपद्धतीचा
अवलंब करून चाळकऱ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपले जीवन आनंदात
घालविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा