माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५
राजा
शिवाजी विद्यालय (किंग जॉर्ज)
परंतु या प्रवेशामध्ये सुद्धा एक गोम होती. त्यावेळी किंग जॉर्ज लांब राहणाऱ्या मुलांना प्रवेश देत नसायची. दादर, माटुंगा, परळ, अँटॉप हिल, वडाळा, जास्तीत जास्त सायन पर्यंत राहणाऱ्या मुलांनाच प्रवेश
दिला जायचा. त्यावेळी वडील ज्या 'फिनले' मिलमध्ये
नोकरीला होते त्याच मिलमध्ये त्यांचे एक साहेब हिंदू कॉलनीत राहायचे. वडिलांनी शाळेचा फॉर्म भरत असताना त्यांचा पत्ता दिला. त्यामुळे शाळेत प्रवेश घेताना माझा पत्ता कट झाला नाही.
सातवीला
असताना वडिलांनी मला आग्रहाने सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायला सांगितलं. तसं त्यांनी मला घाटकोपर मधील म्युनिसिपालिटीच्या शाळेत असताना चौथीलाही चौथीच्या ‘मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षेला’ बसवलं होतं. पण मला काही ती स्कॉलरशिप मिळवता आली नाही.
यावेळी माटुंग्याच्या किंग जॉर्ज मध्ये असताना
सातवीच्या ‘हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेला’ बसायचं होतं.
सहावीच्या
परीक्षेत जरी वरचा नंबर नव्हता तरी मार्क खूप छान होते. त्यामुळे शाळेने स्कॉलरशिपला बसलेल्या
काही निवडक मुलांना 'स्पेशल ट्युशन' द्यायचं ठरवलं ज्यात माझा नंबर लागला. मी या स्पेशल ट्युशनमुळे स्कॉलरशिप परीक्षेत पास झालो व आठवी, नववी, दहावी व अकरावी ही चार वर्षे स्कॉलरशिप
म्हणून दर महिन्याला दहा रुपये मला मिळू लागले.
वडिलांनी मला माटुंग्याच्या किंग जॉर्ज मध्ये घातले खरे पण शाळेच्या
स्कूलबस मधून जाण्याइतपत आमची आर्थिक ऐपत नव्हती.
त्यामुळे ट्रेनने जाणे-येणे हाच एकमेव पर्याय होता. माझ्या विभागातील माझ्याहून वयाने मोठी असलेली काही मुलं त्याच शाळेत जायची. मीही त्यांच्याबरोबर जायचो. लहान म्हणून ते
माझी काळजी घ्यायचे. मी मोठा झाल्यावर माझ्या विभागातील
माझ्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची मी काळजी घ्यायचो. ही
परंपरा होती. ती कोणीतरी सुरू केली. आम्ही त्या परंपरेचा भाग बनलो व ती परंपरा पुढे नेली.
शाळेतून सुटल्यावर येताना मात्र गाडीला थोडीशी गर्दी असायची पण
आजच्या एवढी तर नक्कीच नाही. दादर वरून प्लॅटफॉर्म नंबर
तीन वरून सुटणारी ५.१४ ची ठाणे गाडी मिळणं अतिशय कठीण होतं. कारण शाळेतून ५ वाजता सुटून १४ मिनिटात दादर स्टेशनवर चालत येण कठीण होतं. पण त्यानंतरची ५.३२ ची कल्याण गाडी आरामात मिळायची. चढायला तर नक्कीच मिळायच. सुरुवाती
सुरुवातीला आणि पाचवीला असताना वडील मिल वरून सुटल्यानंतर दादर स्टेशनवर माझी वाट
पाहत थांबायचे. कधी कॅन्टीन मधील बटाटावडा तर कधी
प्लॅटफॉर्मवर लागलेल्या स्टॉल वरील चॉकलेट-गोळ्या पण आपल्या ऐपती प्रमाणे घेऊन द्यायचे. गाडी आली की मी फर्स्ट क्लास मध्ये शिरायचो व वडील थर्ड क्लास मध्ये. त्यावेळी फर्स्ट क्लास व थर्ड क्लास हे दोनच वर्ग होते. जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी थर्ड क्लासच्या
वर्गाला सेकंड क्लास म्हणायला सुरुवात केली. फक्त नाव
बदललं. बाकी ना सोयी सुविधा वाढल्या ना गर्दी कमी झाली.
बुधवार, २२ जानेवारी, २०२५
माझी
म्युनिसिपाल्टीची शाळा
१९६३ ते १९६४ हे शैक्षणिक वर्ष मी कोल्हापूरला होतो. माझ्याहून ३-४ वर्षांनी मोठी असलेली माझी बहीण त्यावेळी कोल्हापूरला शाळेत जायची. मी तीन-चार वर्षाचा होतो. मी तिच्याबरोबर शाळेत जायचो आणि तिच्या वर्गात तिच्याच बरोबर बसायचो. त्यावेळी अस सगळं चालायचं. काही कळायचं नाही. मात्र कानावर जे पडायचं ते कुठेतरी मेंदूत टिपलं जायचं. त्यामुळे फॉर्मली शाळेत न जाताच अगदी दहापर्यंतचे पाढे माझे तोंडपाठ झाले होते. लिहिता येत नव्हतं पण काही कविता सुद्धा तोंडपाठ झाल्या होत्या.
१९६४ ला जूनच्या सुमारास माझ्या वडिलांनी कुटुंब पुन्हा एकदा मुंबईला हलवलं व आम्ही घाटकोपरला राहायला आलो. मला शाळेत टाकायचं एवढं माझं वय झालं होतं, म्हणजे चार वर्षे पूर्ण झाली होती. वडिलांना मला त्यावेळी इंग्रजी माध्यमात घालावे अस वाटू लागलं होतं. पण आमच्या घराजवळ ‘फातिमा हायस्कूल’ ही विद्याविहारला असलेली एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा होती पण ती कॉन्व्हेंट होती. त्या शाळेत माझ्यावर वेगळेच धार्मिक संस्कार होतील हे माझ्या वडिलांच्या त्यावेळेस लक्षात आलं आणि त्यांनी तो पर्याय नाकारला. जवळ दुसरी कुठचीच खाजगी शाळा उपलब्ध नसल्यामुळे कदाचित नाईलाजाने म्हणा पण वडिलांनी मला म्युनिसिपालिटीच्या शाळेत घालायचं ठरवलं.
शाळेत
ऍडमिशन घेण्यासाठी माझे वडील मला घेऊन जेव्हा गेले तेव्हा थोडा उशीरच झाला होता.
माझे वडील मला घेऊन मुख्याध्यापकांना भेटले. 'लोणे' गुरुजी त्यावेळी मुख्याध्यापक होते. त्यांच्या
केबिनमध्ये वडील मला घेऊन ज्यावेळी शिरले तेव्हा त्यांनी पहिलीची ऍडमिशन फुल झाली
आहे, तुम्ही दुसऱ्या म्युनिसिपल शाळेत प्रवेश घ्या म्हणून
सांगितलं. त्यावेळी पहिलीची काही मुलं
नापास होतात आणि दुसरीच्या इयत्तेत काही जागा रिकाम्या असतात याचा वडिलांना अंदाज होता. त्यामुळे त्यांनी लोणे गुरुजींना मला
दुसरीच्या वर्गात प्रवेश द्यावा म्हणून विनंती केली. लोणे
गुरुजींना थोडसं आश्चर्य वाटलं. मी खूपच लहान होतो. वय केवळ चार वर्षे पूर्ण होतं. पण त्यांनी मला काही
प्रश्न विचारले. मी दहापर्यंतचे पाढे,
जे माझ्या तोंडपाठ होते, बोलून दाखवले.
काही कविताही, ज्या पाठ होत्या त्या
बोलून दाखवल्या. माझ्या सुदैवाने लोणे गुरुजींनी माझ्याकडून
काही वाचून घेतलं नाही कारण मला त्यावेळी लिहिता किंवा वाचता येतच नव्हतं.
तोंडी परीक्षेत मी पास झालो होतो व त्यामुळे लोणे गुरुजींनी मला
डायरेक्ट दुसरीच्या वर्गात प्रवेश दिला.
दुसरीच्या वर्गात आम्हाला दोन बाई होत्या. त्यातल्या एक ‘एक’ वेणी घालायच्या तर दुसऱ्या ‘दोन’ वेण्या घालायच्या. त्यातल्या एका बाईचं नाव 'साळगावकर' होतं एवढ आठवतं. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ यानुसार मी दुसरी मध्ये प्रथम क्रमांकाने पास झालो.
त्यानंतर तिसरी मध्ये 'जाधव' गुरुजी तर चौथी मध्ये 'गावकर' गुरुजी मला शिकवायला होते. दुसरी, चौथी मध्ये दोन्ही शिक्षक अतिशय प्रेमळ होते पण तिसरी मधले 'जाधव' गुरुजी मात्र भलतेच मारकुटे निघाले. सुदैवाने मी अभ्यासात हुशार असल्यामुळे व नेहमीच पहिला येत असल्यामुळे 'जाधव' गुरुजीनी मला ना कधी दम दिला, ना कधी मारलं. उलट त्यांनी एक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, स्वच्छता मंत्री असं वर्गाचे मंत्रिमंडळ बनवलं होतं त्यात मला शिक्षण मंत्री बनवला. अवघ्या सहाव्या वर्षी मी अशा रीतीने 'मंत्री' झालो.
म्युनिसिपालिटीच्या शाळेत एक चांगली गोष्ट होती. घरचा अभ्यास करायची काही पद्धत नव्हती. शाळेत शिकवायचे तेवढेच खरं. बाकी मुलांना जे काही वाटायचं ते त्यांनी करायचं. घरचा अभ्यास घ्यायची जबाबदारी व तो तपासायची जबाबदारी सुद्धा घरच्यांची. तसा आमच्या विभागात कोणी आपल्या मुलाचा घरचा अभ्यास घेतला असेल असं आज तरी मला वाटत नाही.
पाटी व
चुन्याची पेन्सिल हे अभ्यासाचे प्रमुख साधन. मराठी, गणित व इतर एक दोन पुस्तकं सोडली तर बाकी
काहीच साहित्य लागायचं नाही. वह्या प्रत्येकाने
आपापल्या ऐपतीनुसार व गरजेनुसार आणायच्या. नाही आणल्या तरी
गुरुजी काही बोलायचे नाहीत. त्यांना विद्यार्थ्यांच्या
पालकांच्या सांपत्तिक स्थितीची पूर्ण कल्पना असायची.
त्यावेळी देखील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये काही ना काही तरी आहार मिळायचा. पाव लिटरच्या बाटलीतून मुलांना दूध मिळायचं. कधी खारे शेंगदाणे तर कधी बिस्किट मिळायची. बिस्किट सुद्धा मारी असायची. क्वचित प्रसंगी बनपाव खाल्लेले सुद्धा मला आठवतात. बिस्किट तर एवढी मिळायची की कधीकधी एक्स्ट्रा बिस्किट मुलं दप्तरातून सुद्धा घरी न्यायची. पोरांचे खिसे शेंगदाण्याने भरलेले असायचे.
त्यावेळच्या
म्युनिसिपालिटीच्या
शाळेमध्ये सुद्धा अतिशय उत्तम शिक्षक असायचे व ते शिकवायचे सुद्धा चांगलं. त्यामुळे माझ्या प्राथमिक शिक्षणाचा मजबूत पाया म्युनिसिपालिटीच्या शाळेत
रचला गेला याचा मला खूप अभिमान आहे.
मंगळवार, २१ जानेवारी, २०२५
वाचनाच वेड
‘बहुश्रुत होण्यासाठी खूप काही ऐकावं लागतं तर अंतर्मुख होण्यासाठी खूप काही वाचावं लागतं’. माझ्या नशिबाने मला वाचनाची गोडी खूप आधीपासून लागली. जरी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी प्राधान्यक्रम पक्का होता. शिक्षण सर्वात प्रथम, त्यामुळे पुस्तके व वह्या आणि इतर शालेयोपयोगी वस्तू लगेचच मिळायच्या. एकवेळ नवे कपडे मिळाले नाहीत किंवा दिवाळीला फटाके विकत घेतले नाहीत पण घरी खाण्याची व वर्तमानपत्र व मासिकांची मात्र आबाळ झाली नाही. घरी रोज ‘महाराष्ट्र टाईम्स’ यायचा. मला आठवत, ‘मार्मिक’ च्या सुरुवातीच्या दिवसात ‘मार्मिक’ ही यायचे. त्यात असलेली काही व्यंगचित्रे मला आजही आठवतात.
आमच्या घरात खास मुलांसाठी म्हणजे माझ्या व माझ्या
बहीणीसाठी ‘कुमार’ व ‘अमृत’ ही मासिके ही
येत. ‘चांदोबा’ घरात कोणालाच आवडत नसे. त्यातल्या
गोष्टी बकवास, खोट्या आणि केवळ रंजक आहेत असं सर्वांच मत होत . ‘कुमार’ मध्ये
अतिशय सुरेख कथा यायच्या ज्यातुन बोध घ्यायला मिळायचा व ज्ञानवृद्धी पण
व्हायची. आणि ‘अमृत’ तर मराठीमधील रीडर्स डायजेस्ट होतं. ज्यात सुंदर
माहिती मिळायची. लहान वयात ‘कुमार’ व ‘अमृत’ या दोन
मासिकांचा माझ्यावर खूप सकारात्मक परिणाम झाला आणि त्यामुळे मला वाचनाची गोडी लागली.
दिवाळीच्या
आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी आधाशासारखा पुस्तक वाचत असायचो. दिवसाला दोन-तीन लहान लहान पुस्तक मी अगदी सहजच वाचायचो. पण प्रश्न
वाचनाचा नव्हता तर पुस्तक कुठून आणायची हा होता. त्यामुळे मी रद्दीच्या दुकानात जाऊन किलोच्या भावाने जुनी पुस्तक विकत घ्यायचो व ती वाचायचो. त्यानंतर प्रश्न आला की आता या पुस्तकांचं काय करायचं. त्यामुळे
मी सातवीत असतानाच स्वतःच ‘श्री पंत वाचनालय’ हे बेळगावचे संत ‘श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकरां’च्या नावाने एक घरगुती वाचनालय चालू केलं. तसा एक ‘रबर स्टॅम्प’ पण बनवून
घेतला व मोठ्या ऐटीत तो प्रत्येक पुस्तकावर मारला.
आमच्या विभागात राहणारे माझ्यासारखे इतर विद्यार्थी या वाचनालयाचा लाभ घेत. मीही त्यांना छोटी पुस्तके पाच पैशात तर मोठी पुस्तके दहा पैशात वाचायला द्यायचो. अशा तऱ्हेने जमा झालेल्या पैशातून मी पुन्हा रद्दीच्या दुकानातून पुस्तके विकत घ्यायचो आणि असं करता करता अगदी एक मोठी ट्रंक भरेल एवढी पुस्तके माझ्याकडे जमा झाली. अर्थात ही सगळीच्या सगळी पुस्तके मी वाचून काढली होती. माझं हे वाचनालय जे सातवीला सुरू झालं ते पुढे दहावीची परीक्षा होईपर्यंत चालूच राहिलं. शेवटी एसएससी च महत्वाच वर्ष आलं. त्यामुळे हे वाचनालय जे बंद झालं ते कायमचं. परंतु हे वाचनालय चालू केल्यामुळे माझं केवळ वाचनच वाढलं असं नाही तर विभागातील इतर मुलांशी संपर्क देखील वाढला. वाचनालय चालू करण म्हणजे एक 'नोबल' काम होतं. त्यामुळे विभागात चांगलं नावही झालं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे काहीतरी धंदा करावा याचं बीजारोपण अतिशय लहान वयात झालं.
माझ्या घरापासून साधारण पंधरा मिनिटं चालत एवढ्या अंतरावर ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय’ होतं. त्याची मासिक फी अतिशय माफक होती. जी मला परवडणारी देखील होती. या ग्रंथ संग्रहालयाने मला अनेक चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली. संपूर्ण सावरकर, पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, ना. स. इनामदार, कुसुमाग्रज, ग्रेस सारख्या अनेक लेखकांच्या पुस्तकांचं अगदी शाळेत असतानाच वाचन झालं होतं. कॉलेजमध्ये जायच्या आधीच जे वाचन झालं होतं तेच वाचन मला पुढच्या संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडल. खरं सांगायचं तर प्रोफेशनल आयुष्यात अशाप्रकारे अवांतर वाचन करण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे वाचन फक्त वर्तमानपत्रातील लेखांपुरतं मर्यादित राहील हे सांगायला मला कुठेही संकोच वाटत नाही.
कधी कधी असं वाटतं की लहानपणी जे होऊन जातं ते मोठेपणी करता येत नाही. आचार्य
अत्रेंच ‘कर्हेचे पाणी’ लक्ष्मीबाई
टिळकांच ‘स्मृती
चित्रे’, महात्मा गांधींचे ‘माझे सत्याचे
प्रयोग’, गो. नी. दांडेकर, विश्राम बेडेकरांच ‘रणांगण’ व ‘एक झाड दोन
पक्षी’, पु ल देशपांडे, इरावती कर्वे, व. पु. काळे, चिं. त्र्यं खानोलकर
उर्फ आरती प्रभू, राम गणेश गडकरी ची. वी. जोशी, ‘५५ कोटींचे बळी’ ही गोपाळ
गोडसेंची आत्मकथा, बाबासाहेब पुरंदरे, किती लेखक आणि लेखिका सांगू? या सर्वांनी माझं साहित्यिक आयुष्य संपन्न केलं.
पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर चांगले मार्क मिळालेच पाहिजेत नाहीतर शिष्यवृत्ती मिळणार नाही म्हणून परीक्षेच दडपण असायचं. हे दडपण असायचं म्हणून खूप अभ्यास करावा लागायचा आणि खूप अभ्यास करावा लागायचा म्हणजे अभ्यासाला वेळही द्यावा लागायचा. यातून अवांतर वाचनाला जवळजवळ वेळच नसायचा. परंतु एक गोष्ट नक्की, ज्या दिवशी वर्तमानपत्र छापली जात नाहीत तो दिवस सोडला तर असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी संपूर्ण वर्तमानपत्र मी वाचलं नाही. कमीत कमी दोन किंवा तीन वर्तमानपत्र तर मी वाचायचोच वाचायचो. अगदी त्याच्या अग्रलेखासहित. त्यामुळे पुस्तकांपासून जरी दूर गेलो तरी रोजच्या घडामोडी मग त्या राजकीय असोत सांस्कृतिक असोत किंवा सामाजिक, यांच्याबरोबर माझे नाळ नेहमीच जुळलेली असायची.
रविवार, १९ जानेवारी, २०२५
अतरंगी पोर
जशी सगळीकडे असतात तशी चाळीमध्ये सुद्धा अतरंगी पोरांची काही कमी
नव्हती. तसं या पोरांचं अभ्यासात लक्ष कमी आणि उडानटप्पूपणा
करण्याकडे जास्त ओढा. चाळीमध्ये तसाही पोरांना
आई-वडिलांचा फारसा धाक नसायचा आणि ह्या अतरंगी पोरांना तर नव्हताच नव्हता.
चाळीत पाळलेल्या
कोंबड्या खुडूक झाल्या म्हणजे अंडे देईनाशा झाल्या की त्यांच्या पायाला एक दोरी
बांधायची व त्या दोरीला एखादा पत्र्याचा डबा बांधायचा. कोंबडीला द्यायचं सोडून. मग कोंबडी धावत पुढे आणि मागून तो आवाज करणारा डबा. त्या आवाजाने कोंबडी आणखीन घाबरायची व आणखीन जोराने पळत सुटायची.
तिच्यामागे सारी अतरंगी पोरं लागायची.
आमची वस्ती खाडीला लागून होती. त्यावेळी भूमिगत गटार नव्हती. जी गटार होती ती उघडीच होती. पावसाळ्यात त्यात पाणी साठायचं आणि त्या पाण्यात, बहुदा खाडीतून असेल, छोटे छोटे मासे यायचे. मे महिन्यामध्ये बांबूच्या टोपल्या मधून आंबे विकले जायचे. त्या टोपल्या अशा वेळी उपयोगी पडायच्या. ही अतरंगी पोरं या टोपल्यानी गटारातले मासे पकडायची. त्यावेळी फारसं काही कळत नव्हतं. माशांना चांगलं पाणी लागतं, चांगलं अन्न लागतं आणि त्याहून जास्त म्हणजे हवा लागते. पोरं हे पकडलेले मासे छोट्या छोट्या काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवायची. गटारातलं पाणी गढूळ असायचं म्हणून बाटलीत नळाच शुद्ध पाणी भरलं जायचं. खरं बघता या शुद्ध पाण्यात क्लोरीन असायच. त्यामुळे मासे लवकर मरायचे. पोराना कळतच नव्हतं. ज्यांना थोडीफार अक्कल होती ते गटाराच्या पाण्यातच माशांना ठेवायचे पण त्यांना खायला घरातला भात घालायचे. एक दोन दिवसांनी हा भात आतमध्ये सडायचा व मासे मरायचे.
परंतु काही मुलं हुशार
होती. पावसाळ्याच्या दिवसात ते बाहेर परात ठेवत. पावसाचं परातीत जमलेले पाणी शुद्ध असायचं. ते
पाणी, ती मुलं माशांना पाळण्यासाठी वापरायचे. त्यामुळे
मासे थोडे जास्त दिवस जगत.
आधी ‘प्राणी संग्रहालय’ या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे चाळीत काही जणांनी कोंबड्या पाळल्या होत्या. आमच्या चाळीतला एक पोरगा सकाळी खूप लवकर उठायचा व कोंबड्यांच्या खुराड्यातील अंडी चोरायचा. हा प्रकार बरेच दिवस चालला होता. पण एकदा त्याला रंगेहात पकडला. त्या दिवसापासून चाळकऱ्यांनी त्याचं नाव 'अंड्या' म्हणून ठेवून दिलं.
छोट्या-मोठ्या चोऱ्या करणं
यात या अतरंगी पोरांना थ्रील वाटायचं. केळीवाला, फळवाला जिन्यातून वरून खाली उतरत असताना त्याच्या डोक्यावर जी टोपली
असायची त्यातून फळ चोरण्यामध्ये काही जणांचा हातखंडा
होता. एकदा एका केळीवाल्याच्या टोपलीत केळीचा फक्त एक
घड उरला होता. म्हणजे साधारण एक डझन केळी उरली होती.
एका अतरंगी पोराने ती वरच्यावर उचलल्यानंतर त्या केळीवाल्याचं
डोक्यावरच वजन एकदम हलकं झालं आणि त्या अतरंगी पोराची चोरी पकडली गेली.
चाळीमध्ये लग्न होऊन
नव्यानेच चाळीत प्रवेश करणाऱ्या नववधूच्या किंवा हॉस्पिटलमध्ये जन्माला येऊन
प्रथमच चाळीत येणाऱ्या बाळाच्या अंगावरून काही जण नारळ उतरवत असत. हा
उतरवलेला नारळ फोडून बाजूला फेकून देत असत. हे नारळ
बिनधास्त खाणारी पोरं हीच खरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यावेळचे कार्यकर्ते
होते. एवढेच कशाला, लहान बाळांना
दृष्ट लागू नये म्हणून दर शनिवारी आपल्या पोरांवर लिंबू फिरवून ते चाळीच्या बाहेर
टाकून देण्याची काही जणांची प्रथा होती. आमच्या चाळीतली काही पोरं तर ही लिंब पण उचलायची व त्याचे लिंबू सरबत करून
प्यायची.
चोर-पोलीस खेळत असताना किंवा लपाछपी खेळत असताना चाळीच्या गच्चीवर जाऊन आऊट होऊ नये म्हणून तिसऱ्या माळ्यावरून पाण्याच्या पाईपच्या सहाय्याने खाली उतरणारी मुलं तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहेत. त्यावेळी त्याचं काही फारसं वाटायचं नाही. पण आता ज्यावेळी विचार करतो त्यावेळी ते किती अनसेफ होतं हे लक्षात आल्यावर अंगावर काटा उभा राहतो.
.
शनिवार, १८ जानेवारी, २०२५
कबड्डी
चाळ संस्कृतीची विशेषता अजून एका गोष्टीत आहे ती म्हणजे
वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा भरवणं. आजकाल जस गल्लोगल्ली क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्याचं पीक
आला आहे, अगदी बॉक्स क्रिकेट सुद्धा
पॉप्युलर झाल आहे, अशा वेळी त्या जमान्यात कबड्डीचे, अगदी तिकीट लावून सामने व्हायचे
हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल.
आमच्या विभागात साधारण १४० चाळी होत्या आणि या सर्व चाळीच मिळून एक ‘महाराष्ट्र मंडळ’ देखील होतं. त्यावेळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा विषयक कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ घ्यायच. डॉक्टर दत्ता सामंत आमच्याच विभागात राहायचे आणि त्यांनीच हे महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं होतं.
आमच्या विभागात एक अतिशय मोठं क्रीडांगण होतं आता ज्याला आचार्य अत्रे उद्यान असं म्हणतात. त्या उद्यानात अगदी राज्यस्तरीय कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या जायच्या. विशेष म्हणजे थंडीचा मोसम हा कबड्डी खेळण्याचा काळ असतो आणि या थंडीच्या मोसमात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या स्पर्धा भरायच्या. यामध्ये संपूर्ण मैदान चहुबाजूने जूटचे कापड लावून बंद केले जायचे व त्यावेळी, पाच पैसे किंवा दहा पैसे असंच तिकीट असायचं. लोकं कबड्डीचे सामने बघायला अगदी तिकीट काढून यायचे. आम्ही मात्र लहान असल्यामुळे कापडाच्या खालून, अगदी घुसून, फुकटचे सामने बघायचो. अर्थात ते सामने आयोजित करणारे आमच्याच विभागातले असल्यामुळे ते आमच्यासारख्या चिल्ली-पिल्ली असलेल्यांकडे दुर्लक्षच करायचे.
त्यावेळी 'खुला' गट व 'व्यावसायिक' गट असे दोन गट असायचे. खुल्या गटात वेगवेगळ्या क्रीडा मंडळाचे संघ स्पर्धेत उतरायचे तर व्यावसायिक गटात रेल्वे, बँका, बीइएसटी, सारखे वेगवेगळ्या कंपन्यांचे किंवा ऑर्गनायझेशनचे कबड्डीचे संघ उतरायचे. थंडी खूप असायची पण त्या थंडीत देखील आम्ही शेवटपर्यंत कबड्डीच्या सामन्याचा आनंद लुटायचो. या अशाच सामन्यात आम्ही बीइएसटी मधून खेळणाऱ्या मधु पाटलांना खेळताना पाहिल आहे की ज्याने पुढे एशियाड मध्ये भारतीय कबड्डी संघाचे नेतृत्व केले.
या खुल्या आणि व्यावसायिक अशा दोन पुरुष गटांबरोबर महिलांचेही संघ खेळायचे आणि त्यातही महाराष्ट्र स्तरावरील अनेक महिला कबड्डीपटूंना आम्ही खेळताना पाहिल आहे.
यापासून प्रेरणा घेऊन पुढे मोठा झाल्यावर कबड्डीची आवड कधी निर्माण झाली ते कळलच नाही. चाळीच्या जवळ असलेल्या छोट्याशा मोकळ्या जागेत आम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करायचो व आमचा संघ वेगवेगळ्या टूर्नामेंट मध्ये भागही घ्यायचा. मी जरी खूप चांगला कबड्डी खेळाडू नव्हतो तरी बऱ्यापैकी खेळत असल्यामुळे कित्येक वेळा संघामध्ये मीही खेळायचो. आमचा संघ अनेक वेळा फायनल पर्यंत पोहोचला. एवढेच नव्हे तर मुंबई उपनगरातील प्रथमश्रेणी दर्जाच्या काही कबड्डी टूर्नामेंटमध्ये फायनल पण मारलेली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)