माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट
बुधवार, १२ मार्च, २०२५
कॉलेज च्या फी चा प्रश्न सुटला पण
पुस्तकांचा प्रश्न होताच. लायब्ररीत जाऊन अभ्यास करणं ठीक होतं, पण घरी अभ्यास करण्यासाठी पुस्तकं हवीच होती. आमच्या
विभागात लायन्स
क्लबतर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी एक बुक बँक चालविली जायची. त्यातून विद्यार्थ्यांना वर्षभर पुस्तकं
वापरायला मिळायची. पुस्तकांच्या छापील किमतीच्या ४०% रक्कम लायन्स क्लबकडे जमा
करायची. वर्षभरानंतर पुस्तकं परत केल्यानंतर त्या रकमेच्या अर्धी, म्हणजे छापील किमतीच्या २०% रक्कम परत मिळायची. अशा प्रकारे
छापील किमतीच्या केवळ २०% रकमेत पुस्तकं वर्षभर वापरायला मिळायची. गरीब आणि होतकरू मुलांना याचा प्रचंड लाभ व्हायचा
हा लाभ
घेण्यासाठी लायन्स क्लबचा एक अर्ज छापील भरायचा
होता. त्यात आपली संपूर्ण माहिती देऊन मार्कलिस्ट जोडावी लागायची व ओळखीच्या एखाद्या
लायनची म्हणजेच लायन्स क्लबच्या
सभासदाची सही घ्यावी लागायची, शिफारस घ्यावी लागायची. मला जेव्हा
हे कळलं त्यावेळी माझ्याबरोबर असलेल्या इतर विद्यार्थ्यांबरोबर मी माझ्या विभागाच्या जवळच राहणाऱ्या श्रीयुत झवेरी नावाच्या एका सद्गृहस्थाकडे, जे स्वतः लायन होते, माझा फॉर्म घेऊन गेलो. इतर सर्व विद्यार्थ्यांबरोबर
त्यांनी माझ्या फॉर्मवर सुद्धा काहीही चौकशी न
करता शिफारसीची सही केली. पण सही
झाल्या झाल्याच मी त्यांना माझी अडचण सांगितली. मी त्यांना म्हटलं की "सर, ही
पुस्तकं घेण्यासाठी लागणारे ४०% पैसेही माझ्याकडे नाहीत. मी ही पुस्तकं कशी घेऊ?" दयाळू झवेरीजींनी माझी मार्कलिस्ट पुन्हा
एकदा नीट पाहिली. माझे मार्क पाहून त्यांना बहुतेक बरं वाटलं असावं. कारण त्यानंतर
त्यांनी ताबडतोब माझ्या अर्जावर 'फुकट पुस्तकं देण्यात यावीत' असा शेरा मारला. त्यामुळे मला एकही पैसा न भरता अगदी माझं
शिक्षण संपेपर्यंत घाटकोपर लायन्स क्लबकडून फुकट पुस्तकं मिळत गेली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा