माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

बुधवार, १४ मे, २०२५

 

कृतज्ञता








महाविद्यालयीन शिक्षणाच्या माझ्या या संपूर्ण प्रवासात समाजाने विविध संस्थांच्या माध्यमातून मला खूप मदत केली. त्यामुळेच मी इंजिनिअर बनू शकलो आणि माझं पुढचं आयुष्य सुखात घालवू शकलो. समाज तुम्हाला मदत करायला सदैव तयार असतो. तुम्ही समाजापर्यंत स्वतःहून पोहोचता काप्रयत्न करता काहे महत्त्वाचं आहे. भारतीय समाज दानशूर आहे. फक्त तो आपले दान 'सत्पात्री' असावे याची दक्षता घेतो. आणि हे दान घेता घेता 'अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने' अशी स्थिती माझ्या सारख्याची होऊन जाते.


समाज जेव्हा आपल्याला देतो तेव्हा 'देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेघेता घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हात घ्यावे' या कवितेत दिलेला संदेश आपण पाळला तर काही वर्षातच घेणाऱ्या हातांपेक्षा देणाऱ्या हातांची संख्या कैक पटीने वाढेल यात माझ्या मनात शंका नाही.

 


 












 

पार्ट टाईम कवी व मानधन

 





जो काहीच करू शकत नाही तो कविता करतो असं कोण म्हणतं? मीच म्हणतो. कदाचित हे खरंही असावं म्हणून मी कविता करू लागलो. मला आठवतं की सहावीला असताना मी पहिली कविता केली जी शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली 

शिवनेरीवर जन्मला  जो शिवाजी 

धन्य माता, पिता तो शहाजी’ 


अशी शिवाजीवरची ही माझी पहिली कविता. पण ही कविता प्रसवून झाल्यानंतर दुसर अपत्य यायला अनेक वर्षे लागली व त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतरच मी कविता करायला लागलो.

 

कविता मी करायचो नाही.  आपोआप सुचायच्या.  मग मी लिहून काढायचो. त्याला लोक कविता म्हणायचे.  पण याचा एक मला फायदा झाला.  मी व्यक्त व्हायला शिकलो.  शब्दांच्या प्रेमात पडलो.  इतर कवींच्या कविता वाचताना त्यातला अर्थ कळल्यानंतर एक वेगळीच नशा यायला लागली. सुरुवातीला अगदी केशवसुत, कुसुमाग्रज यांच्या कविता पासून सुरुवात झाली ते अगदी थेट नामदेव ढसाळ यांच्या गोलपिठापर्यंत येऊन धडकली.

 

कविता ही कविता असते. ती चांगली  किंवा वाईट नसते.  कविता चांगली आहे की वाईट आहे हे कोणी ठरवायचं ज्याला ठरवायचं त्याने ठरवू द्या पण जो कवी आहे त्याला मात्र ती निश्चितच चांगलीच वाटते.  माझ्या कविता लेखनामुळे मला जगण्याचा एक नवा 'मार्ग' प्राप्त झाला. त्यावेळी अनेक कवितांच्या स्पर्धा व्हायच्या. काही कविता लेखन स्पर्धा असायच्या तर काही कविता वाचन किंवा कविता गायन स्पर्धा. दरवर्षी 'नवाकाळ' हे वर्तमानपत्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कविता लेखन स्पर्धा घ्यायचं. पुण्याच्या एसपी म्हणजेच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात महाराष्ट्र स्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन स्पर्धा व्हायच्या. अनेक दिवाळी अंकही कविता स्पर्धा घ्यायचे व सर्वोत्कृष्ट कविता दिवाळी अंकात प्रसिद्ध करायचे. साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या संस्था तसेच काही महाविद्यालय देखील अशा स्पर्धांचे आयोजन करायचे. मी अगदी न चुकता या सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो


कदाचित स्पर्धेच्या दृष्टिकोनातून माझ्या कविता सरस असतीलही पण म्हणून मी काही चांगला कवी नव्हतो. एक पार्ट टाइम कवी होतो. हौशी कवी होतो. पण नियतीच्या मनात कदाचित कवितेच्या माध्यमातून मला काही अर्थार्ज व्हावे असे असावे. त्यामुळे अशी एकही स्पर्धा नव्हती की ज्यात मला कधी पारितोषिक मिळाले नाही. अर्थात त्यावेळी पारितोषिकाची रक्कम देखील अतिशय कमी असायची. नवाकाळने मला त्यावेळी दहा रुपये दिलेले आठवतात तर सर्वात मोठे बक्षीस पुण्यामध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झालेल्या 'राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धेत' मला मिळालं जे दोनशे रुपयांचं होतं. सोन्याच्या भावाने तुलना केली तर आज त्या दोनशे रुपयांची किंमत वीस हजार रुपये एवढी होते यावरून त्या दोनशे रुपयांचं मोल कळून येईल.

 

वेगवेगळ्या दिवाळी अंकात माझ्या कविता प्रसिद्ध व्हायच्या. त्यातले 50% दिवाळी अंक एकही पैसा द्यायचे नाहीत पण काही दिवाळी अंक मात्र पाच रुपये किंवा दहा रुपयाची मनी ऑर्डर करायचे व सोबत तो दिवाळी अंक देखील पोस्टाने फुकट पाठवायचे. आपली कविता दिवाळी अंकात छापून आली याचं कौतुक वाटायचं पण त्याचबरोबर मनीऑर्डरच्या फॉर्मवर सही करून पोस्टमनकडून पाच किंवा दहा रुपये घेताना अधिक आनंद वाटायचा. कवितेच्या या प्रसववेदना कालौघात कमी होत गेल्या आणि इंजीनियरिंग नंतर प्रोफेशनल आयुष्यामध्ये प्रवेश केल्यानंतर, वयाच्या 25 व्या वर्षानंतर, त्या जवळजवळ नाहीशा झाल्या. बहुतेक मला थोडीफार लक्ष्मी मिळावी म्हणून सरस्वती माझ्या अडचणीच्या वेळी माझ्या मनात वास करत होती असं मला आता वाटू लागल आहे.

 

 

महालक्ष्मी पावली





याशिवाय दादरच्या शिवाजी मंदिरची श्री छत्रपती शिवाजी स्मारक समिती, ‘बृहद् भारतीय समाज आणि महालक्ष्मी टेम्पल ट्रस्ट या तीन संस्थांकडूनही मला दरवर्षी रोखीत शिष्यवृत्ती मिळायची. त्यामुळे माझ्या कुटुंबावरचा माझा शिक्षणाचा भार कमी झाला आणि मी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकलो.


वेगवेगळ्या संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळते याची माहिती मला वर्तमानपत्र वाचून मिळायची. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स ही वर्तमानपत्रं अशा प्रकारची माहिती देण्यासाठी आठवड्यातून एकदा एक विशेष सदर चालवायची. मला आठतं या सदराच नाव संस्था समाचार अथवा संस्था वृत्त असं काही होतं. दर आठवड्याला, बहुतेक दर बुधवारी प्रसिद्ध होणार हे सदर मी न चुकता सगळ्यात आधी वाचायचो आणि त्याप्रमाणे त्या त्या संस्थेत जाऊन अर्ज करायचो.


असच एकदा माझ्या वाचनात श्री महालक्ष्मी टेम्पल ट्रस्ट गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते अशी बातमी आली. बातमी थोडीशी उशिरा छापली गेली होती आणि अर्ज करण्याची तारीख निघून गेली होती. तरीही निराश न होता मी प्रयत्न करायचं ठरवलं आणि घाटकोपरहून एकटाच महालक्ष्मीला गेलो. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मी संस्थेच्या कार्यालयात गेलो. तेव्हा त्यांनी मला फॉर्म देण्याची मुदत संपली असल्यामुळे फॉर्म देण्यात येणार नाही असे कळविले. मला थोडं वाईट वाटलंपण मी निराश झालो नाही. यातून नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल याची मला खात्री होती. मी कार्यालयातील एका माणसाला विचारलं, "या मंदिराचे मुख्य पुजारी कोण आहेत आणि ते कुठे राहतात?" त्यांनी मला मुख्य पुजाऱ्यांचे नाव सांगितले व ते मंदिराच्या मागेच असलेल्या घरात राहतात असे सांगितले.


विचारत विचारत मी मुख्य पुजाऱ्यांच्या घरी गेलो आणि दार ठोठावलं. माझ्याच वयाची एक मुलगी साक्षात महालक्ष्मी च्या रूपाने माझ्यासमोर उभी दारात राहिली. तिने मला येण्याचे कारण विचारले. ते मी तिला सांगतातिने मला माझी मार्कलिस्ट दाखवायला सांगितले. नंतर कळलं की ती महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांची मुलगी होती आणि तीही त्याच वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास झाली होती. मी तिला माझी मार्कलिस्ट दाखवली. माझे मार्क पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने ताबडतोब आपल्या धाकट्या भावाला बोलावून सांगितलं, "ह्याला घेऊन ऑफिसमध्ये जा आणि त्यांना सांग की याला अर्ज द्यायला मी सांगितलं आहे." तो आठ- दहा वर्षाचा तिचा भाऊ ताईची आज्ञा पाळण्यासाठी मोठ्या उत्साहाने मला घेऊन ऑफिसमध्ये गेला. मला अर्ज मिळाला आणि नंतर शिष्यवृत्तीही. ती शिष्यवृत्ती मला इंजिनिअरिंगची पदवी मिळेपर्यंत मिळत राहिली. जणू मला स्कॉलरशिप देऊन महालक्ष्मी अंतर्धान पावली होती.


 

गुरुवार, ८ मे, २०२५

 

अभ्यासिका

 





महाविद्यालयीन जीवनात आणखीन एका  गोष्टीची अडचण व्हायची ती म्हणजे अभ्यासाची जागा. घरी अभ्यास करायची फारशी सोय नव्हती. एकतर घर खूप छोटं होतं व चाळीमध्ये सदैव गोंगाट असायचाघरात शेजारीपाजारी सतत येत जात राहायचेत्यामुळे लक्ष देऊन अभ्यास करणं कठीण होतं. इंजीनियरिंगच्या आधीची रुईया कॉलेज मधली दोन वर्षेकॉलेजच्या लायब्ररीमध्ये किंवा रीडिंग रूम मध्ये अभ्यास करायचो. रुईया कॉलेजमध्ये एक चांगली गोष्ट होती. कॉलेजमधली तळमजल्यावरचा एक वर्ग ते विद्यार्थ्यांसाठी साधारण रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत उघडा ठेवत. त्यामुळे खूपच फायदा झालाफर्स्ट इयर सायन्स व इंटर सायन्स मधला सगळा अभ्यास तिथेच झाला. 

परंतु इंजिनिअरिंगच्या चार वर्षांमध्ये त्यामानाने खूपच अभ्यास करावा लागायचा आणि त्यातल्या त्यात जेव्हा सेमिस्टरची परीक्षा जवळ यायची तेव्हा तर दिवस-रात्र अभ्यास करावा लागायचा. प्रश्न हा होता की रात्री अभ्यास कुठे करायचा?  अशा वेळी पुन्हा एकदा अनेक चांगली माणसं मदतीला आली व त्यांनी माझा  रीडिंग रूमचा प्रश्न सोडवला.

 

शालेय जीवनात मी संघाच्या शाखेत जात असे. तिथे श्री कोल्हटकर हे आमचे मुख्य शिक्षक होते. ते अविवाहित होते व हाऊसिंग बोर्ड मध्ये रेंट कलेक्टर म्हणून काम करीत होते. ते स्वतः आमच्याच विभागात पण दुसऱ्या एका चाळीत राहत असत. त्यांच्यामुळेश्रीयुत प्रभाकर नाईक श्रीयुत गणेश चौधरी या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या, म्हणजेच हाउसिंग बोर्डामध्ये रेंट कलेक्टर म्हणून काम करणाऱ्या आणखीन दोघा सदगृहस्थांशी ओळख झाली. प्रभाकर नाईक आणि गणेश चौधरी या दोघांचेही लहान भाऊ माझे समवयस्क. आणि योगायोगाने ते सुद्धा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते.  या दोघांच्या ओळखीने त्यांनी मला एका दुसऱ्या चाळीतील एक खोली अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली.  आणि मग काय.  आमच्या रीडिंग रूमचा प्रश्न निकाली निघाला.  मी, नाईक व चौधरी यांचे भाऊ आणि माझा आणखी एक वर्गमित्र असे चौघेजण या रूममध्येच अभ्यास करू लागलो. ही खोली हेच आमचे जवळ-जवळ घर झाल होत. घरी जायचं ते फक्त आंघोळ करायला आणि जेवायला. बाकी अख्खा दिवस त्याच खोलीत अभ्यास करायचो आणि पहाटे कधीतरी झोपी जायचो. 


इंजीनियरिंगची पहिली दोन वर्षे तरी अश्या प्रकारे रीडिंग रूमचा प्रश्न निकालात निघाला. परंतु इंजीनियरिंगच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षी ही खोली उपलब्ध नव्हती, कारण त्या खोलीचा मालक आपल्या कुटुंबासहित तिथे राहायला येणार होता.  अशावेळी अनिल विद्वांस हा माझा मित्र स्वतःहून पुढे आला आणि त्याने त्याची रूम आम्हाला उपलब्ध करून दिलीअनिल त्यावेळी अविवाहित होता आणि आमच्याहून चार-पाच वर्षाने मोठा होता. रात्री तो झोपला असतानाही आम्ही दिवे लावून अभ्यास करायचो. कधी तर गप्पा देखील मारायचो. त्याचा त्याला त्रास व्हायचा पण त्याने कधीच बोलून दाखवलं नाही. त्याच्या खोलीवर आम्ही सर्व मित्र अगदी मन लावून अभ्यास करायचो आणि त्यामुळे परीक्षेत नेहमीच चांगले मार्क मिळत गेले. 


व्हीजेटीआय मध्ये इंजिनिअरिंग करत असताना देखील रुईया कॉलेजमध्ये आम्ही संध्याकाळी त्यांच्या रिकाम्या वर्गात अभ्यास करायला जायचो. त्याला ना कधी रुईया कॉलेजने ऑब्जेक्शन घेतलं ना कधी त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी. उलट रुईया कॉलेजमधले विद्यार्थी आणि आम्ही अगदी मित्र झालो होतो आणि एकत्र अभ्यास करायचो. रुईया कॉलेज, नाईक, चौधरी तसेच विद्वांस कुटुंबीयांनी आम्हाला अभ्यास करण्यासाठी, अगदी एकही पैसा न घेता व स्वतःच्या खिशातून विजेचे बिल भरून जागा उपलब्ध करून दिली त्यांच्या ऋणात कायमचं राहायलाच मला आवडेल.