पार्ट टाईम कवी
व मानधन
‘जो काहीच करू शकत नाही तो कविता करतो’ असं कोण म्हणतं? मीच म्हणतो. कदाचित हे खरंही असावं
म्हणून मी कविता करू लागलो. मला आठवतं की सहावीला असताना मी
पहिली कविता केली जी शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली
‘शिवनेरीवर जन्मला जो शिवाजी
धन्य माता, पिता तो शहाजी’
अशी शिवाजीवरची
ही माझी पहिली कविता. पण ही कविता प्रसवून झाल्यानंतर
दुसर अपत्य यायला अनेक वर्षे लागली व त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतरच
मी कविता करायला लागलो.
कविता मी
करायचो नाही. आपोआप सुचायच्या. मग मी लिहून काढायचो. त्याला लोक कविता म्हणायचे. पण याचा एक मला फायदा झाला. मी
व्यक्त व्हायला शिकलो. शब्दांच्या प्रेमात पडलो.
इतर कवींच्या कविता वाचताना त्यातला अर्थ कळल्यानंतर एक वेगळीच नशा
यायला लागली. सुरुवातीला अगदी केशवसुत, कुसुमाग्रज
यांच्या कविता पासून सुरुवात झाली ते अगदी थेट नामदेव ढसाळ यांच्या गोलपिठापर्यंत
येऊन धडकली.
कविता ही
कविता असते. ती चांगली किंवा वाईट नसते. कविता चांगली आहे की वाईट आहे हे कोणी ठरवायचं? ज्याला ठरवायचं त्याने ठरवू द्या पण जो कवी आहे त्याला मात्र ती
निश्चितच चांगलीच वाटते. माझ्या कविता लेखनामुळे मला जगण्याचा एक नवा 'मार्ग' प्राप्त झाला. त्यावेळी अनेक कवितांच्या स्पर्धा व्हायच्या. काही कविता लेखन स्पर्धा असायच्या तर काही कविता वाचन किंवा कविता गायन
स्पर्धा. दरवर्षी 'नवाकाळ' हे वर्तमानपत्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कविता
लेखन स्पर्धा घ्यायचं. पुण्याच्या एसपी म्हणजेच सर
परशुरामभाऊ महाविद्यालयात महाराष्ट्र स्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
कविता वाचन स्पर्धा व्हायच्या. अनेक दिवाळी अंकही कविता स्पर्धा घ्यायचे व सर्वोत्कृष्ट कविता दिवाळी अंकात प्रसिद्ध करायचे. साहित्य क्षेत्रात काम
करणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या संस्था तसेच काही महाविद्यालय देखील अशा स्पर्धांचे
आयोजन करायचे. मी अगदी न चुकता या सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो.
कदाचित स्पर्धेच्या दृष्टिकोनातून माझ्या कविता सरस असतीलही पण म्हणून मी
काही चांगला कवी नव्हतो. एक पार्ट टाइम कवी होतो. हौशी कवी होतो. पण नियतीच्या मनात कदाचित कवितेच्या
माध्यमातून मला काही अर्थार्जन व्हावे असे असावे. त्यामुळे
अशी एकही स्पर्धा नव्हती की ज्यात मला कधी पारितोषिक मिळाले नाही. अर्थात त्यावेळी पारितोषिकाची रक्कम देखील अतिशय कमी असायची. नवाकाळने मला त्यावेळी दहा रुपये दिलेले आठवतात तर सर्वात मोठे बक्षीस
पुण्यामध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झालेल्या 'राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन
काव्यवाचन स्पर्धेत' मला मिळालं जे दोनशे रुपयांचं होतं.
सोन्याच्या भावाने तुलना केली तर आज त्या दोनशे रुपयांची किंमत वीस हजार रुपये
एवढी होते यावरून त्या दोनशे रुपयांचं मोल कळून येईल.
वेगवेगळ्या
दिवाळी अंकात माझ्या कविता प्रसिद्ध व्हायच्या. त्यातले 50% दिवाळी अंक एकही पैसा द्यायचे नाहीत पण
काही दिवाळी अंक मात्र पाच रुपये किंवा दहा रुपयाची मनी ऑर्डर करायचे व सोबत तो
दिवाळी अंक देखील पोस्टाने फुकट पाठवायचे. आपली कविता दिवाळी
अंकात छापून आली याचं कौतुक वाटायचं पण त्याचबरोबर मनीऑर्डरच्या फॉर्मवर सही करून
पोस्टमनकडून पाच किंवा दहा रुपये घेताना अधिक आनंद वाटायचा. कवितेच्या या प्रसववेदना कालौघात कमी होत गेल्या आणि इंजीनियरिंग नंतर प्रोफेशनल आयुष्यामध्ये
प्रवेश केल्यानंतर, वयाच्या 25 व्या वर्षानंतर, त्या जवळजवळ नाहीशा
झाल्या. बहुतेक मला थोडीफार ‘लक्ष्मी’ मिळावी म्हणून ‘सरस्वती’
माझ्या अडचणीच्या वेळी माझ्या मनात वास करत होती असं मला आता वाटू लागल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा