प्राणी संग्रहालय
चाळीमध्ये केवळ माणसंच राहतात हा एक मोठाच भ्रम आहे. चाळ ही अनेक पशु आणि पक्षांना
आधार देणारा एक मोठा वटवृक्ष आहे. प्रत्येक चाळीत कोणा व्यक्तीचा
नव्हे तर चाळीच्या मालकीचा कमीत-कमी एक तरी कुत्रा किंवा कुत्री असायचीच. हा कुत्रा चाळीचा रखवालदार होता. चाळीतल्या सर्व व्यक्तींना तो
ओळखायचा आणि त्यांनी बोलावलं तर शेपूट हलवत त्यांच्याकडे जायचा. या कुत्र्याला चाळीतले सगळे जण, जसं जमेल तसं, खायला द्यायचे. रविवारी तर कुत्र्याची चंगळच असायची. अनेक जणांकडे मासे, मटण किंवा चिकन असायचं. त्याचे काही उरलेलं असायचं ते
ह्या कुत्र्याला पर्वणीहून कमी नसायचं. चाळीतल्या कुत्र्याला
म्युनिसिपालिटीच्या गाडीने उचलून नेऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात कोणीतरी पट्टा
घालायचं. त्यावरून कळायचं की हा 'भटका' नाही तर चाळीचा का असेना 'पाळलेला' कुत्रा आहे.
चाळीच्या कुत्र्याच नाव कधीच
इंग्लिश नव्हत. मोत्या, खंड्या, काळू किंवा भुऱ्या सारख अस्सल मराठमोळ असायच.
कुत्रीच नाव सुद्धा असच भारतीय बनावटीच असायच. आमची चाळ तीन मजल्याची होती पण
चाळीचा कुत्रा कधी जिना चढून पहिल्या माळ्यापर्यंत ही गेला नाही एवढा आज्ञाधारक
होता. आमच्या चाळीच्या कुत्र्याने
कधीच कोणाच्या घरात प्रवेश केला नाही, कधीच कोणाला तो चावला नाही किंवा त्याचं नखही लागलं नाही. कुत्र्यांना इंजेक्शन द्यावं लागतं हे आत्ता-आत्ता माहिती
पडलं पण आमच्या कुत्र्याला कधीच कोणतं इंजेक्शन द्यावं लागलं नाही आणि तो कधी
मरेपर्यंत आजारी पडला नाही. चाळीतल्या इतर रहिवाशांप्रमाणे चाळीचा कुत्रा सुद्धा त्या
संपूर्ण वातावरणाला एवढा सरावलेला होता की चाळीतील रहिवाशांप्रमाणे तोही
कायमचा निरोगी राहिला.
चाळीमध्ये एकाने मांजर पाळली होती. बोका नाही मांजरच होती. ती दर सहा महिन्यांनी पिल्लं
घालायची. नंतर ती पिलं मोठी झाल्यावर
कुठे जायची हे जरी कळलं नसलं तरी कित्येक वर्ष ती मांजर चाळीतच सगळीकडे वावरायची. कुत्रा
आणि मांजरीचं वैर असतं असं म्हणतात. पण आमच्या चाळीतला कुत्रा आणि मांजर यांचं कधीच भांडण झालं
नाही. मैत्री झालेली पाहिली नाही पण कुत्रा मांजरीवर भुंकलेला देखील पाहिलं नाही. तू तुझं काम कर मी माझं काम करतो. तू तुझ्या नशिबाने खा. मी माझ्या नशिबाने खातो असा एक सहकाराचा भाव या दोघांमध्ये असावा असच
आता राहून राहून वाटतं.
याआधी उल्लेख केल्याप्रमाणे आजारी मुलाला बकरीचे
दूध देण्यासाठी एकाने बकरी ही पाळली होती आणि ते
कुटुंब ती बकरी कॉमन पॅसेज मध्ये बांधून ठेवत असत. चाळीमधल्या बायका भाजीपाला साफ
केल्यानंतर जे उरतं ते मोठ्या उत्साहाने त्या बकरीसमोर ठेवत. अशा तऱ्हेने बकरीला पण चांगलं
खाद्य मिळायचं व कचऱ्याचा प्रश्न पण निकालात निघायचा. आपलं जे टाकाऊ आहे ते कोणाला तरी उपयुक्त आहे हे यापासून
शिकायला मिळालं आणि जगात काही फुकट जात नाही हेही लक्षात आलं. कचरा तयार करून पर्यावरणाचा समतोल आता बिघडत चालला आहे
त्यावेळी चाळीतल्या बायका ज्याप्रमाणे अशा प्रकारच्या कचऱ्यांचा उपयोग करतात ते
बघून त्या मानाने अशिक्षित असलेल्या बायकांच्या हुशारीला दाद द्यावीशी वाटते.
चाळीमध्ये पाच-सहा कुटुंबानी आणि तेही तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबानी कोंबड्या पाळल्या होत्या. या कोंबड्या अख्खा दिवस बाहेर फिरायच्या आणि रात्री मात्र
चाळीमध्ये यायच्या. ज्या कुटुंबानी या कोंबड्या पाळल्या होत्या त्यांच्या घरासमोर छोटीशी खुराडी ठेवलेली असायची आणि या कोंबड्या बरोबर न चुकता
त्याच खुराड्यात जाऊन बसायच्या. मालकाला अंडी मिळायची आणि कधी
सणावारी, रविवारी कोंबडीची मेजवानी
सुद्धा. मी कुठच्याही मालकाला खास करून या कोंबड्यांना खाण देताना
बघितलं नाही पण घरात उरलेल खरकट मात्र लोक या कोंबड्यांपुढे फेकायची. तोच त्यांचा
मुख्य खुराक होता.
आमच्या चाळीत हौसेने पोपट
पाळणारे कुटुंब होतं. त्यांच्या घरच्या मुलाला
पोपटाची खूप हौस होती. तो पोपट एवढा माणसाळला होता की
पिंजरा उघडा ठेवला तर तो बाहेर येत असे. मालकाच्या खांद्यावर, हातावर बसत असे पण उडून जात नसे. थोडा वेळ झाला की स्वतःहून
पुन्हा पिंजऱ्यात जायचा. कित्येक पोपट बोलके असतात असं
ऐकलं होतं पण आमच्या चाळीतला पोपट फक्त 'विठू विठू' अशी शीळ मारायचा. तेवढेच काय ते
त्याचं बोलणं होतं.
चाळीत एक कुटुंब होतं ज्याच्या
लहान मुलीला लहानपणीच पोलिओ झाला होता व तिचा एक पाय अपंग झाला होता. तिच्या
वडिलांना कोणीतरी सांगितलं की जर हिला कबुतराच्या रक्ताने मालिश केलं तर हिचा पाय
बरा होईल. त्यामुळे त्या कुटुंबाने गच्चीवर कबुतरांसाठी खुराडीच्या खुराडी
बांधून ठेवली होती आणि काही कबूतर पण पाळली होती. ही कबूतर जगभर फिरायची आणि रात्रभर तिथे राहायची. तिथेच अंडी द्यायची आणि प्रचंड
मोठ्या संख्येने प्रज्योत्पादन करायची. आठवड्याला एक याप्रमाणे त्या
मुलीच्या पायाच्या मालिश साठी त्या कबुतरांचा बळी दिला जायचा. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात
कबूतर पाळली होती की शेवटी ती मुलगी बऱ्याच प्रमाणात बरी झाली. बऱ्यापैकी चालू फिरु लागली. अपंगत्व होतं पण ते दिसून येण्याजोगे नव्हतं. तेव्हा कुठे सहा-सात वर्षानंतर आमच्या चाळीतली
कबुतरांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली.
आमच्या चाळीत एक दक्षिणात्य म्हणजेच केरळ मधलं कुटुंब
राहायचं. त्या आंटीला लवबर्ड्स आवडायचे. त्यांच्या घराच्या आतच त्यांनी
एका छोट्याश्या पिंजऱ्यात दोन रंगीबेरंगी लवबर्ड्स पाळले होते. त्यांच्या घराच्या पुढून
जाताना त्या लवबर्ड्सचा आवाज अतिशय गोड वाटायचा.
आश्चर्य वाटेल पण आमच्या चाळीत एकाने हौसेने सफेद उंदीर
देखील पाळले होते. अर्थात ते त्याने एका पिंजऱ्यात पाळले होते. लाल चुटुक डोळे असलेले हे उंदीर अनेक
लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र होते. हे जसे सफेद रंगाचे छोटे प्राणी
होते तसेच चाळीमध्ये आणखीन दोन सफेद रंगाचे मोठे प्राणी होते. सावंत काकांनी क्रॉफर्ड मार्केटवरून सशाची एक जोडी आणली
होती आणि ती त्यांनी पाळली होती. हे ससे दिसायला अतिशय छान, गुबगुबीत पण घाबरट होते. आम्ही लहान मुलं, काकांच्या परवानगीने त्यांना हातात घेत असू. त्यावेळी खूप आनंद व्हायचा. परंतु या सशाच्या मूत्रामुळे एवढी दुर्गंधी पसरायची की
त्यामुळे शेजाऱ्या-पाजाऱ्याना त्रास व्हायला लागला. शेवटी
शेवटी काकांना सुद्धा त्यांचं मलमूत्र काढण्याचा एवढा त्रास झाला की त्यांची ससा
पाळण्याची हौस फिटली व त्यांनी ते असेच कोणाला तरी देऊन टाकले.
कधी कधी असं वाटतं की चाळ आणि
चाळीतल्या खोल्या लहान असल्यामुळे लोकांनी हत्ती, उंट, घोडे, गाई आणि बैल पाळले नाहीत, बाकी जे जे पक्षी आणि जनावर, माणसं पाळू शकतात अशा सर्वांना चाळीने आपला उदार आश्रय
दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा