माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

गुरुवार, ८ मे, २०२५

 

अभ्यासिका

 





महाविद्यालयीन जीवनात आणखीन एका  गोष्टीची अडचण व्हायची ती म्हणजे अभ्यासाची जागा. घरी अभ्यास करायची फारशी सोय नव्हती. एकतर घर खूप छोटं होतं व चाळीमध्ये सदैव गोंगाट असायचाघरात शेजारीपाजारी सतत येत जात राहायचेत्यामुळे लक्ष देऊन अभ्यास करणं कठीण होतं. इंजीनियरिंगच्या आधीची रुईया कॉलेज मधली दोन वर्षेकॉलेजच्या लायब्ररीमध्ये किंवा रीडिंग रूम मध्ये अभ्यास करायचो. रुईया कॉलेजमध्ये एक चांगली गोष्ट होती. कॉलेजमधली तळमजल्यावरचा एक वर्ग ते विद्यार्थ्यांसाठी साधारण रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत उघडा ठेवत. त्यामुळे खूपच फायदा झालाफर्स्ट इयर सायन्स व इंटर सायन्स मधला सगळा अभ्यास तिथेच झाला. 

परंतु इंजिनिअरिंगच्या चार वर्षांमध्ये त्यामानाने खूपच अभ्यास करावा लागायचा आणि त्यातल्या त्यात जेव्हा सेमिस्टरची परीक्षा जवळ यायची तेव्हा तर दिवस-रात्र अभ्यास करावा लागायचा. प्रश्न हा होता की रात्री अभ्यास कुठे करायचा?  अशा वेळी पुन्हा एकदा अनेक चांगली माणसं मदतीला आली व त्यांनी माझा  रीडिंग रूमचा प्रश्न सोडवला.

 

शालेय जीवनात मी संघाच्या शाखेत जात असे. तिथे श्री कोल्हटकर हे आमचे मुख्य शिक्षक होते. ते अविवाहित होते व हाऊसिंग बोर्ड मध्ये रेंट कलेक्टर म्हणून काम करीत होते. ते स्वतः आमच्याच विभागात पण दुसऱ्या एका चाळीत राहत असत. त्यांच्यामुळेश्रीयुत प्रभाकर नाईक श्रीयुत गणेश चौधरी या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या, म्हणजेच हाउसिंग बोर्डामध्ये रेंट कलेक्टर म्हणून काम करणाऱ्या आणखीन दोघा सदगृहस्थांशी ओळख झाली. प्रभाकर नाईक आणि गणेश चौधरी या दोघांचेही लहान भाऊ माझे समवयस्क. आणि योगायोगाने ते सुद्धा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते.  या दोघांच्या ओळखीने त्यांनी मला एका दुसऱ्या चाळीतील एक खोली अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली.  आणि मग काय.  आमच्या रीडिंग रूमचा प्रश्न निकाली निघाला.  मी, नाईक व चौधरी यांचे भाऊ आणि माझा आणखी एक वर्गमित्र असे चौघेजण या रूममध्येच अभ्यास करू लागलो. ही खोली हेच आमचे जवळ-जवळ घर झाल होत. घरी जायचं ते फक्त आंघोळ करायला आणि जेवायला. बाकी अख्खा दिवस त्याच खोलीत अभ्यास करायचो आणि पहाटे कधीतरी झोपी जायचो. 


इंजीनियरिंगची पहिली दोन वर्षे तरी अश्या प्रकारे रीडिंग रूमचा प्रश्न निकालात निघाला. परंतु इंजीनियरिंगच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षी ही खोली उपलब्ध नव्हती, कारण त्या खोलीचा मालक आपल्या कुटुंबासहित तिथे राहायला येणार होता.  अशावेळी अनिल विद्वांस हा माझा मित्र स्वतःहून पुढे आला आणि त्याने त्याची रूम आम्हाला उपलब्ध करून दिलीअनिल त्यावेळी अविवाहित होता आणि आमच्याहून चार-पाच वर्षाने मोठा होता. रात्री तो झोपला असतानाही आम्ही दिवे लावून अभ्यास करायचो. कधी तर गप्पा देखील मारायचो. त्याचा त्याला त्रास व्हायचा पण त्याने कधीच बोलून दाखवलं नाही. त्याच्या खोलीवर आम्ही सर्व मित्र अगदी मन लावून अभ्यास करायचो आणि त्यामुळे परीक्षेत नेहमीच चांगले मार्क मिळत गेले. 


व्हीजेटीआय मध्ये इंजिनिअरिंग करत असताना देखील रुईया कॉलेजमध्ये आम्ही संध्याकाळी त्यांच्या रिकाम्या वर्गात अभ्यास करायला जायचो. त्याला ना कधी रुईया कॉलेजने ऑब्जेक्शन घेतलं ना कधी त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी. उलट रुईया कॉलेजमधले विद्यार्थी आणि आम्ही अगदी मित्र झालो होतो आणि एकत्र अभ्यास करायचो. रुईया कॉलेज, नाईक, चौधरी तसेच विद्वांस कुटुंबीयांनी आम्हाला अभ्यास करण्यासाठी, अगदी एकही पैसा न घेता व स्वतःच्या खिशातून विजेचे बिल भरून जागा उपलब्ध करून दिली त्यांच्या ऋणात कायमचं राहायलाच मला आवडेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा