'वाटाडे' मित्र
जस मी या
आधी सांगितलं की एसएससी नंतर कुठे
जायचं? आर्ट्सला
जायचं? सायन्सला
जायचं? की
कॉमर्सला जायचं? हे त्यावेळी
माहित नव्हतं. त्यावेळी
माझ्या शाळेतील वर्गात असलेल्या बहुसंख्य मुलांनी ठरवलं की सायन्सला जायचं म्हणून मीही
सायन्सला गेलो.
माझ्या वेळी जुना अभ्यासक्रम होता. ११ वी ला एसएससी ची परीक्षा असायची.
त्यानंतर ४ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. इंजीनियरिंग किंवा मेडिकलला जायचे असेल तर सायन्सला जायच.
पहिल्या वर्षी म्हणजे फर्स्ट ईयर सायन्सला फिज़िक्स, केमिस्ट्री, गणित व बायोलॉजी हे
विषय असत. दुसऱ्या वर्षी म्हणजे इंटर सायन्सला गणित किंवा बायोलॉजी पैकी
एक विषय घ्यावा लागे. ज्यांना इंजीनियरिंगला जायचे आहे त्यांना गणित व ज्यांना
मेडिकलला जायचे आहे त्यांना बायोलॉजी घेणे अनिवार्य असे.
इंजीनियरिंगला जायचं असेल तर
‘ए’ ग्रुप घ्यायचा ज्यात बायोलॉजी नसायचं तर मेडिकलला जायचं असेल तर ‘बी’ ग्रुप
घ्यायचा ज्यात मॅथेमॅटिक्स नसायचं. मनातनं खूप
वाटायचं की डॉक्टर व्हावं. पण इंटरसायन्स नंतर डॉक्टर व्हायला साडेपाच वर्षे लागायची तर इंजीनियर
व्हायला फक्त चार वर्ष. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी आणखीन दीड वर्ष लागेल. तोपर्यंत
घर कसं चालेल? हाही एक
मनात विचार असायचा. पण त्यावेळी पुन्हा मित्र धावून आले. माझ्याबरोबरच्या बहुसंख्य मित्रांनी इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं. त्यामुळे
मीही इंजीनियरिंगला जायचं म्हणून ‘ए’ ग्रुप घेऊन मोकळा झालो.
त्यावेळी
इंजिनिअरिंगची कॉलेजेस खूपच कमी होती. महाराष्ट्रात इंजीनियरिंगच एकही
प्रायव्हेट कॉलेज नव्हतं. मुंबईमध्ये व्हीजेटीआय व सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ही दोनच कॉलेजेस होती. त्यामुळे
पर्याय खूप कमी होते. नाही म्हणायला गेलं तर ज्याला केमिकल इंजिनिअरिंग करायचं त्याला युडीसिटी हा
पर्याय होता. पण माझं
आणि केमिस्ट्रीच थोडसं वाकडच असल्यामुळे मला काही युडीसिटी चा पर्याय उपयोगाचा
नव्हता.
इंटर
सायन्सला चांगले मार्क मिळाल्यामुळे व्हीजेटीआय ला ऍडमिशन मिळाली खरी पण खरी गंमत तर
नंतरच होती. फर्स्ट इयर
इंजीनियरिंगला सर्व विषय सारखे होते व दुसऱ्या वर्षानंतर सिविल,
इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल असे पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे नेमकं सिविल, इलेक्ट्रिकल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं याबद्दल सुद्धा मला काही फारसं
कळत नव्हतं. तिथे सुद्धा माझे मित्रच मदतीला आले. मार्कांच
बोलाल तर त्यावेळी मेकॅनिकल नंतर इलेक्ट्रिकल नंतर सिविल असे प्राधान्य क्रम होते. मेकॅनिकल
इंजिनिअरिंगला जास्त मार्क लागत. परंतु फर्स्ट इयर इंजीनियरिंगला चांगले मार्क मिळाल्यामुळे मला तीनही पर्याय
खुले होते. अशा वेळी
पुन्हा एकदा माझे मित्रच कामाला आले व बहुसंख्य मित्रांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला
ऍडमिशन घ्यायचं ठरवल्यामुळे मी त्यांच्याबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ब्रांच
निवडली.
आयुष्य हे
असं असतं. ज्यावेळी अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि नेमकं कुठचा पर्याय निवडावा हे
माहीत नसतं, ज्यावेळी
आपल्या वाटेसमोर अनेक वाटा फुटत असतात आणि कुठच्या वाटेवरून जायचं हे माहीत नसतं, अशावेळी
सगळ्यात बेस्ट म्हणजे लोकांबरोबर राहणे. ज्या
वाटेवरून जास्तीत जास्त लोक चालतात, ज्या वाटेकडे जास्तीत जास्त लोक जातात तिथेच जाणं जास्त सेफ आहे. ‘कलेक्टिव
विस्डम’ हा मला खूप
उशिरा कळलेला शब्द आहे पण आयुष्यात तो लवकर उमगला व उपयोगात आला.
‘माणसाची ओळख ही
त्याच्या सहकाऱ्यांवरून होते’ असं
म्हणतात. नशिबाने अगदी शालेय जीवनापासून ते महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षण येईपर्यंत
मला अतिशय चांगले मित्र लाभले. त्यातील
बहुतेकांना घरच्यांचे माझ्याहून जास्त मार्गदर्शन
असावे.
त्यांच्यामुळेच मला चांगले निर्णय घेता आले व कुठेही पश्चातापाची पाळी आली नाही. इंजीनियरिंग हे माझं आवडतं क्षेत्र. याच
क्षेत्रात शिकलो. याच
क्षेत्रात नोकरी केली. याच
क्षेत्रात व्यवसायही केला. त्यामुळे
शिकताना, नोकरी
करताना किंवा व्यवसाय करताना जेव्हा मेहनत घ्यावी लागते त्यावेळी ना थकवा आला ना
कंटाळा आला. जे काम मी करत होतो ते मी एन्जॉय करत होतो. त्या
कामातून काही मिळत होतं की नव्हतं, पैसे मिळत होते की नव्हते हा वेगळा भाग झाला. पण ते काम करत असताना आनंद तर नक्कीच मिळत होता. त्यामुळे
प्रचंड मोठं असं मानसिक समाधान आयुष्यभर लाभत गेला.
आपण आपल्या
आवडीच्या क्षेत्रातच काम केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे. काम करताना लोक कंटाळतात, थकतात. त्यांना
सुट्ट्यांची आवश्यकता वाटते. त्याचं कारण ते काम करायचं म्हणून करतात. जबरदस्तीने
करतात. मजबुरीने
करतात. दुसरं काही
करता येत नाही म्हणून करतात हे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर आपण काम केलं तर कधीच कंटाळा
येत नाही. कधीच थकायला होत नाही. काम करतानाही अधिक शक्ती व उत्साह मिळत जातो. आपण
स्वतः आनंदी तर राहतोच पण कामालाही योग्य तो न्याय देऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा