माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

 

व्हीजेटीआय मधील शेवटचे वर्ष

 


माझ्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीतील सर्वात आनंदाचे वर्ष म्हणजे माझं इंजीनियरिंग शेवटचं वर्ष.  तीन वर्ष इंजीनियरिंग मध्ये शिक्षण घेतल्यानंतर परीक्षेचा व पेपरचा पूर्ण अंदाज आलेला असतो. पूर्ण मॅच्युरिटी आलेली असते. अभ्यास कसा करायचा, किती करायचा, कुठून करायचा याचं पूर्ण भान आलेलं असतं. मुख्य म्हणजे पहिल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक सेमिस्टरला सहा असे एकूण बारा विषय असायचे. त्यामानाने शेवटच्या वर्षी ज्याला प्रोजेक्ट किंवा थिसिस म्हणतात तो जर सोडला तर केवळ सहा-सातच विषय असायचे. त्यातले दोन विषय तर आपणच निवडायचे असतात. त्यामुळे अभ्यास करणं अतिशय सोपं जातं.

 

आम्ही सर्व मित्रांनी आमच्या सिनियर्सनी सांगितलेल्या अनुभवावर विश्वास ठेवून आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा 'मान' ठेवून शेवटच्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहायचं ठरवलं. आतापर्यंत आम्ही 'डे स्कॉलर' होतो. शेवटच्या वर्षी आम्ही 'होस्टेलाईट' झालो.  इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षी येईपर्यंत माझ्या घरची परिस्थिती पण थोडीशी सुधारली होती. मोठी बहीण नोकरीला लागली होती व तिचाही कुटुंबाला हातभार लागत होता. त्यामुळे होस्टेलमध्ये राहणं व हॉस्टेलची मेसची फी भरणे फार कठीण काम नव्हतं.

 

आतापर्यंत अगदी शाळेपासून इंजिनिअरिंगपर्यंत एकत्र असलेले काही जण व रुईया कॉलेज पासून इंजीनियरिंग पर्यंत असलेले अनेक जण जरी मुंबईमध्ये राहत असलो तरी सर्वांनी मिळून हॉस्टेलमध्ये राहायचं ठरवलं. १९८०-८१ या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षात होस्टेलमध्ये राहून आम्ही जे कॉलेज लाईफ एन्जॉय केलं ते केवळ अविस्मरणीय होतं. अभ्यासाचं शून्य टेन्शन होतं.  आपण पास होणारच एवढंच नव्हे तर फर्स्ट क्लास मध्ये पास होणार याची जवळजवळ सर्वांनाच खात्री होते. काही जण मात्र डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे म्हणून अधिकचा अभ्यास करायचे पण आम्ही मात्र त्यात नव्हतो.

 

चाळीमध्ये असतं अगदी तसंच वातावरण हॉस्टेलमध्ये असतं. कोणीही कोणाच्याही रूममध्ये कधीही घुसायचं आणि काय वाटेल ते करायचं. कोणाला कोणाचाच धरबंध नसायचा. कॉलेजच्या वेळात कॉलेजमध्ये जायचं. दुपारी प्रत्येकाचे डबे भरून यायचे. ते अगदी सामुदायिक रित्या खायचे. त्यानंतर पुन्हा थोडा वेळ कॉलेज व मग मजाच मजा. संध्याकाळी सात वाजता मेस उघडायची. ती कधी उघडायची याचीच आम्ही वाट बघायचो. सात वाजता मेस उघडली की आम्ही जेवून घ्यायचो. तरुण होतो. भूक तर नेहमीच लागायची. एकदा जेवण झालं की मग गार्डनमध्ये फिरणं, गप्पा मारणं आणि मुख्य म्हणजे पत्ते खेळणे.

 

इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षांमध्ये असताना आमच्या ग्रुपमधला प्रत्येक मुलगा हा तीन पत्ती खेळण्यात एवढा तरबेज झाला होता की आमच्यापैकी बहुतेकांना त्याचं जवळजवळ व्यसनच लागलं होतं. अगदी परीक्षेच्या दिवशी सुद्धा आम्ही पत्ते खेळायचो. अभ्यासाची चिंताच नव्हती. म्हटलं ना सगळा अभ्यास झालाच असायचा. अकरा वाजता परीक्षेचा पेपर असायचा. हॉस्टेल पासून कॉलेजला जायला पाच मिनिटे सुद्धा खूप व्हायची. त्यामुळे अगदी साडेदहा वाजले तरी अजून एक डाव खेळू, अजून एक डाव खेळू असा आग्रह चालूच असायचा. 

 

व्हीजेटीआय मधल्या या शेवटच्या वर्षात मी सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला. त्याच्या आदल्या वर्षी मी तर 'युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह' म्हणून निवडून आलो होतो. त्यावेळी मी थर्ड इयर इंजीनियरिंग ला होतो. त्याच्या आधी फर्स्ट आणि सेकंड ईयर इंजिनिअरिंगला असताना 'क्लास रेप्रेझेंटेटिव्ह' म्हणून निवडून आलो होतो. कॉलेजच्या गॅदरिंगला मराठी एकांकिका बसवण्यापासून अगदी ती लिहिण्यापासून, दिग्दर्शित करण्यापासून आणि त्यात काम करण्यापासून सगळ्यातच मी भाग घ्यायचो.  तशी कॉलेजमध्ये कबड्डीची स्पर्धा पण व्हायची. पण कबड्डी खेळायला बहुतेक सगळेच नाखुश असायचे. मी एकटाच काय तो उत्साही असायचो. मग मीच जे येतील त्या सहा जणांना घेऊन आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगची टीम बनवायचो आणि इंटर डिपार्टमेंट कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचो. ही गोष्ट वेगळी की पहिल्याच राऊंडमध्ये आम्ही हरायचो पण भाग मात्र घ्यायचो. 

 

तसं इंजीनियरिंग कॉलेज असल्यामुळे कथा, कविता, काव्य, साहित्य या विषयात फारच कमी लोकांना उत्साह होता. त्यामानाने संगीत, नाटक आणि इतर तत्सम गोष्टींमध्ये मुलं सामील व्हायची. मी मात्र 'जिथे कोणी कमी तिथे आम्ही' या न्यायाने कथा, कविता, काव्य, साहित्य या विषयात सुद्धा रस घ्यायचो

 

फार नाही पण शेवटच्या वर्षी चार-पाच वेगवेगळे चित्रपट अगदी सिनेमागृहात जाऊन पाहिलेले मला आठवतात. त्यातला एक होता 'बोट लावीन तिथे गुदगुल्या'. दादा कोंडकेंचा हा भन्नाट विनोदी व द्विअर्थी संवादाने त्यावेळी गाजलेला चित्रपट आम्ही मित्रमंडळींनी एकत्र पाहिला. शेवटच्या वर्षी शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला पण जायचो.  आमच्या ग्रुपमध्ये दोन मित्र ट्रेकिंगच्या बाबतीत खूपच उत्साही होते. त्यांना आवडही होती व तेच वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रेकिंगचा प्लान आखायचे. ला असं डोंगरदर्‍यातून चढायला त्यावेळीही फारसं आवडायचं नाही. पण एक पिकनिक होते, मित्रांबरोबर फिरायला मिळतं म्हणून मीही जायचो


पैसे खूप नसल्यामुळे जिथे फुकट राहायला  मिळेल अशा ठिकाणी आम्ही सहल काढायचो.  बहुतेक वेळा ट्रेननेच प्रवास करायचो.  विदाऊट तिकीट प्रवास करण हे माझ्यासाठी खूपच सोपं काम होतं. अगदी लहानपणापासून मी याच्यात अनुभवी होतो. त्यामुळे इतर मित्र तिकीट कदाचित काढतही असतील, मला माहित नाही. पण मी मात्र अशा पिकनिकला जाताना आणि विशेषतः ट्रेनने  प्रवास करत असताना कधी तिकीट काढलेल मला आठवत नाही. सुदैवाने प्रवास करत असताना कधीच टीसी आला नाही आणि मी पकडलो गेलो नाही. पण जर टीसी आलाच असता तर त्याला कसा गुंगारा द्यायचा हे मला अतिशय चांगल्या पद्धतीने माहित होते.

 

 

इंजीनियरिंग कॉलेजमध्ये रॅगिंग होतं अस व्हीजेटीआय मध्ये प्रवेश घ्यायच्या आधी ऐकलं होतं. पण पहिल्या वर्षी प्रवेश घेतल्यानंतर ना कधी आम्हाला अनुभव आला आणि अगदी शेवटच्या वर्षी गेल्यानंतरही आम्ही कधी कोणाला रॅगिंग केलं.  कदाचित व्हीजेटीआय मध्ये ऍडमिशन घेणारी मुलं हे एका ठराविक शैक्षणिक पात्रतेच्या वरची असल्यामुळे त्यांच्यामध्ये असे दुसऱ्याला छळवणुकीचे भाव येत नसावेत.  1977 ते 1981 ही व्हीजेटीआय मधली माझी चार वर्ष माझ्या पुढील अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरला दिशा देणारी ठरली.  या चार वर्षात ना कॉलेजमध्ये, ना जीवनात, अप्रिय घटना घडली. सर्व शिक्षक चांगलेच होते व मित्रमंडळी तर सोन्यासारखी . आजही मागे वळून पाहताना कॉलेजमध्ये जर मला असे चांगले मित्र मिळाले नसते तर जीवन व्यर्थ गेलं असतं असं वाटू लागतं.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा