राम नारायण
रुईया महाविद्यालय
शालांत
परीक्षेचा निकाल लागायच्या आधी कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची याबद्दल मलाच
काही कळत नव्हतं. आमच्या शाळेच्या जवळ 'पोद्दार' व 'रुईया'
ही दोन कॉलेज. मी रोज शाळेत जाता येता ‘पोद्दार’ व ‘रुईया’ या कॉलेजना
पाहायचो. त्यामुळे या दोन पैकी एका कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा असं
वाटायचं. पोद्दार कॉलेजची इमारत अतिशय देखणी होती. दगडाने बांधलेली होती. दर्शनी भागात एक मनोरा होता व त्यावर एक घड्याळ होत. त्यामुळे ही बिल्डिंग खूप सुंदर व आकर्षक
होती. त्यामानाने रुईया कॉलेज हे सुबक-ठेंगणे होते.
पोद्दारची बिल्डिंग रुईयाच्या बिल्डिंग पेक्षा चांगली आहे हे एकमेव
कारण मी पोद्दार मध्ये ऍडमिशन घ्यावं असं मला वाटायला पुरेसं होतं. पण पोद्दार हे कॉमर्स साठी तर रुईया सायन्स आणि आर्ट साठी असलेले कॉलेज
होतं. घरी मार्गदर्शन करायला कोणीच नसल्यामुळे आर्ट, सायन्स आणि कॉमर्स मध्ये कुठे ऍडमिशन घ्यायची हेच कळत नव्हतं. परंतु वर्गात माझ्या बरोबर असलेल्या बहुसंख्य मुलांनी सायन्स मध्ये जायचं
ठरवल्यामुळे मीही सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं ठरवलं व म्हणून रुईया कॉलेजमध्ये
ऍडमिशन घेण्याचं नक्की केलं.
शालांत
परीक्षेचा निकाल लागायच्या तीन-चार दिवस आधीच रुईया कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजचा
ऍडमिशन फॉर्म तसंच प्रोस्पेक्टस विकत घेतलं. त्यावेळी कळलं की एसएससी ला जर 68% हून अधिक मार्क असतील तर
रुईया कॉलेजमध्ये डायरेक्ट ऍडमिशन देण्यात येणार आहे.
त्यामुळे रिझल्ट लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी रुईया कॉलेजमध्ये फॉर्म दाखल केला व लगोलग फी भरून ऍडमिशन देखील घेतली.
ना फॉर्म
भरायला मला कोणाच्या मदतीची आवश्यकता भासली ना ऍडमिशन घ्यायला. रुईया कॉलेजमध्ये
फर्स्ट इयर सायन्स व इंटरसायन्स ही दोन वर्षे शिक्षण घेत
असताना पर्वते सर, कल्पकम मॅडम, पंडित मॅडम, साने सर, गायकवाड मॅडम यांच्यासारख्या अनेक हुशार व तेजस्वी प्राध्यापकांनी माझ्या उच्च शिक्षणाचा
अतिशय भक्कम पाया निर्माण केला. घोकंपट्टीवर भर न देता
विद्यार्थ्यांचे फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर करण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळे विषय सहज समजत. खास करून पर्वते
सरांनी जे भौतिक शास्त्र आम्हाला शिकवलं त्यामुळे
पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना अजिबात त्रास झाला नाही.
मराठी
माध्यमामध्ये शिक्षण घेतले असल्यामुळे शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर जो
सर्वांच्या जीवनात येतो तो फेज माझ्याही जीवनात आला. प्राध्यापक काय शिकवायचे तेच कळायचं नाही. ते काय बोलायचे ते समजायचं नाही. सुरवाती सुरवातीला तर कॉलेज सोडून द्यावे किंवा सायन्स सोडून आर्ट्स घ्यावे असेही वाटायचे. त्यामुळे फर्स्ट
इयर सायन्सला पहिल्या सहामाही मध्ये गणितात नापास झालो त्यामुळे गणिताच्या पंडित मॅडमनी तू ‘बी’ ग्रुप घे व
मेडिकलला जा असा सल्ला दिला तर प्रीलीम मध्ये बायलॉजी मध्ये नापास झाल्यामुळे गायकवाड मॅडमनी तू ‘ए’ ग्रुप घे व इंजीनियरिंगला जा असा
सल्ला दिला. सुदैवाने प्रिलिम नंतर मिळालेल्या दोन
महिन्याच्या कालावधीत अगदी घासून अभ्यास केला आणि रुईया कॉलेजमध्ये पहिल्या काही विद्यार्थ्यांमध्ये नंबर पटकावला.
रुईया
कॉलेजमधला पहिला-दुसरा दिवस मला आठवतो. आल्या-आल्या पर्वते सरांनी साऱ्या वर्गाला उद्देशून म्हटलं की "तुमच्यापैकी किती
जण बोर्डात पहिले आले आहेत"? त्यावेळी चार जणांनी हात वर केला. पुणे, औरंगाबाद, नागपूर व कोल्हापूर या त्या वेळच्या एस.एस.सी.च्या चारही बोर्डात पहिली आलेली मुलं माझ्याच
वर्गात होती. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न केला की "तुमच्यापैकी बोर्डात आलेल्या मुलांनी हात वर करा". त्यावेळी ४०-५० हात उभे
राहिले. त्यानंतर त्यांनी "८०% हून ज्याला मार्क जास्त आहेत त्यांनी
हात वर करा" म्हटल्यावर जवळजवळ निम्म्याहून अधिक मुलाने हात वर केले. ७५% हून अधिक मार्क आहेत त्यांनी हात वर करा म्हटल्यावर आम्ही दहा-बारा मुलं
सोडून सगळ्यांनीच हात वर केले. आपण कुठे आहोत याची मला
जाणीव झाली. नशीबाने मला कुठे जायचंय याची जाणीव मला आधीच
होती. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि या सर्व हुशार
मुलांच्या मांदियाळीत आपल्याला जर इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायची असेल तर अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास याला पर्याय नाही हे मला त्या दिवशी कळलं.
त्यामुळेच
की काय, महाविद्यालयातील माझी पहिली दोन वर्ष ही फक्त आणि फक्त
अभ्यासात गेली. अभ्यासाव्यतिरिक्त ना मी काही पाहत होतो, ना ऐकत
होतो, ना बघत होतो, ना अनुभवत होतो किंवा
विचार करत होतो. कॉलेजच्या गॅदरिंगला दोन दिवस उपस्थित
राहिलो हे जर सोडलं तर ना मी कुठल्या खेळाच्या, ना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालो. रुईया कॉलेज खरं म्हणजे मुंबईच्या कॉलेज
जीवनात सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय पुढारलेल आहे. एकांकिका व नाट्य क्षेत्रात अगदी विनय आपटे सारखे दिग्दर्शक रुईया
कॉलेजमधील मुला-मुलींच्या एकांकिकेला दिग्दर्शन देण्यासाठी येत असत. संदीप पाटील सारखा क्रिकेटपटू, राणी वर्मा सारखी गायिका त्यावेळी होती. स्वाती टिपणीस सारखी अभिनेत्री ही देखील रुईया मध्ये होती. कुठला ना कुठला तरी सांस्कृतिक महोत्सव कॉलेजमध्ये नेहमीच चालू असायचा.
पण मी अभ्यासा व्यतिरिक्त अशा कोणतेही एक्स्ट्रा करिक्युलर
ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला नाही.
छोटासा का होईना
कॉलेजला जिमखाना होता. सुरुवातीला एखाद दोन वेळा गेलो असेन
पण त्यानंतर कधी जिमखान्याला
पण गेलो नाही. रुईया कॉलेजचा कट्टा हा साऱ्या मुंबईत फेमस आहे. त्यावर बसायचा कधी विचारही आला नाही. एकही
क्लास चुकवला नाही. त्यावेळी ज्यांना पुढे इंजीनियरिंगला
किंवा मेडिकलला जायचं असायचं ते चांगले मार्क मिळविण्यासाठी त्या वेळच्या सगळ्यात फेमस अशा ‘अगरवाल क्लासेस’ मध्ये ऍडमिशन घ्यायचे. पण जिथे
कॉलेजची फी भरायचे वांदे होते तिथे क्लासची फी
भरण्याचा, ऍडमिशनचा तर प्रश्नच नव्हता.
त्यामुळे
फक्त तीनच पर्याय समोर होते. पहिला म्हणजे वर्गात जे शिकवलं
जायचं ते शिकायचं. त्यामुळे वर्गाला दांडी मारायची नाही. दुसरं एकत्रित अभ्यास करायचा. माझ्याच सारखे चार
दोन विद्यार्थी, जे क्लासला जाऊ शकत नव्हते अशांचा आपोआपच ग्रुप बनला व आम्ही लायब्ररीमध्ये एकत्र अभ्यास करायला सुरुवात केली. एकमेकांना अडलेल्या गोष्टी एकमेक दुसऱ्यांना समजावून
सांगत. त्यामुळे अभ्यास सुकर झाला व तिसरा पर्याय म्हणजे सेल्फ स्टडी. एखादी गोष्ट कळली नाही तर पुन्हा पुन्हा वाचायची.
जोपर्यंत पूर्णपणे
समजत नाही तोपर्यंत वाचायची. अभ्यासक्रमाला लावलेली क्रमिक पुस्तक अगदी संपूर्णपणे वाचायची. कुठलीही गोष्ट ऑप्शन म्हणून सोडायची नाही. या
त्रिसूत्रीवर अभ्यास केला. मेहनत केल्यावर फायदा हा होतोच. इंटर सायन्सला
अपेक्षेप्रमाणे यश मिळालं. माझ्या वर्गात असलेल्या, माझ्याहूनही हुशार व अगदी 'अगरवाल क्लासेस' मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा खूप अधिक मार्क मिळाले व अगदी सहजपणे
जे माझं ध्येय होतं ते साध्य झालं. मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली.
माझ्या कॉलेज जीवनाच्या सुरुवातीला असाच एक 'ग्रुप' बनला होता.
या ग्रुप मधली मुलं कॉलेजमध्ये नुसती नावाला यायची पण कोणत्या ना कोणत्या चित्रपटगृहात दररोज मॅटिनी पाहायला जायची. त्यानंतर काहीही कारण धारण नसताना कधी बँड स्टॅन्ड तर कधी जुहू चौपाटी तर
कधी शिवाजी पार्क या ठिकाणी बिनकामाची फिरत असायची. दोन-तीन
दिवस मीही त्यांच्याबरोबर गेलो पण नंतर हे सारं निरर्थक आहे हे ध्यानात आल्यानंतर
माझा तो ग्रुप जो सुटला तो कायमचा.
या ग्रुपमध्ये काही
अत्यंत हुशार मुलं होती. त्यातली काही तर बोर्डामध्ये आली
होती. अतिशय उज्वल भवितव्य असलेली ही मुलं दुर्दैवाने
शिक्षणातला आपला तो टेम्पो टिकवू शकली नाहीत कशीबशी पास झाली. त्यानंतर काय झालं माहित नाही पण मला ही मुलं पुढे कुठेही इंजिनिअरिंग
किंवा मेडिकल करताहेत अस दिसलं नाही.
तारुण्यामध्ये आपले ध्येय ठरवायचं असतं आणि ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न
करायचा असतो. तरुण वयामध्ये अनेक अमिष असतात ज्याला ट्रॅप असं म्हणतात. या ट्रॅपमध्ये जो फसतो तो आयुष्यामध्ये कसा बरे यशस्वी होऊ शकेल.
त्या दिवसात
रुईया कॉलेज समोर तीन हॉटेल्स होती. एक होतं 'डीपी' म्हणजे दुर्गा परमेश्वरी व दुसरं
होतं मणी’ज. ही दोन्ही हॉटेल्स उडीपी होती. त्यातलं मणी’ज च
वैशिष्ट्य असं की तिथे तुम्हाला हवं तेवढं सांबार व चटणी मिळायची. एक्स्ट्रा सांबार व चटणीला पैसे द्यावे लागायचे नाहीत. पण जे तिसरं हॉटेल होतं ते होतं 'जयेश'. हे मराठमोळ्या
खाद्य संस्कृतीवर आधारित हॉटेल होतं. क्वचित प्रसंगी तिथे
खाण्याचा योग आला. पण आजही तिथे खाल्लेली मिसळ मला आठवते. तिला कुठेच तोड नाही.
महाविद्यालयीन
जीवनात चित्रपटांना जाणं, पिक्चर्स बघणं,
पिकनिकला जाणं, सहलीला जाणं, पार्ट्या
करण किंवा श्रीमंत मित्रांच्या गावी फार्महाउस मध्ये किंवा घरी जाऊन
मजा करण असं काही असतं हेच माहित नव्हतं, त्यामुळे तसं काही
करण्याचा प्रश्न सुद्धा
उद्भवत नव्हता. रुईया कॉलेजमध्ये आर्ट फॅकल्टी होती.
ज्यात 90% मुली असायच्या. या
मुलींबरोबर बोलणं तर दूरच पण बघायला पण आम्ही लाजायचो. कदाचित मनात वाटणाऱ्या या लाजेनेच
आम्ही मोहपाशातून दूर राहिलो.
तरुणपणे
कित्येक वेळा फॅशन म्हणून तर काही वेळा मजा म्हणून सिगरेट, बियर, व्हिस्की घेणारी पण मुलं असायची.
त्यांच्याशी ओळख नव्हती असं नाही. पण
त्यांच्याबरोबर घालवायला वेळच नसायचा. एका अर्थी हे चांगलंच
झालं. सगळा वेळ अभ्यासात गेल्यामुळे मोकळा वेळ नसायचा. त्यामुळे अशा ओळखीच्या मुलांबरोबर मैत्री करायला ही वेळ नसायचा.
एकदा का आपण
आपली प्रायोरिटी सेट केली की मग कुठची अडचण येत नाही. जसा ऑटोमोबाईल इंजिनियरने गाडीचा गिअर बॉक्स डिझाईन केला आहे तसाच देवाने
आपल्याला डिझाईन केल आहे. गाडी चालवत असताना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या गियरमध्ये गाडी जात
असताना जसा रिव्हर्स गिअर घालताच येत नाही तसंच आपण आपल आयुष्य पुढे नेत असताना
मागे नेता येत नाही. मागे फक्त आठवणी राहतात.
आपल्या चुकांमुळे जर गाडी चालवताना ब्रेक लागला तरच गाडी थांबते. नाहीतर जोपर्यंत आत्मारूपी
पेट्रोल आपल्यात आहे तोपर्यंत गाडी पुढे चालतच राहणार. चुका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोह टाळण
व वाईट संगत टाळण होय. जर या दोन गोष्टी आपण टाळू शकलो तर बहुतेक प्रश्न निकालात निघतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा