‘महालक्ष्मी’ पावली
याशिवाय
दादरच्या ‘शिवाजी मंदिर’ची ‘श्री छत्रपती
शिवाजी स्मारक समिती’, ‘बृहद् भारतीय
समाज’ आणि ‘महालक्ष्मी
टेम्पल ट्रस्ट’ या तीन संस्थांकडूनही मला दरवर्षी रोखीत शिष्यवृत्ती मिळायची. त्यामुळे माझ्या कुटुंबावरचा माझा शिक्षणाचा भार कमी झाला आणि मी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण
करू शकलो.
वेगवेगळ्या
संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळते याची माहिती मला वर्तमानपत्र वाचून मिळायची. ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र
टाइम्स’ ही वर्तमानपत्रं अशा प्रकारची माहिती देण्यासाठी आठवड्यातून एकदा एक विशेष सदर चालवायची. मला आठवतं या
सदराच नाव ‘संस्था समाचार’ अथवा ‘संस्था वृत्त’ असं काहीस होतं. दर आठवड्याला, बहुतेक दर
बुधवारी प्रसिद्ध होणार हे सदर मी न चुकता सगळ्यात आधी वाचायचो आणि त्याप्रमाणे त्या त्या संस्थेत जाऊन अर्ज करायचो.
असच एकदा
माझ्या वाचनात ‘श्री महालक्ष्मी टेम्पल ट्रस्ट’ गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते अशी बातमी आली. बातमी थोडीशी उशिरा छापली गेली होती आणि अर्ज करण्याची तारीख निघून गेली होती. तरीही निराश न होता मी प्रयत्न करायचं ठरवलं आणि घाटकोपरहून
एकटाच महालक्ष्मीला गेलो.
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मी संस्थेच्या कार्यालयात गेलो. तेव्हा
त्यांनी मला फॉर्म देण्याची मुदत संपली असल्यामुळे फॉर्म देण्यात येणार नाही असे
कळविले. मला थोडं वाईट वाटलं, पण मी निराश झालो नाही. यातून
नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल याची मला खात्री होती. मी कार्यालयातील
एका माणसाला विचारलं,
"या मंदिराचे मुख्य पुजारी कोण आहेत आणि ते कुठे
राहतात?" त्यांनी मला
मुख्य पुजाऱ्यांचे नाव
सांगितले व ते मंदिराच्या मागेच असलेल्या घरात राहतात असे सांगितले.
विचारत विचारत मी मुख्य पुजाऱ्यांच्या घरी गेलो आणि दार ठोठावलं.
माझ्याच वयाची एक मुलगी साक्षात ‘महालक्ष्मी’ च्या रूपाने माझ्यासमोर उभी दारात राहिली. तिने मला
येण्याचे कारण विचारले. ते मी तिला सांगताच तिने मला माझी मार्कलिस्ट दाखवायला सांगितले. नंतर कळलं की ती ‘महालक्ष्मी’ मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचीच मुलगी होती आणि तीही त्याच वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास झाली
होती. मी तिला माझी मार्कलिस्ट दाखवली. माझे मार्क पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने ताबडतोब आपल्या धाकट्या भावाला बोलावून सांगितलं,
"ह्याला घेऊन ऑफिसमध्ये जा आणि त्यांना सांग की याला
अर्ज द्यायला मी सांगितलं आहे." तो आठ- दहा वर्षाचा तिचा भाऊ ताईची आज्ञा पाळण्यासाठी मोठ्या
उत्साहाने मला
घेऊन ऑफिसमध्ये गेला. मला अर्ज मिळाला आणि नंतर शिष्यवृत्तीही. ती शिष्यवृत्ती मला इंजिनिअरिंगची
पदवी मिळेपर्यंत मिळत राहिली. जणू मला
स्कॉलरशिप देऊन ‘महालक्ष्मी’
अंतर्धान पावली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा