माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट
बुधवार, १२ मार्च, २०२५
कॉलेज च्या फी चा प्रश्न सुटला पण
पुस्तकांचा प्रश्न होताच. लायब्ररीत जाऊन अभ्यास करणं ठीक होतं, पण घरी अभ्यास करण्यासाठी पुस्तकं हवीच होती. आमच्या
विभागात लायन्स
क्लबतर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी एक बुक बँक चालविली जायची. त्यातून विद्यार्थ्यांना वर्षभर पुस्तकं
वापरायला मिळायची. पुस्तकांच्या छापील किमतीच्या ४०% रक्कम लायन्स क्लबकडे जमा
करायची. वर्षभरानंतर पुस्तकं परत केल्यानंतर त्या रकमेच्या अर्धी, म्हणजे छापील किमतीच्या २०% रक्कम परत मिळायची. अशा प्रकारे
छापील किमतीच्या केवळ २०% रकमेत पुस्तकं वर्षभर वापरायला मिळायची. गरीब आणि होतकरू मुलांना याचा प्रचंड लाभ व्हायचा
हा लाभ
घेण्यासाठी लायन्स क्लबचा एक अर्ज छापील भरायचा
होता. त्यात आपली संपूर्ण माहिती देऊन मार्कलिस्ट जोडावी लागायची व ओळखीच्या एखाद्या
लायनची म्हणजेच लायन्स क्लबच्या
सभासदाची सही घ्यावी लागायची, शिफारस घ्यावी लागायची. मला जेव्हा
हे कळलं त्यावेळी माझ्याबरोबर असलेल्या इतर विद्यार्थ्यांबरोबर मी माझ्या विभागाच्या जवळच राहणाऱ्या श्रीयुत झवेरी नावाच्या एका सद्गृहस्थाकडे, जे स्वतः लायन होते, माझा फॉर्म घेऊन गेलो. इतर सर्व विद्यार्थ्यांबरोबर
त्यांनी माझ्या फॉर्मवर सुद्धा काहीही चौकशी न
करता शिफारसीची सही केली. पण सही
झाल्या झाल्याच मी त्यांना माझी अडचण सांगितली. मी त्यांना म्हटलं की "सर, ही
पुस्तकं घेण्यासाठी लागणारे ४०% पैसेही माझ्याकडे नाहीत. मी ही पुस्तकं कशी घेऊ?" दयाळू झवेरीजींनी माझी मार्कलिस्ट पुन्हा
एकदा नीट पाहिली. माझे मार्क पाहून त्यांना बहुतेक बरं वाटलं असावं. कारण त्यानंतर
त्यांनी ताबडतोब माझ्या अर्जावर 'फुकट पुस्तकं देण्यात यावीत' असा शेरा मारला. त्यामुळे मला एकही पैसा न भरता अगदी माझं
शिक्षण संपेपर्यंत घाटकोपर लायन्स क्लबकडून फुकट पुस्तकं मिळत गेली.
रविवार, ९ मार्च, २०२५
करसनदास विसनजी व त्यांचे
सुपुत्र
कॉलेजमध्ये शिक्षण घेताना, विशेषतः इंजिनिअरिंग करताना फी आणि पुस्तकं याशिवायही खूप खर्च येतो. प्रॅक्टिकलसाठी लागणारी वेगवेगळी उपकरणं, हत्यारे, स्लाईड रूल, मिनी ड्राफ्टर, ड्रॉइंग बोर्ड, जर्नल्स लिहिण्यासाठी लागणारे कागद, फाईल्स, ड्रॉइंग पेपर, वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिली अशा अनेक गोष्टींसाठी पैसे लागतात. अशावेळी मलबार हिल येथील 'श्री करसदास विसनजी ट्रस्ट’ ही संस्था माझ्यासाठी देवासारखी धावून आली. त्याची कहाणीही खूप रोचक आहे.
माझे
आजोबा (आईचे वडील) हे शेट करसदास
विसनजी यांच्याकडे निवासी ड्रायव्हर होते. शेट करसदास विसनजी हे 'व्हॅलेस फ्लोर मिल' आणि 'इंडियन
प्लायवूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी' चे मालक होते. माझे आजोबा कुटुंबासहित त्यांच्या
बंगल्याच्या तळघरात राहायचे. मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत मी आजोबांकडे
राहायला जायचो. त्यामुळे मला लहानपणी शेट करसदास विसनजी आणि त्यांच्या कुटुंबियांना पाहण्याचा
योग आला होता. अतिशय श्रीमंत असलेले हे ‘भाटिया’ कुटुंब व त्यांची तरुण मुले व लहान नातवंडे देखील अतिशय साधी व सरळ होती. मोठेपणाचा मागमूस नाही, पैशाने आलेला गर्व नाही वा नोकरांबरोबर वागण्याची माजोरडी वृत्तीही नाही. त्यामुळे लहानपणापासून शेट करसदास विसनजी व त्यांचे
कुटुंब यांचे मला आकर्षण होते.
एसएससी ची परीक्षा पास झाल्यानंतर
मी आईला म्हटलं, "आपण शेटजी ना भेटायला जाऊ." त्यावेळी माझे आजोबा निवृत्त होऊन ३ वर्ष होऊन गेली होती. आई म्हणाली,
"ते आपल्याला ओळखतील की नाही हे मला माहीत नाही."
मी विचार केला, प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? जास्तीत
जास्त काय होईल? शेटजी भेट नाकारतील. एवढच ना? म्हणून मी आग्रह धरल्यानंतर आई माझ्याबरोबर यायला तयार झाली. आम्ही दोघे शेटजींना
भेटायला त्यांच्या मलबार हिलवरील
बंगल्यावर गेलो. बंगल्याच्या भल्या
मोठ्या गेट समोर आम्ही उभे राहिलो तेव्हा द्वारपालाने आमची चौकशी केली. द्वारपालाकडे मी निरोप दिला,
"भास्कर ड्रायव्हरचा नातू आला आहे." आणि काय आश्चर्य? कदाचित
माझ्या आजोबांनी त्यांच्या आयुष्यभर केलेल्या सेवेची पुण्याई असेल, शेटजींनी मला ताबडतोब
वर बोलावून घेतलं. खरंतर एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये जाण्याचा हा माझा
पहिलाच प्रसंग होता. मी आणि माझी आई दोघेही तसे बावरूनच
गेलो होतो पण मी थोडेसे धाडस करूनच आत गेलो. एवढ्या मोठ्या माणसाला भेटण्याची माझी ती पहिलीच वेळ होती.
शेट करसदास विसनजींना दोन कर्तृत्ववान मुलं होती. 'हमीर शेट' आणि 'नलीन शेट'. सगळा कारभार ते दोघेच पाहायचे. बंगल्यात शिरल्यानंतर हमीरशेटनी मला त्यांच्या रूम मधे बोलावून घेतले व माझी चौकशी केली. पांढरे शुभ्र धोतर व त्यावर त्याच रंगाचा सदरा घातलेले, सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेले गोरेपान हमीरशेट मला त्या क्षणी एखाद्या गुरु प्रमाणे वाटले. त्यांनी माझी मार्कलिस्ट काळजीपूर्वक तपासली. माझे मार्क पाहून ते खुश झाले आणि म्हणाले, "दर वर्षी तुझी मार्कलिस्ट घेवून मला भेटत जा. मार्क चांगले असतील तर तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करीन". एवढ बोलून त्यांनी माझी पहिल्या वर्षाची संपूर्ण फी रोखीत दिली तसेच फर्स्ट इयर सायन्सला लागणारी सर्व सायंटिफिक उपकरणे विकत घेण्यासाठी पैसे सुद्धा दिले.
हमीर शेटनी त्यांचा हात माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझ्या डोक्यावर ठेवला व त्यांच्यामुळे माझे अभियांत्रिकीचे शिक्षण फारशी आर्थिक अडचण न येता पार पडले. हमीरशेट एवढी काळजी घेत की मला जास्त पैसे मिळावेत म्हणून त्यांनी मला कॉलेजच्या सुट्टीत त्यांच्या रे रोडवरील प्लायवूडच्या कारखान्यात शिकाऊ उमेदवार म्हणून काम दिलं. खरं तर तिथे काही काम नव्हतं. जे काही चाललय ते बघत बसायचं. पण हमीरशेट नी 'काम करून पैसे मिळू शकतात' हे माझ्या मनावर बिंबवले व मला शिकता शिकता अधिकचे पैसे कमावण्याची संधी दिली.
या संदर्भात हमीरशेटच्या मनाचा मोठेपणा सांगण्याचा मला मोह आवरत नाही. फर्स्ट इयर सायन्स उत्तम गुणांनी पास झाल्यानंतर पुढच्या वर्षाच्या फीसाठी मी पुन्हा हमीरशेट कडे गेलो. त्यावेळी त्यांनी “कसं काय चाललंय” विचारत माझी चौकशी केली. मी त्यांना सांगितलं, "शिक्षण बरं चाललंय, पण पैशांमुळे घरी खूप अडचण येते. कमवणार कोणीच नसल्यामुळे घराचा खर्च चालवता येत नाही व त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होते." हे ऐकून त्यांनी विचारलं, "तुझे वडील काय करतात?" मी सांगितलं, "ते पूर्वी एका मिलमध्ये कारकून होते. आता ते निवृत्त झाले आहेत". हमीरशेट म्हणाले, "तू त्यांना उद्यापासून आमच्या प्रिन्सेस स्ट्रीटच्या शोरूमवर पाठव. मी त्यांना चारशे रुपये पगार देऊन नोकरीवर ठेवतो." त्यावेळी ४०० रुपये ही आमच्यासाठी खूप चांगली रक्कम होती. हमीरशेट नी म्हटल्याप्रमाणे निवृत्त झाल्यानंतरही वडील पुन्हा एकदा नोकरीला लागले आणि मी इंजिनिअर होईपर्यंत ते त्यांच्या शोरूम मध्ये नोकरी करत होते.
मला खात्री आहे की हमीरशेटला त्यांची काहीही गरज नव्हती. पण त्यांनी केवळ मला मदत व्हावी या उद्देशाने माझ्या वडिलांना नोकरीला ठेवले. मनात आणल असतं तर त्यांनी मला दर महिन्याला चारशे रुपयाची अधिकची मदत सुद्धा केली असती. पण हे सर्व फुकटचं झालं असतं म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना नोकरीला ठेवलं व ‘श्रमाने पैसे कमवा’ हा संदेश दिला जो मी आयुष्यभर पाळला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)