माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

 

जेवणाचा प्रश्न सुटला






मी माटुंगा येथील रामनारायण रुईया कॉलेजमध्ये प्रथम वर्ष विज्ञानाला प्रवेश घेतला व माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं. सकाळी आठ वाजता प्रात्यक्षिके सुरू व्हायची आणि र्ग संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालायचे. कॉलेजला वेळेवर पोहोचायचं म्हणजे सकाळी सात वाजताच घराबाहेर पडाव लागायच. इतक्या सकाळी-सकाळी घरी नाश्ता होणं आणि सोबत डबा मिळणं कठीण होत. त्यासाठी घरच्यांना विशेषता म्हाताऱ्या आईला त्रास देण जीवावर यायच. त्यामुळे उपाशी पोटीच कॉलेज गाठायचं आणि संध्याकाळी चार वाजता कॉलेज संपल्यानंतर कधी एकदा घर गाठतो आणि जेवतो असं व्हायचं. अनेक वेळा तर भूक एवढी असह्य व्हायची की शेवटच्या तासाला दांडी मारून लवकर घरी पळावे लागायच.

 

अशा तीन-चार दांड्या झाल्यानंतर माझी तक्रार कॉलेजचे प्राचार्य आर.. कुलकर्णी सरांकडे करण्यात आली. त्यांनी मला चौकशीला बोलावलं. मी सांगितलेल कारण बहुतेक त्यांना पटल असावं. त्यांनी लगेच मला रुईया कॉलेजने गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या स्टुडंट्स म्युच्युअल एड फंड चे अध्यक्ष असलेले उपप्राचार्य शाहूराजा सरांना भेटायला सांगितल. डोक्यावर केस नसलेले, गोल चेहऱ्याचे, गोरेपान प्रो. शाहूराजा यांचे व्यक्तिमत्व अतिशय देखण व भारदस्त होत. माझी अडचण समजून घेऊन त्यांनी त्या दिवसापासून मला एक रुपया चाळीस पैशाची कॉलेज कँटीनची कुपन दररोज देण्याची व्यवस्था केली. या 'कुपन' मुळे माझा दुपारच्या जेवणाचा प्रश्न सुटला.

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

 

नादारीची गोष्ट







१९७५ साली मी अकरावी मॅट्रिकची परीक्षा पास झालो. त्यावेळी आमच्या घरी कमवणार कोणीच नव्हत. वडिलांनी मिलमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचे आणि ग्रॅज्युएटीचे पैसे स्टेट बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले होते. त्याचे दरमहा दोनशे रुपये व्याज मिळायचे. त्यातूनच आमचं घर चालायचं. घराचं भाडच ३५ रुपये होतं. उरलेल्या १६५ रुपयांमध्ये आईवडीलमीमाझी बहीण आणि भाऊ असे पाच जण भागवून घ्यायचो.


मी तेव्हा फक्त पंधरा वर्षांचा होतो. त्यामुळे कुठे नोकरी मिळणं शक्यच नव्हतं. आमच्या चाळीत राहणारे 'फाले' मास्तर गोदरेज सोप्समध्ये टाईम ऑफिसमध्ये काम करायचे. त्यांनी मला गोदरेजमध्ये चिटकवण्याचा प्रयत्न केलापण माझं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे त्यांच्या वरिष्ठांनी मला नोकरी नाकारली. आता काय करायचं हा प्रश्न मला सतावत होता.


मी वडिलांना विचारलं तर ते म्हणाले, "रेडिओ रिपेरिंग किंवा वॉच रिपेरिंग शिक" पण मला त्यात अजिबात रस नव्हता. परीक्षेत मार्क पण खूप चांगले पडले होते. मी वडिलांना म्हटलं, "मला कॉलेजला जायचंय." त्यांनी स्पष्ट शब्दासांगितलं की, "माझ्याकडे तुझी फी भरण्यासाठी पैसे नाहीत" म्हणजे आता सगळं काही स्वतःहून करायचं होतं.


मी थोडी माहिती गोळा केली. 1975 साली नादारी मिळवण्यासाठी किंवा इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास मधून फी माफी मिळविण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची कमाल मर्यादा वर्षाला 2400 रुपये एवढी कमी होती.  परंतु जर एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2400 रुपयाहून कमी असेल तर मात्र त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळेचे तसेच महाविद्यालयीन शिक्षण मोफत असायचे. महाविद्यालय किंवा शाळेमध्ये असलेल्या विहित फॉर्म मध्ये एप्लीकेशन करावे लागायचे व त्यासोबत उत्पन्नाचा दाखला जोडावा लागायचा.  ग्रामीण महाराष्ट्रात उत्पन्नाचा दाखला हा साधारणपणे तहसीलदाराच्या कार्यालयात मिळायचा.  मुंबईसारख्या शहरात मात्र उत्पन्नाचा दाखला देण्याचे अधिकार सरकारने नामनिर्देशित केलेल्या समाजातील काही प्रतिष्ठित लोकांना होते ज्यांना जे. पी. अथवा 'जस्टीस ऑफ पीस' असे म्हणत.  याच जस्टिस ऑफ पीस ना त्यानंतर स्पेशल एक्झिक्यूटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणण्यास सुरुवात झाली व त्यानंतर सध्या त्यांनाच स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून ओळखले जाते.  1975 साली या अशा महत्त्वाच्या व प्रतिष्ठित लोकांना, ज्यांना जस्टीस ऑफ पीस म्हणत अशांची संख्या अतिशय कमी होती.


आमच्या विभागात तर केवळ दोनच जण जस्टीस ऑफ पीस होते.  प्रख्यात कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांच्या सुविद्य पत्नी व तत्कालीन नगरसेविका डॉक्टर विनिता दत्ता सामंत श्री तुकाराम नार्वेकर उर्फ टी. व्ही. नार्वेकर हे ते दोन जण.  नगरसेविका असल्यामुळे डॉक्टर विनिता सामंत यांच्या भोवती लोकांचा नेहमीच गराडा असे व लोकसुद्धा त्यांच्या कार्यालयात प्रचंड गर्दी करून असत.  त्यामानाने श्री नार्वेकर यांच्याकडे बेताची गर्दी असे व कामेही लगेच होत त्यामुळे मी देखील श्री तुकाराम नार्वेकर यांच्याकडे जायचे ठरवले. मी त्यांना भेटलो आणि त्यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला घेतला. त्यामुळे एक फायदा झाला. मला 'आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकया सरकारी योजनेचा लाभ मिळून नादारी म्हणजेच फ्रीशिप मिळाली आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी इंजीनियरिंग होईपर्यंत कॉलेजची फी भरण्यापासून माझी सुटका झाली.

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

 

व्हीजेटीआय मधील शेवटचे वर्ष

 


माझ्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीतील सर्वात आनंदाचे वर्ष म्हणजे माझं इंजीनियरिंग शेवटचं वर्ष.  तीन वर्ष इंजीनियरिंग मध्ये शिक्षण घेतल्यानंतर परीक्षेचा व पेपरचा पूर्ण अंदाज आलेला असतो. पूर्ण मॅच्युरिटी आलेली असते. अभ्यास कसा करायचा, किती करायचा, कुठून करायचा याचं पूर्ण भान आलेलं असतं. मुख्य म्हणजे पहिल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक सेमिस्टरला सहा असे एकूण बारा विषय असायचे. त्यामानाने शेवटच्या वर्षी ज्याला प्रोजेक्ट किंवा थिसिस म्हणतात तो जर सोडला तर केवळ सहा-सातच विषय असायचे. त्यातले दोन विषय तर आपणच निवडायचे असतात. त्यामुळे अभ्यास करणं अतिशय सोपं जातं.

 

आम्ही सर्व मित्रांनी आमच्या सिनियर्सनी सांगितलेल्या अनुभवावर विश्वास ठेवून आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा 'मान' ठेवून शेवटच्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहायचं ठरवलं. आतापर्यंत आम्ही 'डे स्कॉलर' होतो. शेवटच्या वर्षी आम्ही 'होस्टेलाईट' झालो.  इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षी येईपर्यंत माझ्या घरची परिस्थिती पण थोडीशी सुधारली होती. मोठी बहीण नोकरीला लागली होती व तिचाही कुटुंबाला हातभार लागत होता. त्यामुळे होस्टेलमध्ये राहणं व हॉस्टेलची मेसची फी भरणे फार कठीण काम नव्हतं.

 

आतापर्यंत अगदी शाळेपासून इंजिनिअरिंगपर्यंत एकत्र असलेले काही जण व रुईया कॉलेज पासून इंजीनियरिंग पर्यंत असलेले अनेक जण जरी मुंबईमध्ये राहत असलो तरी सर्वांनी मिळून हॉस्टेलमध्ये राहायचं ठरवलं. १९८०-८१ या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षात होस्टेलमध्ये राहून आम्ही जे कॉलेज लाईफ एन्जॉय केलं ते केवळ अविस्मरणीय होतं. अभ्यासाचं शून्य टेन्शन होतं.  आपण पास होणारच एवढंच नव्हे तर फर्स्ट क्लास मध्ये पास होणार याची जवळजवळ सर्वांनाच खात्री होते. काही जण मात्र डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे म्हणून अधिकचा अभ्यास करायचे पण आम्ही मात्र त्यात नव्हतो.

 

चाळीमध्ये असतं अगदी तसंच वातावरण हॉस्टेलमध्ये असतं. कोणीही कोणाच्याही रूममध्ये कधीही घुसायचं आणि काय वाटेल ते करायचं. कोणाला कोणाचाच धरबंध नसायचा. कॉलेजच्या वेळात कॉलेजमध्ये जायचं. दुपारी प्रत्येकाचे डबे भरून यायचे. ते अगदी सामुदायिक रित्या खायचे. त्यानंतर पुन्हा थोडा वेळ कॉलेज व मग मजाच मजा. संध्याकाळी सात वाजता मेस उघडायची. ती कधी उघडायची याचीच आम्ही वाट बघायचो. सात वाजता मेस उघडली की आम्ही जेवून घ्यायचो. तरुण होतो. भूक तर नेहमीच लागायची. एकदा जेवण झालं की मग गार्डनमध्ये फिरणं, गप्पा मारणं आणि मुख्य म्हणजे पत्ते खेळणे.

 

इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षांमध्ये असताना आमच्या ग्रुपमधला प्रत्येक मुलगा हा तीन पत्ती खेळण्यात एवढा तरबेज झाला होता की आमच्यापैकी बहुतेकांना त्याचं जवळजवळ व्यसनच लागलं होतं. अगदी परीक्षेच्या दिवशी सुद्धा आम्ही पत्ते खेळायचो. अभ्यासाची चिंताच नव्हती. म्हटलं ना सगळा अभ्यास झालाच असायचा. अकरा वाजता परीक्षेचा पेपर असायचा. हॉस्टेल पासून कॉलेजला जायला पाच मिनिटे सुद्धा खूप व्हायची. त्यामुळे अगदी साडेदहा वाजले तरी अजून एक डाव खेळू, अजून एक डाव खेळू असा आग्रह चालूच असायचा. 

 

व्हीजेटीआय मधल्या या शेवटच्या वर्षात मी सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला. त्याच्या आदल्या वर्षी मी तर 'युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह' म्हणून निवडून आलो होतो. त्यावेळी मी थर्ड इयर इंजीनियरिंग ला होतो. त्याच्या आधी फर्स्ट आणि सेकंड ईयर इंजिनिअरिंगला असताना 'क्लास रेप्रेझेंटेटिव्ह' म्हणून निवडून आलो होतो. कॉलेजच्या गॅदरिंगला मराठी एकांकिका बसवण्यापासून अगदी ती लिहिण्यापासून, दिग्दर्शित करण्यापासून आणि त्यात काम करण्यापासून सगळ्यातच मी भाग घ्यायचो.  तशी कॉलेजमध्ये कबड्डीची स्पर्धा पण व्हायची. पण कबड्डी खेळायला बहुतेक सगळेच नाखुश असायचे. मी एकटाच काय तो उत्साही असायचो. मग मीच जे येतील त्या सहा जणांना घेऊन आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगची टीम बनवायचो आणि इंटर डिपार्टमेंट कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचो. ही गोष्ट वेगळी की पहिल्याच राऊंडमध्ये आम्ही हरायचो पण भाग मात्र घ्यायचो. 

 

तसं इंजीनियरिंग कॉलेज असल्यामुळे कथा, कविता, काव्य, साहित्य या विषयात फारच कमी लोकांना उत्साह होता. त्यामानाने संगीत, नाटक आणि इतर तत्सम गोष्टींमध्ये मुलं सामील व्हायची. मी मात्र 'जिथे कोणी कमी तिथे आम्ही' या न्यायाने कथा, कविता, काव्य, साहित्य या विषयात सुद्धा रस घ्यायचो

 

फार नाही पण शेवटच्या वर्षी चार-पाच वेगवेगळे चित्रपट अगदी सिनेमागृहात जाऊन पाहिलेले मला आठवतात. त्यातला एक होता 'बोट लावीन तिथे गुदगुल्या'. दादा कोंडकेंचा हा भन्नाट विनोदी व द्विअर्थी संवादाने त्यावेळी गाजलेला चित्रपट आम्ही मित्रमंडळींनी एकत्र पाहिला. शेवटच्या वर्षी शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला पण जायचो.  आमच्या ग्रुपमध्ये दोन मित्र ट्रेकिंगच्या बाबतीत खूपच उत्साही होते. त्यांना आवडही होती व तेच वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रेकिंगचा प्लान आखायचे. ला असं डोंगरदर्‍यातून चढायला त्यावेळीही फारसं आवडायचं नाही. पण एक पिकनिक होते, मित्रांबरोबर फिरायला मिळतं म्हणून मीही जायचो


पैसे खूप नसल्यामुळे जिथे फुकट राहायला  मिळेल अशा ठिकाणी आम्ही सहल काढायचो.  बहुतेक वेळा ट्रेननेच प्रवास करायचो.  विदाऊट तिकीट प्रवास करण हे माझ्यासाठी खूपच सोपं काम होतं. अगदी लहानपणापासून मी याच्यात अनुभवी होतो. त्यामुळे इतर मित्र तिकीट कदाचित काढतही असतील, मला माहित नाही. पण मी मात्र अशा पिकनिकला जाताना आणि विशेषतः ट्रेनने  प्रवास करत असताना कधी तिकीट काढलेल मला आठवत नाही. सुदैवाने प्रवास करत असताना कधीच टीसी आला नाही आणि मी पकडलो गेलो नाही. पण जर टीसी आलाच असता तर त्याला कसा गुंगारा द्यायचा हे मला अतिशय चांगल्या पद्धतीने माहित होते.

 

 

इंजीनियरिंग कॉलेजमध्ये रॅगिंग होतं अस व्हीजेटीआय मध्ये प्रवेश घ्यायच्या आधी ऐकलं होतं. पण पहिल्या वर्षी प्रवेश घेतल्यानंतर ना कधी आम्हाला अनुभव आला आणि अगदी शेवटच्या वर्षी गेल्यानंतरही आम्ही कधी कोणाला रॅगिंग केलं.  कदाचित व्हीजेटीआय मध्ये ऍडमिशन घेणारी मुलं हे एका ठराविक शैक्षणिक पात्रतेच्या वरची असल्यामुळे त्यांच्यामध्ये असे दुसऱ्याला छळवणुकीचे भाव येत नसावेत.  1977 ते 1981 ही व्हीजेटीआय मधली माझी चार वर्ष माझ्या पुढील अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरला दिशा देणारी ठरली.  या चार वर्षात ना कॉलेजमध्ये, ना जीवनात, अप्रिय घटना घडली. सर्व शिक्षक चांगलेच होते व मित्रमंडळी तर सोन्यासारखी . आजही मागे वळून पाहताना कॉलेजमध्ये जर मला असे चांगले मित्र मिळाले नसते तर जीवन व्यर्थ गेलं असतं असं वाटू लागतं.

 

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

 

'वाटाडे' मित्र

 


जस मी या आधी सांगितलं की एसएससी नंतर कुठे जायचं? आर्ट्सला जायचं? सायन्सला जायचं? की कॉमर्सला जायचं? हे त्यावेळी माहित नव्हतं. त्यावेळी माझ्या शाळेतील वर्गात असलेल्या बहुसंख्य मुलांनी ठरवलं की सायन्सला जायचं म्हणून मीही सायन्सला गेलो.



माझ्या वेळी जुना अभ्यासक्रम होता. ११ वी ला एसएससी ची परीक्षा असायची. त्यानंतर ४ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. इंजीनियरिंग किंवा मेडिकलला जायचे असेल तर सायन्सला जायच. पहिल्या वर्षी म्हणजे फर्स्ट ईयर सायन्सला फिज़िक्स, केमिस्ट्री, गणित व बायोलॉजी हे विषय असत. दुसऱ्या वर्षी म्हणजे इंटर सायन्सला गणित किंवा बायोलॉजी पैकी एक विषय घ्यावा लागे. ज्यांना इंजीनियरिंगला जायचे आहे त्यांना गणित व ज्यांना मेडिकलला जायचे आहे त्यांना बायोलॉजी घेणे अनिवार्य असे.



इंजीनियरिंगला जायचं असेल तर ग्रुप घ्यायचा ज्यात बायोलॉजी नसायचं तर मेडिकलला जायचं असेल तर बी ग्रुप घ्यायचा ज्यात मॅथेमॅटिक्स नसायचं.  मनातनं खूप वाटायचं की डॉक्टर व्हावं. पण इंटरसायन्स नंतर डॉक्टर व्हायला साडेपाच वर्षे लागायची तर इंजीनियर व्हायला फक्त चार वर्ष. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी आणखीन दीड वर्ष लागेल. तोपर्यंत घर कसं चालेल? हाही एक मनात विचार असायचा. पण त्यावेळी पुन्हा मित्र धावून आले. माझ्याबरोबरच्या बहुसंख्य मित्रांनी इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं. त्यामुळे मीही इंजीनियरिंगला जायचं म्हणून ग्रुप घेऊन मोकळा झालो.

 

त्यावेळी इंजिनिअरिंगची कॉलेजेस खूपच कमी होती. महाराष्ट्रात इंजीनियरिंग एकही प्रायव्हेट कॉलेज नव्हतं. मुंबईमध्ये व्हीजेटीआय सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ही दोनच कॉलेजेस होती. त्यामुळे पर्याय खूप कमी होते. नाही म्हणायला गेलं तर ज्याला केमिकल इंजिनिअरिंग करायचं त्याला युडीसिटी हा पर्याय होता. पण माझं आणि केमिस्ट्रीच थोडसं वाकडच असल्यामुळे मला काही युडीसिटी चा पर्याय उपयोगाचा नव्हता.

 

इंटर सायन्सला चांगले मार्क मिळाल्यामुळे व्हीजेटीआय ला ऍडमिशन मिळाली खरी पण खरी गंमत तर नंतरच होती. फर्स्ट इयर इंजीनियरिंगला सर्व विषय सारखे होते व दुसऱ्या वर्षानंतर सिविल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल असे पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे नेमकं सिविल, इलेक्ट्रिकल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं याबद्दल सुद्धा मला काही फारसं कळत नव्हतं.  तिथे सुद्धा माझे मित्रच मदतीला आले.  मार्कांच बोलाल तर त्यावेळी मेकॅनिकल नंतर इलेक्ट्रिकल नंतर सिविल असे प्राधान्य क्रम होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जास्त मार्क लागत. परंतु फर्स्ट इयर इंजीनियरिंगला चांगले मार्क मिळाल्यामुळे मला तीनही पर्याय खुले होते. अशा वेळी पुन्हा एकदा माझे मित्रच कामाला आले व बहुसंख्य मित्रांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरवल्यामुळे मी त्यांच्याबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ब्रांच निवडली.

 

आयुष्य हे असं असतं. ज्यावेळी अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि नेमकं कुठचा पर्याय निवडावा हे माहीत नसतं, ज्यावेळी आपल्या वाटेसमोर अनेक वाटा फुटत असतात आणि कुठच्या वाटेवरून जायचं हे माहीत नसतं, अशावेळी सगळ्यात बेस्ट म्हणजे लोकांबरोबर राहणे.  ज्या वाटेवरून जास्तीत जास्त लोक चालतात, ज्या वाटेकडे जास्तीत जास्त लोक जातात तिथेच जाणं जास्त सेफ आहे. कलेक्टिव विस्डम हा मला खूप उशिरा कळलेला शब्द आहे पण आयुष्यात तो लवकर उमगला व उपयोगात आला. 

 

माणसाची ओळख ही त्याच्या सहकाऱ्यांवरून होतेअसं म्हणतात.  नशिबाने अगदी शालेय जीवनापासून ते महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षण येईपर्यंत मला अतिशय चांगले मित्र लाभले.  त्यातील बहुतेकांना  घरच्यांचे माझ्याहून जास्त  मार्गदर्शन असावे. त्यांच्यामुळेच मला चांगले निर्णय घेता आले व कुठेही पश्चातापाची पाळी आली नाही.  इंजीनियरिंग हे माझं आवडतं क्षेत्र.  याच क्षेत्रात शिकलो.  याच क्षेत्रात नोकरी केली.  याच क्षेत्रात व्यवसायही केला.  त्यामुळे शिकताना, नोकरी करताना किंवा व्यवसाय करताना जेव्हा मेहनत घ्यावी लागते त्यावेळी ना थकवा आला ना कंटाळा आला.  जे काम मी करत होतो ते मी एन्जॉय करत होतो.  त्या कामातून काही मिळत होतं की नव्हतं, पैसे मिळत होते की नव्हते हा वेगळा भाग झाला. पण ते काम करत असताना आनंद तर नक्कीच मिळत होता. त्यामुळे प्रचंड मोठं असं मानसिक समाधान आयुष्यभर लाभत गेला.  


आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रातच काम केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे.  काम करताना लोक कंटाळतात, थकतात. त्यांना सुट्ट्यांची आवश्यकता वाटते. त्याचं कारण ते काम करायचं म्हणून करतात. जबरदस्तीने करतात. मजबुरीने करतात. दुसरं काही करता येत नाही म्हणून करतात हे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर आपण काम केलं तर कधीच कंटाळा येत नाही. कधीच थकायला होत नाही. काम करतानाही अधिक शक्ती व उत्साह मिळत जातो. आपण स्वतः आनंदी तर राहतोच पण कामालाही योग्य तो न्याय देऊ शकतो.

 

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

 

राम नारायण रुईया महाविद्यालय

 


शालांत परीक्षेचा निकाल लागायच्या आधी कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची याबद्दल मलाच काही कळत नव्हतं. आमच्या शाळेच्या जवळ 'पोद्दार''रुईया' ही दोन कॉलेज. मी रोज शाळेत जाता येता पोद्दाररुईया या कॉलेजना पाहायचो. त्यामुळे या दोन पैकी एका कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा असं वाटायचं. पोद्दार कॉलेजची इमारत अतिशय देखणी होती. दगडाने बांधलेली होती. दर्शनी भागात एक मनोरा होता व त्यावर एक घड्याळ होत. त्यामुळे ही बिल्डिंग खूप सुंदर व आकर्षक होती. त्यामानाने रुईया कॉलेज हे सुबक-ठेंगणे होते.  पोद्दारची बिल्डिंग रुईयाच्या बिल्डिंग पेक्षा चांगली आहे हे एकमेव कारण मी पोद्दार मध्ये ऍडमिशन घ्यावं असं मला वाटायला पुरेसं होतं. पण पोद्दार हे कॉमर्स साठी तर रुईया सायन्स आणि आर्ट साठी असलेले कॉलेज होतं.  घरी मार्गदर्शन करायला कोणीच नसल्यामुळे आर्ट, सायन्स आणि कॉमर्स मध्ये कुठे ऍडमिशन घ्यायची हेच कळत नव्हतं. परंतु वर्गात माझ्या बरोबर असलेल्या बहुसंख्य मुलांनी सायन्स मध्ये जायचं ठरवल्यामुळे मीही सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं ठरवलं व म्हणून रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं नक्की केलं.

 

शालांत परीक्षेचा निकाल लागायच्या तीन-चार दिवस आधीच रुईया कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजचा ऍडमिशन फॉर्म तसंच प्रोस्पेक्ट विकत घेतलं. त्यावेळी कळलं की एसएससी ला जर 68% हून अधिक  मार्क असतील तर रुईया कॉलेजमध्ये डायरेक्ट ऍडमिशन देण्यात येणार आहे. त्यामुळे रिझल्ट लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी रुईया कॉलेजमध्ये फॉर्म दाखल केला व लगोलग फी भरून ऍडमिशन देखील घेतली. 

 

ना फॉर्म भरायला मला कोणाच्या मदतीची आवश्यकता भासली ना ऍडमिशन घ्यायला. रुईया कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सायन्स व इंटरसायन्स ही दोन वर्षे शिक्षण घेत असताना पर्वते सर, कल्पकम मॅडम, पंडित मॅडम, साने सर, गायकवाड मॅडम यांच्यासारख्या अनेक हुशार व तेजस्वी प्राध्यापकांनी माझ्या उच्च शिक्षणाचा अतिशय भक्कम पाया निर्माण केला.  घोकंपट्टीवर भर न देता विद्यार्थ्यांचे फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर करण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळे विषय सहज समजत.  खास करून पर्वते सरांनी जे भौतिक शास्त्र आम्हाला शिकलं त्यामुळे पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना अजिबात त्रास झाला नाही.

 

मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेतले असल्यामुळे शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर जो सर्वांच्या जीवनात येतो तो फेज माझ्याही जीवनात आला. प्राध्यापक काय शिकवायचे तेच कळायचं नाही. ते काय बोलायचे ते समजायचं नाही. सुरवाती सुरवातीला तर कॉलेज सोडून द्यावे किंवा सायन्स सोडून आर्ट्स घ्यावे असेही वाटायचे. त्यामुळे फर्स्ट इयर सायन्सला पहिल्या सहामाही मध्ये गणितात नापास झालो त्यामुळे गणिताच्या पंडित मॅडमनी  तू बी ग्रुप घे व मेडिकलला जा असा सल्ला दिला तर प्रीलीम मध्ये बायलॉजी मध्ये नापास झाल्यामुळे गायकवाड मॅडमनी तू ग्रुप घे व इंजीनियरिंगला जा असा सल्ला दिला.  सुदैवाने प्रिलिम नंतर मिळालेल्या दोन महिन्याच्या कालावधीत अगदी घासून अभ्यास केला आणि रुईया कॉलेजमध्ये पहिल्या काही विद्यार्थ्यांमध्ये नंबर पटकावला.

 

रुईया कॉलेजमधला पहिला-दुसरा दिवस मला आठवतो.  आल्या-आल्या पर्वते सरांनी साऱ्या वर्गाला उद्देशून म्हटलं की "तुमच्यापैकी किती जण बोर्डात पहिले आले आहेत"?  त्यावेळी चार जणांनी हात वर केला. पुणे, औरंगाबाद, नागपूर व कोल्हापूर या त्या वेळच्या एस.एस.सी.च्या चारही बोर्डात पहिली आलेली मुलं माझ्याच वर्गात होती.  त्यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न केला की "तुमच्यापैकी बोर्डात आलेल्या मुलांनी हात वर करा".  त्यावेळी ४०-५० हात उभे राहिले. त्यानंतर त्यांनी  "८०% हून ज्याला मार्क जास्त आहेत त्यांनी हात वर करा" म्हटल्यावर जवळजवळ निम्म्याहून अधिक मुलाने हात वर केले. ७५% हून अधिक मार्क आहेत त्यांनी हात वर करा म्हटल्यावर आम्ही दहा-बारा मुलं सोडून सगळ्यांनीच हात वर केले.  आपण कुठे आहोत याची मला जाणीव झाली. नशीबाने मला कुठे जायचंय याची जाणीव मला आधीच होती. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि या सर्व हुशार मुलांच्या मांदियाळीत आपल्याला जर इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायची असेल तर अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास याला पर्याय नाही हे मला त्या दिवशी कळलं.

 

त्यामुळेच की काय, महाविद्यालयातील माझी पहिली दोन वर्ष ही फक्त आणि फक्त अभ्यासात गेली. अभ्यासाव्यतिरिक्त ना मी काही पाहत होतो, ना ऐकत होतो, ना बघत होतो, ना अनुभवत होतो किंवा विचार करत होतो.  कॉलेजच्या गॅदरिंगला दोन दिवस उपस्थित राहिलो हे जर सोडलं तर ना मी कुठल्या खेळाच्या, ना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालो. रुईया कॉलेज खरं म्हणजे मुंबईच्या कॉलेज जीवना सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय पुढारलेल आहे. एकांकिका व नाट्य क्षेत्रात अगदी विनय आपटे सारखे दिग्दर्शक रुईया कॉलेजमधील मुला-मुलींच्या एकांकिकेला दिग्दर्शन देण्यासाठी येत असत. संदीप पाटील सारखा क्रिकेटपटू, राणी वर्मा सारखी गायिका त्यावेळी होती.  स्वाती टिपणीस सारखी अभिनेत्री ही देखील रुईया मध्ये होती.  कुठला ना कुठला तरी सांस्कृतिक महोत्सव कॉलेजमध्ये नेहमीच चालू असायचा.  पण मी अभ्यासा व्यतिरिक्त अशा कोणतेही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला नाही.  


छोटासा का होईना कॉलेजला जिमखाना होता. सुरुवातीला एखाद दोन वेळा गेलो असेन पण त्यानंतर कधी जिमखान्याला पण गेलो नाही. रुईया कॉलेजचा कट्टा हा साऱ्या मुंबईत फेमस आहे. त्यावर बसायचा कधी विचारही आला नाही.  एकही क्लास चुकवला नाही.  त्यावेळी ज्यांना पुढे इंजीनियरिंगला किंवा मेडिकलला जायचं असायचं ते चांगले मार्क मिळविण्यासाठी त्या वेळच्या सगळ्या फेमस शा अगरवाल क्लासेस मध्ये ऍडमिशन घ्यायचे. पण जिथे कॉलेजची फी भरायचे वांदे होते तिथे क्लासची फी भरण्याचा, ऍडमिशनचा तर प्रश्नच नव्हता. 


त्यामुळे फक्त तीनच पर्याय समोर होते. पहिला म्हणजे वर्गात जे शिकवलं जायचं ते शिकायचं. त्यामुळे वर्गाला दांडी मारायची नाही. दुसरं एकत्रित अभ्यास करायचा. माझ्याच सारखे चार दोन विद्यार्थी, जे क्लासला जाऊ शकत नव्हते अशांचा आपोआपच ग्रुप बनला व आम्ही लायब्ररीमध्ये एकत्र अभ्यास करायला सुरुवात केली. एकमेकांना अडलेल्या गोष्टी एकमेक दुसऱ्यांना समजावून सांगत. त्यामुळे अभ्यास सुकर झाला व तिसरा पर्याय म्हणजे सेल्फ स्टडी. एखादी गोष्ट कळली नाही तर पुन्हा पुन्हा वाचायची. जोपर्यंत पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत वाचायची. अभ्यासक्रमाला लावलेली क्रमिक पुस्तक अगदी संपूर्णपणे वाचायची. कुठलीही गोष्ट ऑप्शन म्हणून सोडायची नाही. या त्रिसूत्रीवर अभ्यास केला. मेहनत केल्यावर फायदा हा होतोचइंटर सायन्सला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं. माझ्या वर्गात असलेल्या, माझ्याहूनही हुशार व अगदी 'अगरवाल क्लासेस' मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा खूप अधिक मार्क मिळाले व अगदी सहजपणे जे माझं ध्येय होतं ते साध्य झालं. मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली.


माझ्या कॉलेज जीवनाच्या सुरुवातीला असाच एक 'ग्रुप' बनला होता.  या ग्रुप मधली मुलं कॉलेजमध्ये नुसती नावाला यायची पण
कोणत्या ना कोणत्या चित्रपटगृहात दररोज मॅटिनी पाहायला जायची. त्यानंतर काहीही कारण धारण नसताना कधी बँड स्टॅन्ड तर कधी जुहू चौपाटी तर कधी शिवाजी पार्क या ठिकाणी बिनकामाची फिरत असायची. दोन-तीन दिवस मीही त्यांच्याबरोबर गेलो पण नंतर हे सारं निरर्थक आहे हे ध्यानात आल्यानंतर माझा तो ग्रुप जो सुटला तो कायमचा.  


या ग्रुपमध्ये काही अत्यंत हुशार मुलं होती. त्यातली काही तर बोर्डामध्ये आली होती. अतिशय उज्वल भवितव्य असलेली ही मुलं दुर्दैवाने शिक्षणातला आपला तो टेम्पो टिकवू शकली नाहीत कशीबशी पास झाली. त्यानंतर काय झालं माहित नाही पण मला ही मुलं पुढे कुठेही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करताहेत अस दिसलं नाही. तारुण्यामध्ये आपले ध्येय ठरवायचं असतं आणि ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा असतो.  तरुण वयामध्ये अनेक अमिष असतात ज्याला ट्रॅप असं म्हणतात. या ट्रॅपमध्ये जो सतो तो आयुष्यामध्ये कसा बरे यशस्वी होऊ शकेल.

 

त्या दिवसात रुईया कॉलेज समोर तीन हॉटेल्स होती. एक होतं 'डीपी' म्हणजे दुर्गा परमेश्वरी व दुसरं होतं मणी. ही दोन्ही हॉटेल्स उडीपी होती. त्यातलं मणी च वैशिष्ट्य असं की तिथे तुम्हाला हवं तेवढं सांबार व चटणी मिळायची. एक्स्ट्रा सांबार व चटणीला पैसे द्यावे लागायचे नाहीत.  पण जे तिसरं हॉटेल होतं ते होतं 'जयेश'. हे मराठमोळ्या खाद्य संस्कृतीवर आधारित हॉटेल होतं. क्वचित प्रसंगी तिथे खाण्याचा योग आला. पण आजही तिथे खाल्लेली मिसळ मला आठवते. तिला कुठेच तोड नाही.

 

महाविद्यालयीन जीवनात चित्रपटांना जाणं, पिक्चर्स बघणं, पिकनिकला जाणं, सहलीला जाणं, पार्ट्या करण किंवा  श्रीमंत मित्रांच्या गावी फार्महाउस मध्ये किंवा घरी जाऊन मजा करण असं काही असतं हेच माहित नव्हतं, त्यामुळे तसं काही करण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवत नव्हता. रुईया कॉलेजमध्ये आर्ट फॅकल्टी होती. ज्यात 90% मुली असायच्या. या मुलींबरोबर बोलणं तर दूरच पण बघायला पण आम्ही लाजायचो. कदाचित मनात वाटणाऱ्या या लाजेनेच आम्ही मोहपाशातून दूर राहिलो. 

 

तरुणपणे कित्येक वेळा फॅशन म्हणून तर काही वेळा मजा म्हणून सिगरेट, बियर, व्हिस्की घेणारी पण मुलं असायची.  त्यांच्याशी ओळख नव्हती असं नाही.  पण त्यांच्याबरोबर घालवायला वेळच नसायचा. एका अर्थी हे चांगलंच झालं. सगळा वेळ अभ्यासात गेल्यामुळे मोकळा वेळ नसायचा. त्यामुळे अशा ओळखीच्या मुलांबरोबर मैत्री करायला ही वेळ नसायचा.  

 

एकदा का आपण आपली प्रायोरिटी सेट केली की मग कुठची अडचण येत नाही.  जसा ऑटोमोबाईल इंजिनियरने गाडीचा गिअर बॉक्स डिझाईन केला आहे तसाच देवाने आपल्याला डिझाईन केल आहे.  गाडी चालवत असताना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या गियरमध्ये गाडी जात असताना जसा रिव्हर्स गिअर घालताच येत नाही तसंच आपण आपल आयुष्य पुढे नेत असताना मागे नेता येत नाही.  मागे फक्त आठवणी राहतात.  आपल्या चुकांमुळे जर गाडी चालवताना ब्रेक लागला तरच गाडी थांबते. नाहीतर जोपर्यंत आत्मारूपी पेट्रोल आपल्यात आहे तोपर्यंत गाडी पुढे चालतच राहणार.  चुका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोह टाळण व वाईट संगत टाळण होय.  जर या दोन गोष्टी आपण टाळू शकलो तर बहुतेक प्रश्न निकालात निघतात.